Friday, October 14, 2016

लेख-

किनवट, माहूर आदिवासी भागात
महिलांना अमृत आहार योजनेतून मिळतोय चौरस आहार

नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर हे तालके दुर्गम डोंगराळ आहेत. या भागात आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे. हे आदिवासी पारंपारीक शेती उद्योगावर आपला उदरनिर्वाह करतात. आदिवासी प्रगत व्हावेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावे अमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत किनवट, माहूर तालूक्यातील 22 हजार 852 आदिवासी महिला लाभार्थ्यांना दिवसात एक वेळेस चौरस आहार देण्यात येत आहे.
            जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने किनवट, माहूर तालूक्यात अमृत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंडल स्थापन केले आहेत. किनवट तालक्यातील या 9 मंडळामध्ये इस्लापूर, जलधारा, बोधडी, शिवणी, मांडवी, अंबाडी, राजगड, उमरी, दहेलीतांडा ह्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील 253 अंगवाडी शाळेवर अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. माहूर तालक्यात 6 मंडळामध्ये माहूर, आष्टा, वाई, वानोळा, सिंदखेड, येवलेश्वर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. माहूरमधील 70 अंगणवाडी शाळेत ही योजना सुरू अस दोन्ही तालुक्यातील 323 अंगणवाडी शाळेत गरोदर महिला स्तनदा मातांना दररोज एक वेळेचे पूर्ण जेव दिले जात आहे.
            अमृत आहार योजनेत गरोदर महिला स्तनदा मातांना चौरस आहारामध्ये डाळ, भात, पालेभाजी, चपाती, भाकर, दर शनिवारी शेंगदाणा लाडू, महिन्यातून 16 दिवस अंडी, केळी, सोया, नाचणी हलवा, कडधान्य, साखरेसह दूध देण्यात येत आहे. किनवट तालुक्यात जवळपास 123 तर माहूरमधील 52 अशा एकूण 175 वाडी, गाव, तांडा या ठिकाणी चौरस आहार, स्थानिक महिला अंगवाडी सेविकाच्या मदतीने ताजा, तयार करून देण्यात येत आहे.
            राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना प्रसुती झालेल्या (स्तनदा माता) महिलांसाठी अत्यंत उपयोगाची ठरली आहे. बालक सुदृढ करण्यासाठी प्रसुती नंतर 6 महिने चौरस आहारात पौष्टीक पदार्थ देण्यात येत आहेत. लहान बालकांचे वजन वाढावे, बाळ निरोगी रहावे यासाठी दर आठवड्याला वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. दोन्ही तालक्यात प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याच्या देखरेखीत वैद्यकिय पथक तयार केले आहे. गाव, वाडी, तांडा येथे असलेल्या अंगणवाडी शाळेतील सेविका, मदतनिस, प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने ही योजना राबविल्या जात आहे. अमृत आहार योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका पासुन ते प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी वेळोवेळी शासनाकड तालका जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.          किनवट, माहूर तालक्यातील आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या गरोदर महिलांच्या बालकांची गर्भातच चांगली वाढ व्हावी, बालक सुदृढ, वजनदार जन्मास यावे यासाठी दररोज चौरस आहारात बदल करण्यात येत आहे. अंगवाडी सेविका नवजात बालकांच्या जन्मापासून प्रत्येक महिन्याला अंगवाडीमध्ये नोंद करीत आहेत.
           
अमृत आहार योजनेचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात नवजात बालकांचे संगोपन, आरोग्य आहार पुरवठा अशी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किनवट, माहूर तालुक्यात अमृत आहार योजनेत 22 हजार 852 महिला लाभार्थींना चौरस आहार पुरविण्यात येत आहे. अशी माहिती महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. जी. चाटे, किनवटचे विस्तार अधिकारी  सोनवणे, माहूरचे सि.डी.पी.ओ. श्री. सोनार यांनी दिली.
            अमृत आहार योजना आता राज्याच्या आदिवासी क्षेत्रात प्रभावीपणे राबविली जात आहे. गरोदर महिला, प्रसुती नंतरचे नवजात बालक सुदृढ होण्यामुळे दुर्गम, डोंगराळ आदिवासी क्षेत्रातील महिलांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. महाराष्ट्राची ही कुपोषण मुक्तीची वाटचाल आहे.

-         रविंद्र पी. सोनकांबळे  
मो. 9422174147
(लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)
00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1145   सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्ती ची  कार्यपद्धत   नांदेड दि.  27   नोव्हेंबर :   संपूर्ण राज्या...