Thursday, May 3, 2018

जलयुक्त शिवार योजनेतील
अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत
 - पालक सचिव एकनाथ डवले

नांदेड, दि. 3:-  जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे येत्या जून अखेर पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होतेेेे.  
श्री डवले म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची कामे येत्या जुनपर्यंत पूर्ण करावीत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. ज्या कामांच्या निविदा तीनवेळा काढूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत लोकसहभागातून कामे घेण्यात यावीत. गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करावा. कंत्राटदारांनी विहीत मुदतीत कामे केली नाहीत तर त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत संबंधित विभागाने जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवावेत. तसेच नाला खोलीकरण, रुंदीकरणाची कामे घेण्यात आली आहेत. त्या नाल्यामध्ये गॅबियन बंधाऱ्याची कामे प्रायोगिक तत्वावर घेण्यात यावीत अशीही सुचना पालक सचिव श्री डवले यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसचित जाती  उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद तसेच झालेल्या खर्चाचा आढावाही पालक सचिव श्री डवले यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.        
**** 

Wednesday, May 2, 2018


एमएचटी- सीईटी 2018 परीक्षा
आयोजनासाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 2 :- एमएचटी सीईटी 2018 या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेसाठी नियुक्त उपकेंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठीचे प्रथम प्रशिक्षण वर्ग नुकतेच संपन्न झाले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी तहसिलदार सुरेश घोळवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार उज्ज्वला पांगरकर या उपस्थित होत्या.
परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे पी. डी. पोपळे यांनी बारावी नंतरचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा टप्पा महत्वाचा असल्याने परीक्षा सुरळीत संपन्न होण्यासाठी संबंधितांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी. तसेच उपकेंद्र प्रमुख यांनी आपला मोबाईल परिक्षेच्या दिवशी केवळ नियंत्रण कक्षातच वापरावा. इतर सर्व पर्यवेक्षक व समवेक्षक यांनी आपले मोबाईल नियंत्रण कक्षात पुर्णवेळ ठेवावेत, असे सांगितले.
तहसिलदार श्री. घोळवे यांनी आपला परिक्षेतील अनुभव सांगतांना वारंवार सांगून प्रशिक्षण देऊनही न कळतपणे काही समवेक्षक व पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका वाटप करतांना चुका करतात. त्या त्यांनी टाळल्या पाहिजे, अशी सुचना केली.
परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहे, जिल्ह्यात एकूण 34 परीक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या 10 हजार 154 इतकी आहे. गुरुवार 10 मे 2018 रोजी होणारी एमएचटी-सीईटी 2018 ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र (फार्मसी), फार्मडी व कृषि शास्त्र या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. केंद्राची विभागणी एमएम, एमबी, बीबी अशी करण्यात आली आहे. जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होणार आहे.
एमएम केंद्रावर पेपर-1 गणित व पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे. एम. बी. केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे. बीबी केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने ओएमआर शीट उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षक म्हणून केंद्राच्या संस्थेच्या प्रमाणात नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही. 
प्रा. डी. एम. लोकमनवार यांनी परीक्षेची रुपरेषा व जबाबदारीचे वाटप याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. प्रा. डॉ. एस. एस. चौधरी व प्रा. दमकोंडवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रथम प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. यादव, डॉ. डक, प्रा. कळसकर, प्रा. मुधोळकर, प्रा. साहूसाकडे, श्री. दुलेवाड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्योती बाराळीकर, दिपक गुरनळे, शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
परिक्षा आयोजनासाठी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवार 8 मे 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी उपकेंद्र प्रमुख समवेक्षक, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या मदतीला सात सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.
000000


डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळण्यास प्रारंभ
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारामुळे नागरिकांची सोय
जमीन नोंदणीची प्रक्रिया पारदर्शी होणार   
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
           
