Friday, February 14, 2020

शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही
त्यांचे मुंबईत स्वतःचे घर नव्हते
          ---- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 14:-  माझे वडिल शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे होते. पण अतिशय प्रेमळही होते. सार्वजनिक जीवनात ते खूप पारदर्शी जीवन जगले. म्हणून दोन वेळा महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री राहूनही 1975 मध्ये त्यांच्याकडे मुंबईत स्वत:चे घर नव्हते . शेवटी आम्ही आमदार निवासात राहिलो, अशी आठवण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितली .
येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ही मुलाखत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतली. व्यासपीठावर अमिताताई चव्हाण याही उपस्थित होत्या. श्री. चव्हाण यांनी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
महाराष्ट्रासह केंद्रातही महत्वाची विविध मंत्रालय आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळलेले दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे सार्वजनिक जीवन कडकशिस्तीचे, कणखर बाण्याचे आणि कठोरपणे निर्णय राबवणारे असे होते. परंतु, घरात मात्र ते प्रेमळ तर  होतेच तसेच त्यांच्या हद् यात  एक हळवा कोपराही होता, असे सांगून श्री. अशोक चव्हाण व अमिताताई चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्री. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले . म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.     
श्री. चव्हाण म्हणाले की, जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती आणली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लावले. दुष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत मांडला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमर राजूरकर, अमिताताई चव्हाण, माजी मंत्री डि.पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नागरिक,पत्रकार आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वी भावे यांनी केले .  
0000 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 14 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी जुहू येथून विमानाने दुपारी 3-00 वा. नांदेडकडे प्रयाण. सांयकाळी 4-15 वाजता नांदेड येथे आगमन. सांयकाळी 6-30 वाजता यशवंत कॉलेज मैदान , नांदेड येथील प्रकट मुलाखत कार्यक्रमास उपस्थिती. 
0000
सर्व ऑटो/टॅक्सी चालक-मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक   
नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व ऑटो / टॅक्सी चालक -मालकांना/बॅजधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजना अशा दोन जनतेच्या हितार्थ योजना जाहीर केल्या आहेत. व्यावसायिक वाहन चालक यांनी या योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.  
त्यानुसार सर्व ऑटो / टॅक्सी चालक - मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेतल्याशिवाय त्यांचे वाहनासंबंधी परवाना / योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. या योजनेकरिता अर्ज सार्वजनिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्यामार्फत करण्यात यावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
लेंडी अंतरराज्य प्रधान प्रकल्पाचे बंद पाडलेले बांधकाम सुरु करण्याबाबत
नांदेड, दि. 14:- लेंडी नदीवर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे .या प्रकल्पाचा पाणी वापर 168 दलघमी असून सिंचन क्षेत्र 26924 हे. आहे. या प्रकल्पाच्या बांधकामास इ.स.1986 मध्ये सुरुवात करण्यात आलेली असून सद्यस्थितीत धरणाचे बांधकाम 80 टक्के सांडवा व विमोचकाचे 95 टक्के पुर्ण झालेले आहे. तसेच कालव्याची कामे प्रगत आहेत.
            धरणाच्या बुडीत क्षेत्रात 12 गावठाणे येत असुन त्यांचे 11 ठिकाणी पुनर्वसन प्रस्तावित आहे त्यापैकी 9 गावाच्या पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सदरची कामे जुन, 2020 अखेर पुर्ण होतील. 2 गावठाणातील भुसंपादनाची कार्यवाही खाजगी वाटाघाटीने करण्यात येत आहेत. एका गावाचे (मुक्रमाबाद) स्वेच्छा पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे. धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक जमिन व बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा वाटप करण्यात आलेला आहे. मुक्रमाबाद येथील घरांच्या मावेजांसाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीतुन निधी उपलब्धतेनुसार मावेजा वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. तसेच संपादित जमिनीच्या वाढीव मावेजा प्रकरणी मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार वेळोवेळी वाढीव मावेजा वाटप करण्यात येत आहे.
घळभरणी पुर्वी करावयाची अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच, धरणग्रस्त समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांना अनेकवेळा बैठक घेवून धरणाची घळभरणी वगळता उर्वरित कामास सुरुवात करु देण्याची विनंती वेळोवेळी करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधितांशी विचार विनिमय सुरु असून त्यांच्या कायदेशीर चौकटीतील मागण्यांची पुर्तता करण्यात येत आहे. तसेच स्वेच्छा पुनर्वसन सारख्या नाविण्यपुर्ण संकल्पना राबवून शासन स्तरावरुन विशेष मान्यता घेण्यात येत आहे.
          या प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन व तेलंगणा शासन यांचे दरम्यान झालेल्या करारनाम्यानुसार प्रकल्पाच्या 168 दलघमी पाणी वापरापैकी महाराष्ट्र राज्याचा 62 टक्के व तेलंगाणा राज्याचा 38 टक्के पाणी वापर आहे. प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यत मार्च, 2019 पर्यंत 504.30 कोटी येवढा खर्च झाला असून त्यापैकी भुसंपादनावर रु. 236.20 कोटी इतका खर्च झाला आहे. प्रकल्पीय राज्यनिहाय पाणी वापराच्या प्रमाणात(38 टक्के) धरण बांधकामासाठी  तेलंगणा राज्याकडून निधी प्राप्त झाला आहे. मुखेड तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असुन दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लावावे लागतात. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण झाल्यास कामावर आतापर्यत झालेला खर्च हा उपयोगी होवून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे आणि 26924 हे.जमिन ओलीताखाली येणार आहे. शासनाकडून हे काम पुर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने घळभरणीपुर्वीची कामे या वर्षी हाती घेवुन पुढील वर्षात घळभरणी करण्याचे नियोजित आहे. मुक्रमाबाद येथील घरांचा मावेजा वाटपास सुरुवात करण्यात आलेली असुन बुडित क्षेत्रातील सर्व कुटुंबाना घराचा व जमिनीचा मावेजा देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संपादित जमिनीत पिकाचे उत्पन्न प्रकल्पग्रस्त स्वत: घेत असल्यामुळे त्यांचे सध्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाचे बांधकाम सुरु करु देण्यास मनाई करणे योग्य नाही.
या कामास दि.20 फेब्रुवारी, 2020 नंतर केव्हाही सुरुवात करण्यात येईल. यावेळी कोणी व्यक्ती अथवा जमाव यांनी बांधकामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल याची नोंद घ्यावी. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे, लेंडी प्रकल्प विभाग, देगलुर कार्यकारी अभियंता  रा.मा.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


