Saturday, December 7, 2019


ग्रामीण भागातील शालेय मुलींचे शिक्षण
आरोग्य व सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य - जिल्हाधिकारी
नांदेड दि. 6 : जिल्हाधिकारी यांच्या दालनात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेचा सखोल आढावा शुक्रवार 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी घेतला. त्यामध्ये प्रमुख्याने जिल्हाधिकारी असे म्हणाले की निराधार व अत्यंत हलाखीच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबातील मुलींना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळांमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण व निवासाची व्यवस्था देण्यात येत आहे.
मुदखेड उमरी धर्माबाद बिलोली याठिकाणी असलेल्या चार बालिका विद्यालयांमध्ये एकूण 400 विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. सदरील निवासी शाळांना चांगल्या प्रकारच्या इमारती उपलब्ध असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी सदरील निवासी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या, त्यामध्ये प्रामुख्याने संध्याकाळी 5 च्या नंतर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पुरुष व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, केवळ मुलीच्या पालकांशीवाय इतरांना प्रवेश बंदी राहील, मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापिका, गृह प्रमुख व संपूर्ण कार्यालयीन कर्मचारी यांची राहील. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अद्यावत सोय करण्यात यावी आणि प्रत्येक निवासी खोलीमध्ये लाईटची अद्यावत सुविधा उपलब्ध करून घ्यावी. रात्रीच्या वेळेस शाळेमध्ये कुठेही अंधार राहता कामा नये याची काळजी संबंधित मुख्याध्यापिका यांनी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या, प्रत्येक मुलीला मी स्वतः सुरक्षित आहे असे आत्मविश्वासाने वाटणे अत्यंत गरजेचे असल्याचे सदरील बैठकीत जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशिक्षणे सदरील विद्यार्थिनींना देणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सुरक्षा समितीची बैठक
दर तीन महिन्याला घेण्याच्या सूचना करण्यात आल्या सदरील सुरक्षा समितीमध्ये अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख महिला अंगणवाडी परिवेक्षिका परिचारिका महिला पालक प्रतिनिधी व मुख्याध्यापिका सदस्य सचिव हे समिती सदस्य असतील सदरील निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगल्या प्रकारचा असावा त्यासाठी योग्य त्या पात्र शिक्षकांची शासन प्रचलित नियमानुसार नियुक्ती करावी शिक्षिकांच्या मानधनासाठी चे प्रस्ताव तातडीने जिल्हा मानवविकास कार्यालयाकडे सादर करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या, तसेच विद्यार्थिनींचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरमहा आरोग्य तपासणी शिबिर सदरील शाळांमध्ये आयोजित करायचं सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
मुदखेड येथील शाळेला मुख्य रस्त्यापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधित तहसीलदार यांना देण्यात आल्या, सदरील काम नगरपालिकेकडून करण्यात येईल असे तसीलदार यांनी सांगितले. विद्यार्थिनींची सुरक्षितता, उच्च दर्जाचे शिक्षण व आरोग्य या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे असे बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
000000



श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित
सोमवारी पूर्व तयारीची बैठक
नांदेड, दि. 7 :- श्री खंडोबाची माळेगाव यात्रा यावर्षी 24 ते 28 डिसेंबर 2019 या कालावधीत लोहा तालुक्यातील माळेगाव येथे भरणार आहे. या यात्रचे आयोजन व व्यवस्थापाबाबत पूर्व तयारीची बैठक आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 9 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा परिषद भांडार गृह माळेगाव ता. लोहा येथे दुपारी 2 वा. आयोजित केली आहे, अशी माहिती माळेगाव यात्रा उपसमितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद नांदेड यांनी दिली आहे.   
00000


माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 7 :- माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव 8 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 8 ते 12 डिसेंबर 2019 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर उपविभागीय पोलीस अधीकारी विलास जाधव व माहूर पोलीस स्टेशचे स्वाधीन अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी योग्य ते आदेश देणे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव व पोलीस निरीक्षक श्री राख यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.
000000


  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन
शुभारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा
         
