Wednesday, August 1, 2018


सोशल मिडियातील फेक न्यूज
ओळखण्याची जबाबदारी प्रत्येकाची
- अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे
नांदेड, दि. 1 :- विविध सोशल मिडियाचा वापर करीत असतांना त्याच्या फायद्याबरोबरच त्याचे तोटे लक्षात घेऊन खरी व खोटी माहिती ओळखण्याची जबाबदारी आता प्रत्येक जागरुक नागरिकांची बनली आहे, असे प्रतिपादन भारतीय पोलीस सेवेतील अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉल येथे आयोजित कार्यशाळेत अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शिंदे बोलत होते. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक ए. जी. खान, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अशोक लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शिंदे पुढे म्हणाले, प्रिंट मिडियाबरोबर सोशल माध्यमांद्वारे माहितीची देवाण-घेवाण वाढली आहे. यातून आपले जीवन सोईस्कर झाले असले, तरी खोट्या माहितीतून कुठलीही दुर्देवी घटना होणार नाही याची जबाबदारी ओळखून प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. फेसबुक व व्हॉटस्अपवरील माहितीची सत्यता पडताळणी करणे महत्वाचे आहे. मिडिया प्रत्येक घरात पोहचत आहे. समाज माध्यम प्रबोधनात मिडियाचा महत्वाचा सहभाग आहे. समाज माध्यमावरील कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय ती पुढे फारवर्ड करु नये, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.    
गृह पोलीस उपअधीक्षक श्री. खान म्हणाले की, खोट्या बातमीतून समाजात दरी निर्माण होते. समाजात वाईट घटना घडणार नाहीत यासाठी समाज प्रबोधन आवश्यक आहे. मात्र समाज माध्यमाद्वारे चांगला संदेश नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे. नागरिकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.  
सायबर कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. सहाणे यांनी फेक न्यूजबाबत सविस्तर विवेचन करतांना सांगितले की, समाज माध्यमाद्वारे फेक न्यूज प्रसारीत केल्या जात असून त्यामुळे समाजात अफवा पसरविल्या जात आहेत. समाज माध्यमाचा गैरवापर थांबविण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. खोटे संदेश, फोटो, व्हिडीओ तयार करुन अंधश्रद्धेला व समाज विघातक घटनांना पाठबळ दिले जात आहे. यासाठी सामाजिक हित लक्षात घेऊन संदेशाची सत्यता पडताळूनच तो पुढे पाठवावा. समाज माध्यम वापराबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी यातून वाईट गोष्टी समाजात पसरले जाणार नाहीत याची खात्री करावी. प्रसार माध्यमांनी सामाजिक दृष्टीकोनातून याविषयी जनजागरण करावे. सध्या लहान मुले पळविणारी कुठलेही टोळी कार्यरत नसून अशा खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी फेक न्यूज कशा तयार केल्या जातात त्याचा वापर कशा केला जातो, त्या कशा ओळखल्या पाहिजेत याबाबत संवाद साधला. त्याविषयी शंका समाधान  करण्यात आले. या कार्यशाळेस प्रसार माध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    
00000

Tuesday, July 31, 2018


"फेक न्यूज परिणाम आणि दक्षता"
विषयावर पत्रकारांसाठी आज कार्यशाळा
            नांदेड, दि. 31 :- समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘फेक न्यूजबाबत दक्षता’ घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यात येत आहे. "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील "चिंतन हॉल" येथे दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, प्रतिनिधी दूरचित्रवाणी, केबल टिव्ही, छायाचित्रकार, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000


कापुस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात कापुस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. या पिकावरील किड संरक्षणासाठी नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कृषि संदेश दिला आहे. 
कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी कामबंध सापळे लावावे व निरीक्षण करावे. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. अंडीपुंजी तसेच लहान अळ्या आढळल्यास नष्ट कराव्यात. निंबोळी अर्क 5 टक्के या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000


माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार
नांदेड, दि. 31 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कारासाठी  माजी सैनिक विधवा यांचे पाल्य दहावी व 12 वी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा  पात्र पाल्यांनी विहित नमुन्यातील अर्ज 31 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार हा माजी सैनिकांच्या विधवा पाल्यामधून 10 वी 12 वी परिक्षेत राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन येणाऱ्या  पाल्यांना  दिला जातो.  राज्यातून  दोन माजी सैनिक विधवांच्या पाल्यांची निवड यासाठी केली जाते व त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अदा करण्यात येतात.  वर्ष 2017-18 मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक विधवा यांच्याकडून या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दूरध्वनी क्र. 02462-245510 वर संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.   
000000


विशेष गौरव पुरस्कारासाठी 
माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन राज्याची व देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे अशा  सर्व  माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांच्याकडून सन 2017-18 साठी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येते आहे.
यामधे राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळणारे, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहूमोल कामगिरी करणारे आदी कार्याबद्वल सन्मानार्थ पुढील प्रमाणे एकरकमी पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्तीपत्रक देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करणा-या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना रोख 10 हजार रुपये  व आंतरराष्ट्रीय पातळीवर बहूमोल कामगिरी करुन देशाची प्रतिष्ठा वाढवतील अशा माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार दिला जातो.   त्याचप्रमाणे दहावी व बारावी  परीक्षेत प्रत्येक मंडळातून 90 प्रतिशत पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येकी पहिल्या 5 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह / प्रशस्ती पत्रक देवून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. अशा विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांकडून विहीत नमुण्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अधिक माहिती व अर्जासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000


Monday, July 30, 2018


"फेक न्यूज परिणाम आणि दक्षता"
विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा
            नांदेड, दि. 30 :-  समाज विघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘फेक न्यूजबाबत दक्षता’ घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यात येत आहे. "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा बुधवार 1 ऑगस्ट 2018 रोजी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील "चिंतन हॉल" येथे दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, दूरचित्रवाणी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