00000

Wednesday, February 12, 2020


     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात गुरुवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


नायगाव खै. पंचायत समितीची शुक्रवारी आमसभा
नांदेड, दि. 12 :- शासनाने पंचायत राज समितीच्या दिलेल्या सुचनेप्रमाणे पंचायत समिती स्तरावर नायगाव खै. पंचायत समितीची आमसभा आमदार राजेश पवार यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह निवासी शाळा (हरणटेकडी) नायगाव खै. येथे तहसिल कार्यालयाच्या जवळ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांची उपस्थित राहणार आहे. या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगावं खै. यांनी केले आहे. 
या सभेत घ्यावयाच्या विषयाची विषयसुची पुढीलप्रमाणे राहील. पं. स. नायगाव खै. सन 2013-14 च्या आमसभा अहवालावरील अनुपालन वाचन. सन 2018-19 मध्ये केलेल्या योजना व कामाचा आढावा. सन 2019-2020 मधील कामाचा आढावा. मा. अध्यक्षाच्या परवानगीने आयत्यावेळेचे विषय राहतील, असे गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी कळविले आहे.
00000


धर्माबाद पंचायत समितीची आज आमसभा
नांदेड, दि. 12 :-  धर्माबाद पंचायत समितीची सन 2019-2020 या वित्तीय वर्षाची आमसभा आमदार राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 13 फेब्रुवारी 2020 रोजी महेश्वरी भवन धर्माबाद (नगरपालिका धर्माबाद कार्यालयाच्या बाजुस) दुपारी 2 वा. होणार आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती कागेरु मारोती यांची उपस्थित राहणार आहे. या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती धर्माबाद यांनी केले आहे.  
या सभेत घ्यावयाच्या विषयाची विषयी सुची पुढीलप्रमाणे आहे. पंचायत समिती धर्माबादचे सन 2014-2015 च्या आमसभा अहवालावरील अनुपालन वाचन व त्यास मान्यता देणे. सन 2015-2016 ते 2019-2020 मध्ये मंजूर केलेल्या योजना व कामाचा आढावा घेणे. सन 2015-2016 ते 2018-2019 च्या अंदाजपत्रकास कार्योत्तर मान्यता देणे व आगामी सन 2019-2020 च्या सुधारीत व 2020-2021 च्या मुळ अंदाज पत्रकाचे वाचन व त्यास मान्यता देणेबाबत. तसेच अध्यक्ष यांच्या अनुमतीने ऐनवेळीची विषय राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...