नांदेड, दि. 2 :- ऑनलाईन स्वरुपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा वितरणामुळे नागरिकांच्या सोयी बरोबर जमीन नोंदणीची प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्याचे वितरण जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे नुकतेच 1 मे रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नागपूर विभागाचे उपायुक्त सुधाकर तेलंग, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, श्रीमती दिपाली मोतीयेळे, व्ही. एल. कोळी, तहसीलदार किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी सातबारा देण्याच्या कामात नांदेड जिल्‍हा राज्‍यात आघाडीवर असल्याचे नमूद करुन जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात चावडी वाचन पुर्ण करुन आक्षेपानुसार संगणकीकृत सातबारा मुळ हस्‍तलिखीत सातबाराशी तपासून 99.94 टक्के काम पुर्ण झाले आहे. डिजीटल स्‍वाक्षरीयुक्‍त ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्यात येत आहे. या कामात तलाठ्यांच्‍या समस्या जाणून त्या सोडविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.     
ऑनलाईन स्वरुपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारासाठी जिल्‍हा नियोजन विभागाच्‍या नाविन्‍यपुर्ण योजनेतून माहिती व तंत्रज्ञान म‍हामंडळाकडून मंडळ अधिकारी व तलाठ्यांना 386 लॅपटॉप व प्रिंटर्स वितरीत करण्‍यात आले होते. या कामासाठी जिल्ह्यातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तयार करण्याच्या प्रक्रियेत उत्कृष्ट व अचूक काम करणाऱ्या तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.  
संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वितरणानंतर काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार श्रीमती मिना सोलापूरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी, कोतवाल आदी उपस्थित होते.
000000


खाजगी बस, ट्रॅव्हल्सकडून अधिक तिकिटदर
आकारल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 :- खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदी कंत्राटी वाहनांचे महत्तम भाडेदर निश्चित केले आहे. कंत्राटी बस परवानाधारकाकडून विहितदरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्यास 022- 6242666 या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
तसेच ही तक्रार परिवहन विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल. तक्रारी संदर्भात चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबनाची / रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहन खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदींना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
शनिवारी सचिन ढवळे यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 2 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड मनपा, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" माेहिमेंतर्गत शनिवार 5 मे 2018 रोजी सकाळी 9.30 ते सायं 5 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे गणित व बुद्धिमता या विषयावर पुणे येथील सचिन ढवळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000000

Tuesday, May 1, 2018


महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ संपन्न
मतभेद विसरुन एकतेची भावना जपली पाहिजे
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 1 :- आपसातील मतभेद विसरुन आपण एका कुटुंबातील भारत मातेची लेकरं आहोत अशी एकतेची भावना जपली पाहिजे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर ते संदेशपर भाषणात बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींची उपस्थिती होती.   
आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस असून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली म्हणून सर्वांना न्याय मिळाला आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये महाराष्ट्र स्थापनेचा मुहुर्त कळस दिला आणि पहिले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. भाषावाद प्रांतानुसार कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरील 40 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यास इच्छूक आहेत. या मराठी बांधवाचा महाराष्ट्रात समावेश होईल त्यादिवशी संपुर्ण महाराष्ट्र असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी कामगारांना न्याय मिळाला. कामगार दिन 1923 ला पहिल्यांदा मद्रासला साजरा झाला. कामगारांच्या संघटना झाल्या, नौकऱ्या मिळाल्या व खऱ्या अर्थाने आठ तास कामाचा अधिकार कामगारांना मिळाला. कामगार दिन जवळपास ऐंशी देशात साजरा केला जातो. "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" असे सांगून राज्यातील जनतेच्या सामर्थ्याचा, श्रमाचा गौरव करुन पालकमंत्री श्री. कदम यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक एस. डी. राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियानाच्या चित्ररथास पालकमंत्री कदम यांनी हिरवी झेंडी दाखवून रस्ता सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ केला. व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.

