Saturday, October 15, 2016

जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबर
नांदेड, दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय यामधील ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय आणि दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे  शासन  परिपत्रक पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन,
 ई-बुकचे सामुहिक वाचन संपन्न
            नांदेड, दि. 15 :- वाचनाचा हेतू ज्ञान मिळविण्यासाठी, अभ्यासासाठी, विरंगुळयासाठी, मनोरंजनासाठी असा असला तरी खरे वाचन स्वत:ला ओळखण्यासाठी करावयाचे असून वाचन ही एक तपश्चर्या,साधना असायला हवी अशा वाचनातून स्वत:ची ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्सचे सामू‍हिक वाचन कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार अर‍विंद नरसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी,संभाजी शिंदे,बसवराज कडगे,कुबेर राठोड,विठठल काळे, शिवाजी पवार,‍दिनकर कोलते,श्रीनिवास शेजूळे यांची उपस्थिती होती.
            ‍जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ प्रदर्शन व ई-बुक्स सामूहिक वाचन या विषयी माहिती ‍दिली. तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारसरणी विषयी माहिती देऊन डॉ.कलामांचे चरित्र सदैव सर्वांना प्रेरणादायी राहील असा विश्वास व्यक्त केला. निर्मलकुमार सुर्यवंशी,कुबेर राठोड यांनीही मनेागत व्यक्त केले.
            कार्यक्रमात वसंत बारडकर यांनी 75 ग्रंथ व दिनकर कोलते यांनी 1 ग्रं‍थ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास भेट दिला. विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्स साहित्याचे मोठया प्रमाणावर वाचन करुन डॉ.कलामांना आदराजंली वाहिली. विद्यार्थीनींनी वाचन प्रेरणा दिनाची काढलेली सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. संजय कर्वे,अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड,मयूर कल्याणकर,ओंकार कुरुडे, सोपान यनगुलवाड, विठठल यनगुलवाड, आर.डी.मुंजाळ, सोनाली देशमुख,सुजाता वाघमारे,सुप्रिया करले यांनी संयोजन केले.

0000000
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :- भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याची मुदत शुक्रवार 21 ऑक्टोंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक व राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000

Friday, October 14, 2016

लेख-

किनवट, माहूर आदिवासी भागात
महिलांना अमृत आहार योजनेतून मिळतोय चौरस आहार

नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे तालुके दुर्गम व डोंगराळ आहेत. या भागात आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे. हे आदिवासी पारंपारीक शेती उद्योगावर आपला उदरनिर्वाह करतात. आदिवासी प्रगत व्हावेत व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावे अमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत किनवट, माहूर तालूक्यातील 22 हजार 852 आदिवासी महिला लाभार्थ्यांना दिवसातून एक वेळेस चौरस आहार देण्यात येत आहे.
            जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने किनवट, माहूर तालूक्यात अमृत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंडल स्थापन केले आहेत. किनवट तालुक्यातील या 9 मंडळामध्ये इस्लापूर, जलधारा, बोधडी, शिवणी, मांडवी, अंबाडी, राजगड, उमरी, दहेलीतांडा ह्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील 253 अंगणवाडी शाळेवर अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. माहूर तालुक्यात 6 मंडळामध्ये माहूर, आष्टा, वाई, वानोळा, सिंदखेड, येवलेश्वर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. माहूरमधील 70 अंगणवाडी शाळेत ही योजना सुरू असून दोन्ही तालुक्यातील 323 अंगणवाडी शाळेत गरोदर महिला व स्तनदा मातांना दररोज एक वेळेचे पूर्ण जेवण दिले जात आहे.
            अमृत आहार योजनेत गरोदर महिला व स्तनदा मातांना चौरस आहारामध्ये डाळ, भात, पालेभाजी, चपाती, भाकर, दर शनिवारी शेंगदाणा लाडू, महिन्यातून 16 दिवस अंडी, केळी, सोया, नाचणी हलवा, कडधान्य, साखरेसह दूध देण्यात येत आहे. किनवट तालुक्यात जवळपास 123 तर माहूरमधील 52 अशा एकूण 175 वाडी, गाव, तांडा या ठिकाणी चौरस आहार, स्थानिक महिला व अंगणवाडी सेविकाच्या मदतीने ताजा, तयार करून देण्यात येत आहे.
            राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना प्रसुती झालेल्या (स्तनदा माता) महिलांसाठी अत्यंत उपयोगाची ठरली आहे. बालक सुदृढ करण्यासाठी प्रसुती नंतर 6 महिने चौरस आहारात पौष्टीक पदार्थ देण्यात येत आहेत. लहान बालकांचे वजन वाढावे, बाळ निरोगी रहावे यासाठी दर आठवड्याला वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याच्या देखरेखीत वैद्यकिय पथक तयार केले आहे. गाव, वाडी, तांडा येथे असलेल्या अंगणवाडी शाळेतील सेविका, मदतनिस, प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने ही योजना राबविल्या जात आहे. अमृत आहार योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका पासुन ते प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी वेळोवेळी शासनाकडून तालुका व जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.          किनवट, माहूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या गरोदर महिलांच्या बालकांची गर्भातच चांगली वाढ व्हावी, बालक सुदृढ, वजनदार जन्मास यावे यासाठी दररोज चौरस आहारात बदल करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका नवजात बालकांच्या जन्मापासून प्रत्येक महिन्याला अंगणवाडीमध्ये नोंद करीत आहेत.
           
अमृत आहार योजनेचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात नवजात बालकांचे संगोपन, आरोग्य आहार पुरवठा अशी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किनवट, माहूर तालुक्यात अमृत आहार योजनेत 22 हजार 852 महिला लाभार्थींना चौरस आहार पुरविण्यात येत आहे. अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. जी. चाटे, किनवटचे विस्तार अधिकारी  सोनावणे, माहूरचे सि.डी.पी.ओ. श्री. सोनार यांनी दिली.
            अमृत आहार योजना आता राज्याच्या आदिवासी क्षेत्रात प्रभावीपणे राबविली जात आहे. गरोदर महिला, प्रसुती नंतरचे नवजात बालक सुदृढ होण्यामुळे दुर्गम, डोंगराळ आदिवासी क्षेत्रातील महिलांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. महाराष्ट्राची ही कुपोषण मुक्तीची वाटचाल आहे.

-         रविंद्र पी. सोनकांबळे  
मो. 9422174147
(लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)
00000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...