Friday, July 27, 2018


सद्यस्थितीत कापसातील गुलाबी बोंडअळी ,
 रस शोषण करणाऱ्या कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन
            नांदेड, दि. 27 :- राज्या कापूस पीकाची लागवड मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाली. चालु वर्षामन्सुनच्या पाऊस अपवाद वगळता जून महिण्यामध्ये जवळपास सर्वत्र झाला. त्यामुळे कोरडवाहू कापसाची लागवड जुनच्या अखेर पर्यंत झाली. मे महिण्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या शिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिनींग मिलमध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळ्यांमध्ये सापडत आहेत. त्यामुळे पाते-फुले लागण्याच्या अवस्थेत असणाऱ्या कापूस पीकावर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गुलाबी बोंडअळी :
मागील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासुणच झाला होता. त्यामुळे चालु हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. गुलाबी बोंडअळी सुरुवातीच्या अवस्थेत पांढऱ्या रंगाची असते व जसेजशी वाढ होईल त्यानुसार अळीचा रंग गुलाबी होऊ लागतो. पाते फुले व बोंडांच्या देठाजवळ या अळीचा पतंग अंडी देतो, अंड्यातुन बाहेर निघाल्यानंतर  1-2 दिवसांत अळी फुले / बोंडामध्ये जाते. अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर व्यवस्थापन करणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
अ) ट्रायकोकार्ड
·         अंडी अवस्थेत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची 1.5 लक्ष अंडी / हेक्टर पीक 45 55 दिवसाचे असतांना शेतामध्ये सोडावी. यासाठी हे परोपजीवी कीटक असलेले कार्ड (ट्रायकोकार्ड) झाडास बांधावे.
·         ट्रायकोकार्ड राष्ट्रीय कृषि प्रमुख कीड संशोधन ब्युरो, बेंगलुरु (080-23511982/98) येथे उपलब्ध आहेत.
·         या शिवाय अन्य शासकीय व खासगी संस्थांकडे उपलब्ध होतील. ट्रायकोकार्ड वरील ट्रायकोग्रामा हे कीटक अंड्यातुन बाहेर आल्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या अंड्यावर उपजिवीका करतात. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची अंड्यापासुण उत्पत्ती कमी होते.
ब) निंबोळी अर्क
·         अंडी व लहान अळीचे व्यवस्थापनासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. त्यामुळे अंड्यातुन अळी बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते. अंड्यातुन बाहेर निघालेली अळी निंबोळीचा वास व चवीमुळे खाणे थांबविते. त्यामुळे त्यांच्या संख्येत घट होते.
·         निंबोळी अर्क तयार करण्यासाठी 5 किग्रॅ निंबोळी 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवावी. निंबोळी युक्त द्रावण गाळुन हे द्रावण 100 लिटर होईपर्यंत पाणी टाकावे. अशाप्रकारे तयार केलेल्या निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी लगेच करावी.
·         बाजारातुन निंबोळी तेल घेतल्यास त्यातील घटकाच्या प्रमाणानुसार (300 पीपीएम - 75 मिली, 1500 पीपीएम – 50 मिली, 3000 पीपीएम – 25 मिली व 10000 पीपीएम – 10 मिली) फवारणीसाठी मात्रा वापरावी.
क) कामगंध सापळे
·         गुलाबी बोंडअळीची नुकसानीची पातळी समजण्यासाठी आणि पतंगांची संख्या कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
·         आर्थिक नुकसानीची पातळी समजण्यासाठी प्रति हेक्टर 5 सापळे (एकरी 2) पीकाच्या उंचीपेक्षा 1 फुट उंच बांधावे.
·         एका सापळ्यामध्ये आठ पतंग याप्रमाणे सलग तीन दिवस आढळल्यास गुलाबी बोंडअळीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे गृहित धरुन व्यवस्थापनाचे उपाय अवलंबावे.
·         अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडुन त्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 (एकरी 16) कामगंध सापळे कापसामध्ये लावावे. जेणेकरुन जास्तीत जास्त नर पतंग कामगंध सापळ्यांमध्ये पडतील व अळ्यांची पुढील उत्पत्ती कमी होईल.
·         याचबरोबर प्रकाश सापळ्यांचा वापर करुन देखील पतंगांची संख्या कमी करता येईल.
ड) कीटकनाशकाचा वापर
·         गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहण्यासाठी पीकामध्ये सर्वेक्षण करावे यासाठी विखुरलेल्या पध्दतीने फुले / बोंडामध्ये अळीची पाहणी करावी. जर 10 टक्के पेक्षा अधिक प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
·         यासाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी 20 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची साध्या पंपासाठी प्रति 10 लिटर पाणी या मात्रेत फवारणी करावी.
·         ऑक्टोबर नंतर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅड 45 एससी 4 मिली किंवा फेनवलरेट 20 ईसी 6 मिली या कीटकनाशकाची फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कोणत्याही एकाच प्रकारे करणे शक्य नाही. म्हणून गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरीलप्रमाणे सर्व प्रकारे एकात्मिक पध्दतीने सामुदायीक रित्या करणे आवश्यक आहे.
रस शोषण करणाऱ्या कीडी :
सध्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पाने पिवळसर होऊन त्यानंतर कडा विटकरी रंगाच्या झाल्याचे आढळून येत आहे. काही ठिकाणी पिवळसर हिरव्या रंगाच्या मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन : तुडतुडे, मावा व फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी साध्या पंपाकरीता 5 टक्के निंबोळी अर्क किंवा असिटामिप्रीड 25 एसपी 2 ग्रॅम किंवा थायामिथाक्झाम 25 डब्ल्युपी 2.5 ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड 50 डब्ल्युपी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावरस्प्रेचा वापर करावयाचा असल्यास किटकनाशकाचे प्रमाण तिनपट वापरावे, असे कापूस विशेषज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...