Thursday, March 15, 2018


जलजागृती सप्ताहाचे आज उद्घाटन
नांदेड, दि. 15 :- नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्यावतीने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शुक्रवार 16 मार्च 2018 रोजी गोदावरी, पुर्णा, मानार, पैनगंगा, लेंडी, कयाधु, मांजरा या नद्याच्या पाण्याच्या कलश पुजनाने जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
जलजागृती सप्ताहाचे आयोजन 16 ते 22 मार्च 2018 या कालावधीत साजरा करण्यात आले आहे. या दरम्यान लाभक्षेत्रात प्रत्येक गावात कार्यशाळा घेण्यात येऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जलजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवार 18 मार्च 2018 रोजी सकाळी 6.30 वा. महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा (आयटीआय) ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अशी "जल दौड" घेण्यात येणार आहे. या जल दौडीत नागरिकांनी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घ्यावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी केले आहे.
0000000


सोशल मीडियाचा उपयोग
समाज निर्मितीसाठी करावा
-        जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 15 :- आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने नांदेड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल मीडियाचे आजच्या काळातील महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी डोंगरे पुढे म्हणाले की, या माध्यमामुळे संदेशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या सामाजिक माध्यमांचा प्रभावही तितकाच जास्त वाढत आहे. अनेकांशी जोडण्याच्या या नवीन माध्यमाचा वापर चांगल्या समाजोपयोगी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला गेला तर खऱ्या अर्थाने चांगली समाज निर्मिती होऊ शकते. महामित्र हा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे सोशल मीडियातील प्रभावी युवक-युवती शासनाशी जोडले जात आहेत. या व्यक्तींनी भविष्यात चांगले संदेश, चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावा, अशी सुचना करुन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील वैशिष्ट्यपुर्ण योजनांची माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्य राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा गौरविले गेले आहे, असे सांगून त्यांनी नांदेड जिल्ह्याची परिपूर्ण माहिती देणाऱ्या ॲप्लीकेशनची निर्मिती केल्याचे सांगून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
जलयुक्त शिवार अभियान, तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमातून जलसंवर्धनाची चळवळ जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने राबविलेल्या महामित्र उपक्रमाचे विशेष कौतूक केले. केवळ प्राप्त झालेले संदेश कोणताही विचार न करता फारवर्ड करण्याची चुकीची पद्धत बदलून कोणताही संदेश विचार करुन फारवर्ड केल्यास आपण अधिक कार्यक्षमपणे समाजाला दिशा देवून शकतो हा विचार प्रत्येकाने बाळगावा असेही ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर आणि अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख विजय मोरगुलवार यांनी प्रास्ताविक करुन पाहुण्यांचे स्वागत केले. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनीही यावेळी आपल्या भाषणात सोशल मीडियाचा वापर समर्पक समाजाच्या उद्धारासाठी करण्याचे आवाहन केले व अध्यापक महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधांचा आढावा देत या महाविद्यालयाच्या स्वत:च्या इमारत उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या प्रश्नाविषयी उहापोह केला. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांनी जिल्हाधिकारी डोंगरे यांचा यथोचित सत्कारही केला.
परीक्षक मंडळीच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. वैजनाथ अनमुलवार यांनी मनोगत मांडले.
नांदेड जिल्ह्यातील नऊ क्षेत्राच्या टॉप सहभागींचे नऊ संवादसत्र (गटचर्चा) सकाळी याठिकाणी घेण्यात आल्या. यामध्ये सोशल मीडिया महामित्र ॲपद्वारे टॉप ठरलेल्या व्यक्तींनी सहभाग नोंदविला या संवादसत्रासाठी डॉ. कल्पना बेलोकर, व्ही. एम. कल्याणपाड, एस.एस. दासरवार, प्रा. महेश मोरे, डॉ. भास्कर भोसले, डॉ. सुलभा मुळे, डॉ. वैजनाथ अनमुलवार, सुनिल हुसे, प्रा. सु. गं. जाधव, डॉ. एस. एस. सोळंके आणि माधव चुकेवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व परीक्षकांचा पुष्पगुच्छ व लोकराज्य अंक देवून सत्कार करण्यात आला. संवादसत्रात सहभागी व्यक्तींना संदर्भमूल्य असलेली महाराष्ट्र वार्षिकी पुस्तिका आणि लोकराज्य अंक देवून गौरविण्यात आले. सहभागींना वर्षेभर लोकराज्य अंक मोफत पाठविण्यात येणार असून प्रमाणपत्र थेट ॲपवरुन डाऊनलोड करुन मिळणार आहे. शेवटी विजय होकर्णे यांनी सर्वांचे आभार मानले तर अनुलोमचे बळीराम पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. हारुण शेख  व त्यांचे सर्व सहकारी तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रविण बिदरकर, महमंद युसूफ, विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, बालनरस्या यांनी तसेच अनुलोम संस्थेचे अशिष चौधरी, राम साळवेश्वरकर, प्रविण श्रीमनवार, पांडुरंग बुद्धेवार, विष्णु माने आदिंनी परिश्रम घेतले.
00000