नांदेड दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालय बचतभवन सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2019-20  संकलन  शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या आज हस्ते झाले.  
यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे, रा.प.म विभाग नियंत्रक अविनाश कचरे, ईसीएचएसचे अधिकारी मेजर बी थापा व जिल्हयातील कार्यलय प्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी स्वत: प्रत्येक वर्षी 11 हजार रुपये देवून इतर सर्व सहकाऱ्यांकडून निधी गोळा करुन देण्याचे सांगून  हा निधी  एक करोड पर्यंम जमा होईल असे आश्वस्त केले. यामध्ये सर्वांना सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, व्यापारी वर्ग व इतर दानशुर व्यक्ती आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम मोठया स्तरावर आयोजीत करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. आमदार श्री. हंबर्डे म्हणाले की, स्वत:  माजी सैनिक परिवारातील आहे माझे बंधू जवळचे नातेवाईक हे आर्मी मध्ये आहेत. मला सर्व सैनिकांची, माजी सैनिकांची आत्मीयता आहे.  
अध्यक्षीय भाषणात डॉ. सचिल खल्लाळ यांनी  ध्वजनिधी हा दोनशे प्रतिशत जमा होईल असे सांगुन सैनिकांच्या/ माजी सैनिकांच्या कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्यांनी सरळ भेटावे आम्ही त्यास प्राधन्य देवून असे नमुद केले. सन 2018-19 साठी शासनाने जिल्हयाला 35 लाख 50 हजार 512 रुपये एवढे उद्दिष्ट दिले होते ते  जिल्हयाने 51 लाख 17 हजार रुपये जमा करुन 145 टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे. यावर्षी देखील शासनाकडुन 35 लाख 50 हजार रुपये एवढे उद्दिष्ट दिले आहे. डिसेंबर 2019 मध्ये दुप्प्टीने निधी जमा करुन उद्दीष्ट पुर्ण करण्यात येईल, असे यावेळी डॉ. खल्लाळ यांनी सांगितले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांना पत्रक पाठवून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2019 मध्येच निधी जमा करण्याचे  आवाहन केले आहे.
या संकलनात जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा  तथा  महाविद्यालयांनी  मोलाचे  सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील ग्रामपंचायत व गांवकरी मंडळी पुढे ऐऊन निधी जमा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय शेळगांव गौरी  यांनी 1 लाख  एक हजार रुपये निधी जमा केल्याने संजय पाटील शेळगांवकर यांचा विशेष सत्कार आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हयातील  उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालयांना  प्रशस्तीपत्र  व सैनिकाबाबत महत्व असणारे विषयाचे  व इतर  कार्यालयीन उपयुक्त पुस्तके  भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हयातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार  करण्यात आला. आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप व  महाराष्ट्र राज्य तर्फे माजी सैनिकास क्रिडा क्षेत्रातील विशेष गौरव पुरस्कार प्रकाश लोंखडे यांचा पाल्य कुमार आशिष यास रोख रक्क्म 10 हजार रुपये प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आला. पत्रकार योगेश लाठकर व सुधाकर शंकरराव दिवान यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये दरवर्षी प्रमाणे प्रदान केला.
निधी संकलनाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी  कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ व प्रमुख पाहुणे यांना ध्वज लावून करण्यात आली.  कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली.  यानंतर सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे  यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून  ध्वजदिन निधीचे महत्व सांगून  संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व  माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती  दिली.  
या कार्यक्रमास जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, जवळपास 250 माजी सैनिक / विधवा / अवलंबित उपस्थित होते. प्रामुख्याने माजी सैनिक संघटना प्रमुख व्यंकट देशमुख, रामराव थडके, माजी सैनिक कर्मचारी संघटना विभाग प्रमुख पठाण हयुन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी सैनिक अजय कानोले यांनी केले तर  माजी सैनिक पठाण हयुन  यांनी आभार मानले.  कार्यक्रम  यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयाचे  सुभे मजीदवार, सुभे काशिनाथ ससाने,किशन गुरगुटवार, सुर्यकांत कदम, टिपरसे,  सुनिल नवघरे व गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 
000000

Friday, December 6, 2019


कारागृहात आरोग्य तपासणी संपन्न
नांदेड दि. 6 :- श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथील राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृह वर्ग-2, नांदेड येथील एकूण 75 कैद्यांचे उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच मानसिक आरोग्य यांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.
यासाठी जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता राठोड, मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणद जोशी, चिकित्सालयीन मानसशास्त्र डॉ. कैलास चव्हाण, प्रयोगशाळा अधिकारी संतोष बेटकर, अधिपरिचारिका सारिका तथोडे, रुपाली मस्के, यांनी उपस्थित राहून कैद्यांची तपासणी केली.
सदरील आरोग्य तपासणी शिबिरास कारागृह अधीक्षक चांदणे यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, यांनी परिश्रम घेतले.
000000


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान
योजनेसाठी अर्ज करण्यास 20 डिसेंबर मुदत
         नांदेड दि. 6 :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी नमूद कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास शुक्रवार 20 डिसेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन सुभाष राठोड प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावर उपलब्ध करुन घ्यावा.
सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in  हे संकेतस्थ्ळ पहावे. आवश्कता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क  साधावा.
000000


राष्ट्रीय लोकअदालतीचे
14 डिसेंबरला आयोजन
नांदेड दि. 6 :- राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडच्यावतीने शनिवार 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 
याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करुन सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 14 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक अ. धोळकिया  व  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...