Thursday, February 1, 2018

कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम
समाजापुढे आदर्श निर्माण करणारे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 1 :-  मनात इच्छा, आत्मविश्वास असेल तर ध्येयपूर्ण होतात. त्यादृष्टीने सेवा भावनेतून हाती घेतलेले कुष्ठरोग शोध मोहिमेतील काम समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम सन 2017-18 मध्ये पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहीम यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने विशेष सत्कार व गौरव सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे काल (ता. 31) संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. एल. परतवाघ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शाम नागपूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, साडेतीन पिठापैकी असलेल्या रेणुका देवीचा आशिर्वाद व श्री गुरु गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनित आहे. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी दिनदुबळ्या गरजूची सेवा केली आहे. ही सेवावृत्ती नांदेड जिल्ह्यात मोठी आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात 264 रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या सेवेलाच ईश्वर सेवा मानली पाहिजे. कुष्ठरुग्णांच्या सेवेचा आदर्श  बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबियांचा आहे. तो आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असून यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. यात संशयीत महिला रुग्णांची तपासणी करुन रुग्ण बरा होईपर्यंत उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुष्ठरोग शोध मोहिमेत आरोग्य विभागाने नियोजनबद्ध ध्येय ठेवून काम केल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी मोहिमेतील सर्वांचे अभिनंदन केले.
मनपा आयुक्त देशमुख यांनी रुग्ण सेवा मनापासून केली तर खूप मोठा आनंद देणारी सेवा आहे. कुष्ठरोग शोध मोहिमेत सर्वांनी सकारात्मक राहून उत्स्फुर्त सहभाग घेतल्यामुळे राज्यात नांदेड अग्रस्थानी राहिला आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. परतवाघ यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात 5 ते 20  सप्टेंबर 2017 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 264 कुष्ठरोग रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यांच्यावर पुर्ण उपचार करुन त्यांना निरोगी करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी सत्कारानंतर मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला शासकीय परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाची माहिती देणारे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. किशोर आतनुरकर यांनी केले तर या मोहिमेत सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. आईटवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक संचालक कार्यालयाचे सुरेश गाजुलवार, संतोष टाकळकर, सुनील पाटील, सुनील बिडवई, अशोक हरनालीकार, श्रीमती अनुसया गिरी तसेच सुलू कार्यालयातील सर्वश्री भुरे, रौअत, शंकपाले, बांगे, श्रीमती सोळंके, श्री गजभारे तसेच श्री होळ्गे व मुंडे यांनी केले.

000000
जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा संपन्न ;
कापडी पिशव्यांसाठी
उद्योजकांचा सहभाग गरजेचा 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 1 :-  प्लॉस्टीक मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला आहे. प्लॅास्टीकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या तयार करुन मोफत वाटप करण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून उद्योजकांचा आर्थिक सहभाग असणे गरजेचा आहे. यासाठी उद्योजकांनी त्यांचा निधी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी-अडचणी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल (ता. 31) संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद राठी, उद्योजक हर्षद शहा, आनंद बिडवई, सतीश सामते, महेश देशपांडे, अधिक्षकीय उद्योग अधिकारी उदय पुरी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, महावितरण, महापारेषण, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, एमआयडीसीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.  
            जिल्हाधिकारी डोंगरे यांनी कृष्णुर एमआयडीसीमध्ये विद्युत उपकेंद्र उभारणी, नांदेड औद्योगिक क्षेत्रात अखंडीत वीज पुरवठा, औद्योगिक वसाहतीतील रस्ते व ड्रेनेज लाइन आदी निगडीत विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यात उद्योगाच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या सभेत जिल्ह्यातील लघु उद्योजक संघटनांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.
                                                                                    000000

Tuesday, January 30, 2018

कर्जमाफीचा लाभ अद्याप न मिळालेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी
बँकेशी संपर्क साधावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन
            मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
            शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.
            कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरीत सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी अंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

००००
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
1 फेब्रुवारीला आयोजन
नांदेड दि. 30 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवार 1 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 यावेळेत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन ‍शिबिरास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न  होणाऱ्या  या शिबिरात पुणे येथील सुजीत पवार  हे सर्वसाधारण बुद्धीमत्ता व गणीत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी धर्माबाद येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन व उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांचे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राहणार आहे. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

000000

Monday, January 29, 2018

जिल्हा उद्योग केंद्राची आज सभा  
           नांदेड, दि. 30 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुर्नजीवन जिल्हास्तरीय समिती सभा बुधवार 31 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.     

000000
हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 29 :- हरभरा घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी कार्बेडेझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
जवाहर नवोदय विद्यालयाच्या
सहावी प्रवेश परीक्षा तारखेत बदल

नांदेड दि. 29 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा शनिवार 10 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात येणार नाही. प्रशासकीय कारणामुळे या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. एच. व्ही प्रसाद यांनी केले आहे.
0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...