Friday, July 27, 2018


सद्यस्थितीत कापसातील गुलाबी बोंडअळी ,
 रस शोषण करणाऱ्या कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन
            नांदेड, दि. 27 :- राज्यात कापूस पीकाची लागवड मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाली. चालु वर्षामत मान्सुनच्या पाऊस अपवाद वगळता जून महिण्यामध्ये जवळपास सर्वत्र झाला. त्यामुळे कोरडवाहू कापसाची लागवड जुनच्या अखेर पर्यंत झाली. मे महिण्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या शिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिनींग मिलमध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळ्यांमध्ये सापडत आहेत. त्यामुळे पाते-फुले लागण्याच्या अवस्थेत असणाऱ्या कापूस पीकावर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गुलाबी बोंडअळी :
मागील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासुणच झाला होता. त्यामुळे चालु हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. गुलाबी बोंडअळी सुरुवातीच्या अवस्थेत पांढऱ्या रंगाची असते व जसेजशी वाढ होईल त्यानुसार अळीचा रंग गुलाबी होऊ लागतो. पाते फुले व बोंडांच्या देठाजवळ या अळीचा पतंग अंडी देतो, अंड्यातुन बाहेर निघाल्यानंतर  1-2 दिवसांत अळी फुले / बोंडामध्ये जाते. अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर व्यवस्थापन करणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
अ) ट्रायकोकार्ड
·         अंडी अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची 1.5 लक्ष अंडी / हेक्टर पीक 45 व 55 दिवसाचे असतांना शेतामध्ये सोडावी. यासाठी हे परोपजीवी कीटक असलेले कार्ड (ट्रायकोकार्ड) झाडास बांधावे.
·         ट्रायकोकार्ड राष्ट्रीय कृषि प्रमुख कीड संशोधन ब्युरो, बेंगलुरु (080-23511982/98) येथे उपलब्ध आहेत.
·         या शिवाय अन्य शासकीय व खासगी संस्थांकडे उपलब्ध होतील. ट्रायकोकार्ड वरील ट्रायकोग्रामा हे कीटक अंड्यातुन बाहेर आल्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या अंड्यावर उपजिवीका करतात. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची अंड्यापासुण उत्पत्ती कमी होते.
ब) निंबोळी अर्क
·         अंडी व लहान अळीचे व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. त्यामुळे अंड्यातुन अळी बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. अंड्यातुन बाहेर निघालेली अळी निंबोळीचा वास व चवीमुळे खाणे थांबविते. त्यामुळे त्यांच्या संख्येत घट होते.
·         निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किग्रॅ निंबोळी 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवावी. निंबोळी युक्त द्रावण गाळुन हे द्रावण 100 लिटर होईपर्यंत पाणी टाकावे. अशाप्रकारे तयार केलेल्या निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी लगेच करावी.
·         बाजारातुन निंबोळी तेल घेतल्यास त्यातील घटकाच्या प्रमाणानुसार (300 पीपीएम - 75 मिली, 1500 पीपीएम – 50 मिली, 3000 पीपीएम – 25 मिली व 10000 पीपीएम – 10 मिली) फवारणीसाठी मात्रा वापरावी.
क) कामगंध सापळे
·         गुलाबी बोंडअळीची नुकसानीची पातळी समजण्यासाठी आणि पतंगांची संख्या कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
·         आर्थिक नुकसानीची पातळी समजण्यासाठी प्रति हेक्टर 5 सापळे (एकरी 2) पीकाच्या उंचीपेक्षा 1 फुट उंच बांधावे.
·         एका सापळ्यामध्ये आठ पतंग याप्रमाणे सलग तीन दिवस आढळल्यास गुलाबी बोंडअळीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे गृहित धरुन व्यवस्थापनाचे उपाय अवलंबावे.
·         अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडुन त्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 (एकरी 16) कामगंध सापळे कापसामध्ये लावावे. जेणेकरुन जास्तीत जास्त नर पतंग कामगंध सापळ्यांमध्ये पडतील व अळ्यांची पुढील उत्पत्ती कमी होईल.
·         याचबरोबर प्रकाश सापळ्यांचा वापर करुन देखील पतंगांची संख्या कमी करता येईल.
ड) कीटकनाशकाचा वापर
·         गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहण्यासाठी पीकामध्ये सर्वेक्षण करावे यासाठी विखुरलेल्या पध्दतीने फुले / बोंडामध्ये अळीची पाहणी करावी. जर 10 टक्के पेक्षा अधिक प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
·         यासाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी 20 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची साध्या पंपासाठी प्रति 10 लिटर पाणी या मात्रेत फवारणी करावी.
·         ऑक्टोबर नंतर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड 45 एससी 4 मिली किंवा फेनवलरेट 20 ईसी 6 मिली या कीटकनाशकाची फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कोणत्याही एकाच प्रकारे करणे शक्य नाही. म्हणून गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरीलप्रमाणे सर्व प्रकारे एकात्मिक पध्दतीने सामुदायीक रित्या करणे आवश्यक आहे.
रस शोषण करणाऱ्या कीडी :
सध्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पाने पिवळसर होऊन त्यानंतर कडा विटकरी रंगाच्या झाल्याचे आढळून येत आहे. काही ठिकाणी पिवळसर हिरव्या रंगाच्या मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन : तुडतुडे, मावा व फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी साध्या पंपाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क किंवा असिटामिप्रीड 25 एसपी 2 ग्रॅम किंवा थायामिथाक्झाम 25 डब्ल्युपी 2.5 ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड 50 डब्ल्युपी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावरस्प्रेचा वापर करावयाचा असल्यास किटकनाशकाचे प्रमाण तिनपट वापरावे, असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड यांनी कळविले आहे.
000000

वृत्त क्रमांक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लखमापूर येथे जलताराचे उद्घाटन...