Monday, March 12, 2018


चाणक्य पुरस्काराने देवेंद्र भुजबळ सन्मानित 


पुणे दि. 12 : देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांना प्रतिष्ठेच्या ‘चाणक्य’ पुरस्काराने  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
येथे नुकतेच पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाची दोन दिवसीय 12 वी ग्लोबल कम्युनिकेशन परिषद झाली. यामध्ये प्रतिष्ठेच्या चाणक्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पब्लीक रिलेशनमधील तज्ज्ञ मॅथ्यू, पीआरसीआचे पदाधिकारी एम. बी. जयराम, विजयलक्ष्मी, आर. डी. कुमार, बी. एन. कुमार, आर. टी. कुमार, वेणूगोपाल यांच्यासह  देशभरातून पब्लीक रिलेशनमध्ये काम करणाऱ्या मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत जनसंपर्क क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे तज्ज्ञ सहभागी होतात. यावर्षीची 12 वी परिषद ‘ट्रान्सफॉर्म’ या संकल्पनेवर आधारीत होती.  या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांना या परिषदेत सन्मानित करण्यात आले.
या वर्षी शासनाच्या जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कम्युनिकेटर ऑफ द इयर ‘चाणक्य’ पुरस्काराने देवेंद्र भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. देवेंद्र भुजबळ हे 1991 पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. सध्या ते संचालक (माहिती) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी केसरी या मराठी वृत्तपत्रापासून आपल्या कामाला सूरूवात केली, नंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन येथे प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून सहा वर्षे काम केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागात त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 
या परिषदेला देशभरातून जनसंपर्क क्षेत्रातील विविध मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.     
*****


प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची
-माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

औरंगाबाद, दि.12 :- शासकीय व खाजगी प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची असून माध्यमांच्या बदलत्या युगात स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता विकसीत केली गेली पाहिले, असे मत माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी  आज येथे व्यक्त केले.
देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेच्या ‘चाणक्य’ पुरस्काराने नुकतेच पुणे येथे श्री.भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त्‍ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभाग औरंगाबाद कार्यालयात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
श्री.भुजबळ पुढे म्हणाले, माध्यमांमध्ये काम करताना कल्पकतेसोबतच भाषेलासुध्दा फार महत्व आहे. आधुनिक युगात माध्यमांचे स्वरुप बदललेले आहे. त्याचबरोबर माध्यमांचे तंत्रसुध्दा बदललेले आहे. त्यामुळे विशेष शैलीत लिखाण केल्यास त्याची दखल विविध माध्यमांत घेतली जाते. त्यामुळे सतत लिखाण करणे आवश्यक आहे. शासकीय सेवेत राहुन विविधांगी लिखाणामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. आपण करत असलेल्या सेवेचा फायदा वंचित घटकांपर्यत करुन देणे महत्वाचे असते. माध्यमात काम करताना बदलत्या माध्यमाचा वापर करुन आपण कल्पकतापूर्ण लिखाण केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.  हा कॉर्पोरेट पुरस्कार असून जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेमार्फत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनस्वी खुप आनंद झाला आहे असे ते म्हणाले. 
कार्यक्रमात लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे आपल्या मनोगतात म्हणाले की, देवेंद्र भुजबळ यांच्या 32 वर्षाच्या शासकीय सेवेतील उत्कृष्ट कामाची नोंद म्हणून त्यांना चाणक्य पुरस्काराने गौरविले आले आहे ही महासंचालनालयासाठी फार मोठी गौरवाची बाब असून देशपातळीवरील जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेतर्फे शासकीय गटातून श्री.भुजबळ यांना हा पुरस्कार देण्यात आला, असे सांगुन त्यांनी श्री.भुजबळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकुर, माहिती अधिकारी वंदना थोरात, माहिती सहायक संजीवनी पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले तर संहिता लेखक रमेश भोसले यांनी आभार व्यक्त केले. 
या कार्यक्रमाच संचालक माहिती कार्यालयातील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
******



जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत
लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी प्रसिद्ध
पात्र अर्जदारांनी कर्ज मंजुरीचे पत्र ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 12 :- जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंतीम करण्यासाठी महाऑनलाईनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांनी वित्तीय संस्थेकडून विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र शुक्रवार 23 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल व मृद संधारणाच्या कामांना गती मिळावी व स्किल  इंडियाच्या धर्तीवर ग्रामीण भागातुन कुशल उद्योजक तयार करणे या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने, "जलसमृद्धी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून अर्थमुव्हर्स खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात दि. 31 जानेवारी, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करून योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.  ही यादी  जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीयकृत बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील पात्र अर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून सदर योजनेतंर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे शुक्रवार 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावयाचे आहे.
कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा रु.17.60 लक्ष राहील व त्यानुसार पाच वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम रु.5.90 लक्ष पर्यंत राहील. अशी अट वित्तीय संस्थेस (बँक) मान्य असल्याचे स्पष्टपणे नमूद असावे. कर्ज मंजुरी बाबतचे संपूर्ण अधिकार हे संबंधित बँक / वित्तीय संस्थेचेच राहणार असून या संदर्भातील बँकेच्या असणाऱ्या संपूर्ण अटी व शर्ती यांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थी यांची राहील.
वित्तीय संस्था / बँकेकडून कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची संख्या जास्त असल्यास जिल्हा स्तरीय समितीने जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्षांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. यामुळे पात्र लाभार्थी यांनी बँकेचे विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आहे. दि. 23 मार्च 2018 नंतर दाखला सादर करणाऱ्या अर्जदारांचा विचार लाभार्थी निवडताना करण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...