पालकमंत्री कदम यांच्या हस्ते
प्रवास पास, पुरस्काराचे वितरण  
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेंतर्गत पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणारा अजीवन मोफत प्रवास पास वीर पत्नी श्रीमती अरुणाताई टर्के ( शहिद ज्ञानोबा गोविंदराव टर्के, मराठा लाइट इन्फ्रर्टी  शहिद दि. 2 मार्च 2003 ऑपरेशन मोहिम ओ.पी. रक्षक जम्मु आणि काश्मिर ) यांना देण्यात आला. आदर्श तलाठी पुरस्कार- आर. एस. वागतकर पांडुर्णा ता. भोकर, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र- भगवान कापकर, अनिलकुमार आदोडे, संभाजी होनराव, शेख हैदर महमद इस्माईल. दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी नांदेड व कृष्णुर पाणीपुरवठा योजनेच्या व जलशुद्धीकरण केंद्रातील बंदीस्त कोरड्या पाण्याच्या टँकमध्ये पेटींग काम करत असताना क्लोरीनेटेड रबर पेटंच्या गॅसमुळे बेशुद्ध पडलेल्या चार कामगारांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल अग्नीशमन अधिकारी अतुल मांगलकर व सहकारी, सन 2016-17 मध्ये कंधार तालुक्यातील डोंगरगाव येथील लिंबोटी धरणाच्या पुरात 16 नागरिकांना व नांदेड शहरातील ड्रेनेजमध्ये पडलेले माणसे, नाल्यामध्ये आडकलेल्या गाई वाचवणे, अपत्तीच्यावेळी विविध ठिकाणी प्रसंगी जिवाची परवा न करता नांदेड, उस्मानाबाद, परभणी व इतर जिल्ह्यात जाऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनपाचे अग्नीशमन अधिकारी शेख रईस पाशा व सहकारी. जिल्हा क्रीडा पुरस्कार : गुणवंत खेळाडू- सुनिल प्रधान, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- लक्ष्मण फुलारी, क्रीडा संघटक- सय्यद अजगर अली पटेल. जिल्हा युवा पुरस्कार- नागोराव भांगे, महेश्वरी तादलापूरकर. शुभंकरोती फाऊंडेशन नांदेड. या सर्व पुरस्कार व पारितोषीक विजेत्यांना पालकमंत्री कदम यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तसेच रोख स्वरुपातील पारितोषीके प्रदान करुन शुभेच्छाही दिल्या.
रोजगार दिनदर्शिकेचे
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते प्रकाशन
राज्य शासनाने 1 ऑक्‍टोंबर 2016 पासून प्रमुख 11 कामे मोहिम स्‍वरुपात घेण्‍यासाठी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत "समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण" योजना सुरू केली आहे. क्षेत्रिय स्‍तरावर या योजनेचा प्रचार होण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने तयार करण्यात आलेल्या रोजगार दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
  या दिनदर्शिकेत प्रमुख 11 कामांसह रेशीम उद्योग विकास योजना, गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शिवार योजनेची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली आहे. ही रोजगार दिनदर्शिका नांदेड जिल्‍हयातील सर्व जिल्‍हास्‍तरावरील तसेच तालुकास्‍तरावरील कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालयात प्रदर्शित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
000000

Monday, April 30, 2018


स्काऊट गाईड चळवळीतून देशसेवेची प्रेरणा
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 30 :- स्काऊट गाईड चळवळ ही जागतिक स्वरुपाची असून यातून देशसेवेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन राज्याचे  पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या मल्टीपर्पज हायस्कूल परिसरातील नांदेड भारत स्काऊटस्‍ आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री. कदम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आ. अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, स्काऊट गाईडेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, माजी आमदार गंगाधर पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
श्री कदम म्हणाले, स्काऊट गाईडमुळे मनात देशभक्ती बरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारिरीक, मानसिक विकासाचा प्रयत्न केला जातो. येथील स्काऊट गाईडचे भवन उत्कृष्ट बांधण्यात आले आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असेही सांगितले.   
प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी स्काऊट गाईड चळवळीचे स्वरुप सांगितले. यावेळी  भारत स्काऊट गाईडचे राज्य उपाध्यक्ष एल. एन. कोंडावार, जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती बी. एम. बच्चेवार, सचिव बी. पी. कुदाळे, कोषाध्यक्ष एन. एम. तिप्पलवाड, जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट पी. एम. कुलकर्णी, जिल्हा संघटन आयुक्त गाईड रुपाली मुधोळकर, जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट दिगंबर करंडे, पदाधिकारी, अधिकारी व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.
000000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...