Monday, April 6, 2020


पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास
मदतीसाठी नांदेडकरांनी  दिला भरभरून प्रतिसाद

   
नांदेड,  दि, 6 :-  देणाऱ्याचे हात हजार या वाक्याला सार्थ ठरवले ते नांदेडचे प्रसिध्द उद्योजक प्रदीप चाडावार याच्या मदतीने, गरजू ,बेघर, रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबाना 1 हजार अन्नधान्य मदत किट पालकमंत्री अशोक चव्हाण याच्यासह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बेघर गरजू ,गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची मसालापावडर असे 1 हजार किट जिल्हा प्रशासनास 1 हजार व्यक्तीला किट वाटप करण्यासाठी नांदेडचे प्रसिद्ध उद्योजक आणि व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे मदतीचे किट सुपूर्त केल्या. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी  डॉ .विपीन इटनकर उपस्थित होते.

प्रदीप चाडावर हे मूळचे किनवटचे असून नांदेड येथे वास्तव्यास आहेत. लायन्स क्लब नांदेडचे ते सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान  राहिले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी एक हजार किट जिल्हा प्रशासनास वाटपासाठी सुपूर्द केल्या. ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा गरजुना याचे वाटप करण्यात येणार आहेत. देणाऱ्याचे हात हजार, तसे हजार व्यक्तीला ही मदत पोहोचणार म्हणून हे वाक्य आज सार्थ ठरले आहे. नांदेडकरांनी नांदेडकरसाठी  केलेली मदत आणि प्रशासन व पालकमंत्री यांच्या समनव्यातुन कोरोनाच्या संकटा मधून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास वाटतो.
0000000


·         जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही
·         प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे
·         आवश्यक नसेल तेंव्हा घराबाहेर पडू नका
-         पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

नांदेड दि. 6 :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी न करता आवश्यक नसेल तेंव्हा घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जिल्ह्यात कोरोना संदर्भात सुरु असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या बैठक कक्षात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शेतकरी व विविध योजनेतील गरजू नागरिकांना नियमित मदत करणे आवश्यक आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वेळेवर देण्यासाठी बँकांनी आवश्यक असेल त्या उपाययोजना कराव्यात. गाव व शाखानिहाय अनुदानाची रक्कम वाटप करतांना टोकन नंबर, दिनांक ठरवून एसएमएसद्वारे लाभार्थ्यांना माहिती दयावी. त्याअनुषंगाने आवश्यक ते सहकार्य घेऊन बँकेतील गर्दी टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा माल तूर व चना खरेदी करतांना कोणतेही अडवणूक होणार नाही यासाठी लॉकडाउन काळात अत्यावश्यक उपाययोजना करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असे प्रयत्न करावीत. जिल्ह्यातील दुध संकलनाची क्षमता वाढविण्यासाठी दुध केंद्रासाठी लागणारी आवश्यक उपकरणे व मनुष्यबाळाचा आढावा घेऊन जिल्ह्यात दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.  
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांतून एप्रिल, मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप करतांना कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे पात्र शिधापत्रिकाधारक, गरजू नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  शिधापत्रिकाधारकांना येत्या जुलै ते डिसेंबर या काळात दिल्या जाणाऱ्या नियमित धान्य वाटपाच्या नियोजनाची माहिती त्यांनी घेतली.
कोविड 19 विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात आमदार निधीतून दिला जाणारा निधी खर्च करतांना ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी एक व्हेंटीलेटरची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याबाबत मतदारसंघातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन आरोग्याच्यादृष्टिने अनुषंगीक बाबींवर लागणारी प्राधान्यक्रमाने सामुग्रीची माहिती त्वरीत करावी. त्यानुसार प्राधान्यानेच आवश्यक बाबी खरेदी करणे योग्य राहील, असेही त्यांनी नमूद केले.        
            महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णांना विविध आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन  ग्रामीण भागातील रुग्णांना डायलिसिसची सुविधा स्थानिक स्तरावर देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेऊन आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.
लॉकडाऊन काळात सर्व प्रार्थना स्थळे बंद असून इंडोनिशियातून भारतात आलेले काही दहा नागरिकांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा तपासणी रिपोर्ट येणार आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
            श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटाच्या बाह्यरुग्ण विभागात सोयी-सुविधा पुरविण्यासह जिल्ह्यातील विविध विषयाच्या अनुषंगाने आढावा घेऊन जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांना उपयुक्त सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या. 
00000

