Sunday, April 5, 2020


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्ह्यातील विविध यंत्रणा दक्ष
नांदेड दि. 5 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेतील विविध अधिकारी समन्वय ठेवून कोरोना प्रतिबंध, नियंत्रण व उपचारात्मक आरोग्य सेवेत नियमित दक्षता घेत आहेत.
सर्वत्र करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी नियमित आरोग्य सेवा देत आहेत. हे सर्व फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्या भूमिका कोरोनाच्या लढयात एका योध्यासम असल्याचा उल्लेख देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे सर्व डॉक्टर असल्यामूळे नांदेड जिल्ह्यात सुरुवाती पासून जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क करुन नांदेड जिल्ह्यात आरोग्य उपचारांसह आवश्यक माहिती देऊन नागरीकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. नांदेड जिल्हयात शुक्रवार 3 एप्रिल पर्यंत जिल्हयात 398 संशयीत रुग्ण आढळले असून एकाही रुग्णास कोविड-19 प्रादुर्भाव झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे.
जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था या अनुषंगाने सतर्क असून, आरोग्य संस्थेत मुबलक औषधीसाठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याअनुषंगाने आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हयातील होम क्वारंटाईन यांना एकाचवेळी बल्क एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. होम क्वारंटाईन व्यक्तींना आरोग्य कर्मचारी दररोज प्रत्यक्ष भेटीद्वारे विचारपूस करुन उपचार करीत आहेत. त्यांचे मनोबल वाढवित आहेत. काही तीव्र लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ आरोग्य संस्थेत पुढील तपासणी, उपचारासाठी पाठविण्यात येत आहे.
जिल्हयात गावनिहाय समित्या गठीत केल्या असून त्याचबरोबर आरोग्य विभागाने गावनिहाय मायक्रोप्लॉन तयार करुन घेतला आहे. जिल्हयात कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सतत सर्वेक्षण केल्या जात आहे. अन्य देश, इतर जिल्हयातून नांदेड जिल्हयात आलेल्या 63 हजार 524 व्यक्तींना आज पर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले असून पुनर्भेटीद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घेण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या सूचनाही देण्यात येत आहेत.
नांदेड जिल्हयात इतर जिल्हयातून, राज्यातून पायी आलेले मजूर व लॉकडाउनमूळे अडकलेल्या वर्गासाठी लेबर कॅम्प (शरणार्थी शिबीरे) किनवट-दोन, मुखेड-एक, देगलूर-एक, लोहा-एक, हदगाव-एक व कंधार येथे ठेवलेले असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी व योगमेडीटेशन समुपदेशन दररोज व आश्यकतेप्रमाणे केले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...