Tuesday, December 6, 2016

रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमाबाबत
माहिती पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :-  रस्ता सुरक्षा विषयक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे कामाच्या संदर्भात पॉवर पॉईट सादरीकरण जास्तीतजास्त 15 स्लाईड तयार करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. त्यानंतर त्यांची नावे परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांना बुधवार 7 डिसेंबर रोजी कळविण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  

000000
निवडणूक निरीक्षक पाटील यांना आज
अर्धापूर, मुदखेड, उमरी येथे भेटता येणार
नांदेड, दि. 6 :- राज्य निवडणूक आयोगाने अर्धापूर नगरपंचायत, मुदखेड व उमरी नगरपलिकेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नांदेडचे अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीसंबंधाने जनतेच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्यासाठी बुधवार 7 डिसेंबर 2016 रोजी संबंधित तहसिल कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
निवडणूक निरीक्षक श्री. पाटील हे बुधवार 7 डिसेंबर रोजी तहसिलदार यांचे कक्ष तहसिल कार्यालय अर्धापूर येथे सकाळी 10 ते 11 यावेळेत, तहसिल कार्यालय मुदखेड येथे दुपारी 12 ते 1 यावेळेत तसेच तहसिल कार्यालय उमरी येथे दुपारी 3 ते 4 यावेळेत सार्वत्रिक निवडणुकीसंबंधाने जनतेच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहतील.

000000
नागरिकांना कॅशलेस व्यवहारासंबंधी
शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
-         जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

नांदेड, दि. 6 :- दैनंदिन व्यवहारात डिजीटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाण केल्यास आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत. त्यासाठी सामान्य नागरिकांना व कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देण्याकरीता जिल्ह्यातील शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली.
नोटाबंदीमुळे नागरिकांना आर्थिक अडचणी जाणवत आहेत. डिजीटल पेमेंटद्वारे यातून मार्ग निघू शकतो. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात कॅशलेस व्यवहाराचा वापर करावा. सामान्य नागरिकांनाही त्याचे मार्गदर्शन करावे. कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांनाही कॅशलेस व्यवहारासंबंधी माहिती व प्रशिक्षण दयावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही प्रशिक्षण आयोजित केले आहे,  असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सांगितले.
कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल ॲप, प्रिपेड कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट यासारख्या सुविधांबरोबर अविस्तृत पुरक सेवा माहिती (USSD) या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाईल फोनच्या इंटरफेसमधून इंटरनेटशिवाय पैसे पाठविणे शक्य आहे. या सर्व सुविधांच्या महत्वाबाबत लहान व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून बाजार समित्या, आठवडी बाजार, मोठी आस्थापना, कार्यालय, बँका, मोंढा आदी ठिकाणी प्रशिक्षण वर्ग हाती घेण्यात आले आहे.  
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले जात आहे. बँकांनीही काही महत्वाची गावे कॅशलेस करण्याचे उद्दीष्ट ठेवून कार्यवाही करावी. कॅशलेस व्यवहार अधिकाधिक व्हावेत , डिजीटल व्यवहार व्हावेत यासाठी विविध घटकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाबरोबर जनजागृतीही करण्यात येणार आहे. यामुळे डिजीटल व्यवहाराची व्याप्ती वाढेल. रोखीने आर्थिक व्यवहाराचे प्रमाण कमी होईल. त्याद्वारे व्यवहारात पारदर्शकता आणणे सहज शक्य आहे. म्हणून नागरिकांनी यापद्धतीचा अवलंब करुन अधिकाधिक डिजीटल व्यवहार करावे , असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे.
000000

Monday, December 5, 2016

जिल्हा वार्षिक योजनाचा निधी वेळेत खर्च करावा
– जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड, दि. 5 :-  जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ), अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनांचा सन 2016-17 या आर्थिक वर्षातील निधी सर्व संबंधित विभागाने वेळेत खर्च करावा , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.  
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. थोरात, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना सन 2016-17 करीता नोव्हेंबर 2016 अखेर योजनानिहाय मंजूर तरतूद, उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी, झालेला खर्च व होणारी बचत आणि अपूर्ण व नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सध्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणूक आचारसंहिता शहराच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादीत आहे. आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास योजनेची कामे पूर्ण करुन निधी खर्च करण्यास कालावधी कमी मिळणार आहे. म्हणून प्रत्येक विभागाने तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निधी उपलब्ध करुन घेणे आदींबाबत कार्यवाही वेळेत करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीनंतर कॅसलेस व्यवहारांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या सोई-सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. सादरीकरणातून दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाणही करण्याच्या सुलभ पद्धतीची माहिती देण्यात आली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, शासकीय अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी या कॅसलेस बँकिंग व्यवहाराचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करावा. नागरिकांनाही या व्यवहाराचे महत्व पटवून देवून त्यांनाही प्रेरित करावे , असे त्यांनी आवाहन केले.

000000
धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीच्या
      दुसऱ्या प्रशिक्षणाचे मंगळवारी आयोजन

नांदेड, दि. 5 :- धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी असून त्‍यानुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे आयोजित केले आहे. संबंधितांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केले आहे. 
धर्माबाद नगरपरिषद निवडणूक
मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन
नांदेड दि. 5 :-  धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 च्‍या अनुषंगाने मतदान निर्भय व मुक्‍त वातावरणामध्‍ये पार पाडण्‍यासाठी, लोकशाही दृढ होण्‍याकरीता मतदार जनजागृती अभियान निमित्ताने  मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. रॅली सकाळी 9 वा. नगरपरिषद धर्माबाद येथून निघणार आहे.
            तसेच बुधवार 7 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, गुरुवार 8 डिसेंबर रोजी रांगोळी स्‍पर्धा आयोजन, शुक्रवार 9 डिसेंबर रोजी घोष वाक्‍यस्‍पर्धा अशा विविध स्‍पर्धेचे आयोजन मतदार जनजागृती अभियानांतर्गत करण्‍यात आले आहे. जनजागृती रॅलीस उपस्थित राहण्‍याचे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केले आहे.   

0000000

Saturday, December 3, 2016

माहूरगड श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 3 – माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव शुक्रवार 9 ते बुधवार 14 डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागांसह, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व  इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे व शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये शुक्रवार 9 डिसेंबर ते बुधवार 14 डिसेंबर 2016 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर उपविभागीय पोलीस अधीकारी रमाकांत खरात व माहूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी योग्य ते आदेश देणे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण व पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. सदरचा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक येनपुरे यांनी जारी केले आहेत.

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...