Sunday, April 5, 2020


कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ;
सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय, धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर,
चित्रफीत आदी, अवैध सीमकार्ड वापरावर मनाई आदेश जिल्ह्यात लागू
नांदेड दि. 5 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत (सोशल मिडीया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींगद्वारे जातीय / धार्मिक तेढ वरील आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत इत्यादी तसेच अवैध सिमकार्ड वापरावर मनाई करण्यात आल्याचा आदेश नांदेड जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात लागू केला आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे की, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या काळात काही समाज विघातक / गुन्हेगारी वृत्तीचे लोक दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे संदेश अथवा लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल अशा अफवा / कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या त्यांच्यावरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव झालेला परिसर या संशयित कोरोना बाधित व्यक्ती याबाबत कोणतीही खातरजमा खात्री न करता माहिती, बातमी सोशल मिडिया, विविध प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अकारण भिती उत्पन्न होत असल्याचे जाणवत आहे.
अशा संदेश, अफवा व बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस उद्देशून काढणे आवश्यक असल्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 अन्वये रविवार 5 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जातीय वैमनस्य, धर्मीक तेढ, समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या अनाधिकृत, खोट्या बातम्या तसेच कोरोना संबंधी अंधश्रद्धा आणि निराधार माहिती कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारीत करणार नाही.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजीटल माध्यमांद्वारे दोन समाजात जातीय तेढ / धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपाई संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारित करणार नाही.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन हे आपल्या ग्रुप मधील कोणत्याही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफीत इत्यादी प्रसारणासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील.
अवैध, अनाधिकृत सिमकार्ड वापर व बाळगण्यावर पाबंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा समुह भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे तसेच इतर प्रचलित कायदयांतील तरतुदीनुसा शिक्षेस पात्र राहील.
सोशल मिडिया, एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवक्रींग प्लॉटफॉर्मचे ग्रुप ॲडमीन तसेच वैयक्तिकरित्या सोशल मिडीया वापरणारे व्यक्ती यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी एकतर्फी काढला आहे.
याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, सर्व शासकीय कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन, सर्व सार्वजनिक ठिकाणच्या नोटीस बोर्डावर नागरिकांच्या सुविधेसाठी पोलीस विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
हा आदेशात 5 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत करण्यात आला असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000


कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
कार्यकारी समिती व तांत्रिक समिती गठीत
नांदेड दि. 5 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर कार्यकारी समिती व तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा Containmet Plan (Covid 19) मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.  
जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे आहेत.
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे आहेत.
तालुकास्तरीय कार्यकारी समितीचे उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, संबंधीत तालुक्याचे वैद्यकीय अधीक्षक Medical Superintendent, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी हे आहेत.   
तालुकास्तरीय तांत्रिक समितीचे वैद्यकीय अधीक्षक Medical Superintendent अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी हे आहेत.
वरील समितीने भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा नियंत्रण आराखडा (कोविड 19) Containmet Plan (Covid 19) चा अभ्यास करुन त्यानुसार नांदेड जिल्ह्यात सदर आराखड्यामधील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा, सदर आदेशास तात्काळ प्रभावाने अंमल देण्यात यावा, असेही आदेशात नमुद केले आहे.
000000


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्ह्यातील विविध यंत्रणा दक्ष
नांदेड दि. 5 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेतील विविध अधिकारी समन्वय ठेवून कोरोना प्रतिबंध, नियंत्रण व उपचारात्मक आरोग्य सेवेत नियमित दक्षता घेत आहेत.
सर्वत्र करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी नियमित आरोग्य सेवा देत आहेत. हे सर्व फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्या भूमिका कोरोनाच्या लढयात एका योध्यासम असल्याचा उल्लेख देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे सर्व डॉक्टर असल्यामूळे नांदेड जिल्ह्यात सुरुवाती पासून जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क करुन नांदेड जिल्ह्यात आरोग्य उपचारांसह आवश्यक माहिती देऊन नागरीकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. नांदेड जिल्हयात शुक्रवार 3 एप्रिल पर्यंत जिल्हयात 398 संशयीत रुग्ण आढळले असून एकाही रुग्णास कोविड-19 प्रादुर्भाव झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे.
जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था या अनुषंगाने सतर्क असून, आरोग्य संस्थेत मुबलक औषधीसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हयातील होम क्वारंटाईन यांना एकाचवेळी बल्क एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. होम क्वारंटाईन व्यक्तींना आरोग्य कर्मचारी दररोज प्रत्यक्ष भेटीद्वारे विचारपूस करुन उपचार करीत आहेत. त्यांचे मनोबल वाढवित आहेत. काही तीव्र लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ आरोग्य संस्थेत पुढील तपासणी, उपचारासाठी पाठविण्यात येत आहे.
जिल्हयात गावनिहाय समित्या गठीत केल्या असून त्याचबरोबर आरोग्य विभागाने गावनिहाय मायक्रोप्लॉन तयार करुन घेतला आहे. जिल्हयात कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सतत सर्वेक्षण केल्या जात आहे. अन्य देश, इतर जिल्हयातून नांदेड जिल्हयात आलेल्या 63 हजार 524 व्यक्तींना आज पर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले असून पुनर्भेटीद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घेण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या सूचनाही देण्यात येत आहेत.
नांदेड जिल्हयात इतर जिल्हयातून, राज्यातून पायी आलेले मजूर व लॉकडाउनमूळे अडकलेल्या वर्गासाठी लेबर कॅम्प (शरणार्थी शिबीरे) किनवट-दोन, मुखेड-एक, देगलूर-एक, लोहा-एक, हदगाव-एक व कंधार येथे ठेवलेले असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी व योगमेडीटेशन समुपदेशन दररोज व आश्यकतेप्रमाणे केले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
0000000

Saturday, April 4, 2020

मालवाहू वाहनांना परवानगी
ऑनलाइन प्रणालीद्वारे  
नांदेड दि. 4 :- लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यासाठी आता ऑनलाइन प्रणालीद्वारे सुरु करण्यात आली आहे.
यासाठी आरटीओ कार्यालयाकडे https://transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी mh26@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तसेच 842 1800 099 नंबरवर वाहन चालक, मालकांना संपर्क करु शकतात.
परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार यापुढे मॅन्युअल पद्धतीने वाहतूक परवाने दिले जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


कोरोना विषाणुचा प्रार्दुभावामुळे बेघर, विस्‍थापित,
स्‍थलातरीत व्‍यक्‍तींना धीर देण्‍यासाठी समुपदेशकांची नियुक्ती
नांदेड दि. 4 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भावामुळे बेघर, श्रमिकांना धीर देवून त्यांचे मानसीक भावनिक समुपदेशन करण्‍यासाठी जिल्ह्यात समुपदेशकांची नियुक्‍ती जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन ईटनकर यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलातरीत मजुरांना राहण्‍याची, जेवणाची व्‍यवस्‍था कॅम्‍पमध्‍ये करण्‍यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रार्दुभावामुळे बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलातरीत व्‍यक्‍तींना धीर देण्‍यासाठी मानसीक भावनिक समुपदेशन करणे आवश्‍यक आहे. यासाठी तालुक्‍यातील बेघर, विस्‍थापित तसेच स्‍थलातंरीत व्‍यक्‍तींना समुपदेशन करण्‍यासाठी पुढील अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
समन्‍वय अधिकारी  म्हणून नांदेडचे सहायक कामागार आयुक्‍त सयद मौसीन (मो. 7276216066) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर समुपदेशक म्हणून हदगाव तालुका- गजानन चिंचोलकर 7038506008, सुरेश भाऊराव सरोदे 8830456224. मुखेड तालुका- शिवकांत बिराजदार 9762889360. गोविंद मुंगल 9421849382. किनवट तालुका प्रदीप लक्ष्‍मण घागळे 916816919. कविता चिंचाबेकर 9518540643. श्रीमती निरुपा कृष्‍णा राठोड 940320740.  नांदेड तालुका- श्रीमती सचित्रा भगत 8485810182, साईनाथ मंचेवार 8888833830, बी. पी. जाधव 986062133, आर. एम. खडके 9518521647. कंधार, लोहा तालुका- श्रीमती साधना गणेश एंगडे 8261832227, माधव संभाजीराव डोंपले- 9665711101 यांची नेमणूक करण्यात आली आहे. यांनी समन्‍वय अधिकारी संबंधीत तालुक्‍याचे तहसिलदार यांच्याशी संपर्कात राहुन संबंधीत कॅम्‍पवर जाऊन संबंधीतांचे समुपदेशन करण्याची कार्यवाही करावी.
समन्‍वय अधिकारी यांनी सर्व संबंधीत अधिकारी हे त्‍यांना नेमूण दिलेल्‍या तालुक्‍यात जाऊन आदेशाची अंमलबजावणीबाबत खातरजमा करावी. समुपदेशन अधिकारी यांनी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या तालुक्‍यात होत असलेल्‍या कार्यवाहीबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सामान्‍य) प्रसाद कुलकर्णी यांच्याशी समन्‍वय ठेवुन दैनदिन अहवाल सादर करावा.
सर्व संबंधीत अधिकारी यांनी त्‍यांचे दुरध्‍वनी भ्रमणध्‍वणी क्रमांक सतत चालु ठेवावे त्‍यांना आदेशित केलेली कामे वेळोवेळी 24 तास यापध्‍दतीने सतर्क राहून तत्‍परतेने पार पाडावीत. कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकडून कामामध्‍ये दिरंगाई केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍यांचे विरुध्‍द महाराष्‍ट्र कोव्‍हीड-19 उपाययोजना नियम 2020 मधील तरतुद आपत्‍ती व्‍यवस्‍थापना अधिनियम 2005 च्‍या कलम 51 इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल यांची गांभिर्याने नोंद घ्‍यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...