Thursday, June 25, 2026

वृत्त क्रमांक 

शेतकऱ्यांची चिंता मिटली ; यंदाच्या हंगामापासून सहायकच नोंदविणार पीक पेरा

राज्यभरात येत्या 15 जुलै पासून मोहिमेस सुरवात ; शेतकऱ्यांनी सहायकांना सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 जून:- सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता स्वत: धावपळ करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षात ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे मिळालेला कमी प्रतिसाद यामुळे राज्य सरकारने यंदापासून ही पाहणी थेट तहसील स्तरावर नियुक्त सहायकामार्फत करण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलै पासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहिम सुरु होत आहे. 

ई- पीक पाहणी का महत्वाची

शासकीय योजना, पीक कर्ज आणि पीक विम्याचा लाभ मिळविण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अचूक भरपाई मिळण्यास मदत होते.

सरकारी सहायकच घेणार पिकांची नोंदणी

आता सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे. यंदापासून तहसीलदार यांनी नियुक्त केलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची अधिकृत नोंदणी करणार आहेत.

बचत गटातील महिलांची घेणार मदत

या मोहिमेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी स्थानिक महिला बचतगटांची मदत घेतली जाणार आहे. बचत गटातील महिलांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन पीक पाहणीच्या कामात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

काय आहे ई-पीक पाहणीची प्रक्रीया

डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे थेट सातबारा उताऱ्यावर करण्याची ही एक शासकीय यंत्रणा आहे. यामुळे अचूक पीक पेऱ्याची नोंद होते. आतापर्यत शेतकरी मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करायचे आता ती प्रक्रीया सहाय्यक करेल. 

ग्रामीण भागात सर्वाकडे स्मार्टफोन उपलब्ध असतोच असे नाही. तसेच अनेक शेतांमध्ये मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असते. या तांत्रिक अडचणीमुळे आधी अनेक शेतकरी ई-पीक पाहणी करण्यापासून वंचित राहात होते. यामुळे यावर्षीपासून सहाय्यकच करतील पीक पेरा नोंदणी. 

मोबाईलवर येणार मेसेज

ही संपूर्ण यंत्रणा आता केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक या डिजीटल कृषी परिसंस्थेशी जोडली जात आहे. यामुळे पीक पाहणी पूर्ण होताच, त्याची खात्रीशीर माहिती आणि कन्फर्मेशन मेसेज थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला जाणार आहे.

जिल्ह्यात 1560 महसूली गावे असून 525 पर्यवेक्षक व 1600 सहाय्यक यांची पीक पाहणी पूर्ण करण्याकरिता नेमणूक करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांचा त्रास कमी करणे आणि सातबारावरील पिकांची ऑनलाईन नोंद अचूक होणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 15 जुलैपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत शेतकऱ्यांनी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.

00000



वृत्त क्रमांक 

जिल्ह्यासाठी 5 दिवस येलो अलर्ट जारी 

नांदेड दि. 25 जून :- जिल्ह्यात 25 जून रोजी तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २६ ते २९ जून २०२६ हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. 

आकाशात विजा चमकत असल्यास या गोष्टी करा  

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

वृत्त क्रमांक 

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

नांदेड दि. 25 जून :- शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी संबंधित अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक प्रसंग आहे. ज्यातून हिंदवी स्वराज्याला अधिकृत सार्वभौम मान्यता मिळाली आहे.  शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे मराठी साम्राज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण होय. श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड गुरूवार 25 जून रोजी  सोहळा उत्साहात  साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सुर्यवंशी तसेच प्रमूख पाहूणे तथा वक्ते म्हणून कृष्णाजी  देशमुख लाभले. कार्यक्रमासाठी संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. शिंदे, रमाकांत परतने तसेच  संस्थेतील सर्व कर्मचारी प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 

शिवराज्याभिषेक सोहळयाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे रा.से.योजनेचे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए.  यांनी केली. प्रस्तावनपर भाषणात त्यांनी राष्ट्राचे भविष्य आजचा युवक कोणाला आदर्श मानतो, यावर अवलंबून आहे असे सांगितले. प्रमूख वक्ते कृष्णाजी देशमुख यांनी आपले विचार मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, स्वाभिमानी जीवनशैली, युध्दनिती, पर्यावरण विषयक विचार, स्त्रियांबाबतच विचार आणि आजचा समाज यावर अत्यंत मार्मिक शब्दात मत प्रकट केले.  छत्रपती  शिवाजी महाराजांना मा जिजाउंनी महान पुरूषांच्या कथा सांगत घडवले. तसेच आजच्या काळात आपण स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण जीवनशैली जगून भविष्य सुखकर करावे, असे  आवाहन केले.       

आभार प्रदर्शन करताना संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी आजच्या युवकांनी आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी गुण अंगीकृत करावा, असे सांगितले राष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकृत करणे आवश्यक आहे असे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेतील शिल्प निदेशक परमेश्वर उभेदळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरणेसाठी  संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

000000

Wednesday, June 24, 2026

वृत्त क्रमांक 

चार दिवस येलो अलर्ट जारी

नांदेड, दि. 24 जून : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २४ जून २०२६ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २४ ते २७ जून २०२६ हे चार दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.   दिनांक २४, २६ व २७ जून २०२६ हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा व दि. २५ जून २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

आकाशात विजा चमकत असल्यास:

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

वृत्त क्रमांक 

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास लोहा तालुक्यात प्रारंभ

नांदेड, दि. २४ जून:— भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision - SIR) 2026 राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील सर्व मतदारांना गणना फॉर्म (EF) भरून देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत दि. 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. भेटीदरम्यान प्रत्येक मतदाराला गणना फॉर्म वितरित करण्यात येणार असून तो काळजीपूर्वक भरून संबंधित अधिकाऱ्याकडे परत करणे बंधनकारक राहणार आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार, गणना फॉर्मसोबत अलीकडील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ती BLO यांच्याकडे जमा करावीत. फॉर्म भरून परत करण्याची जबाबदारी संबंधित मतदाराची राहणार आहे.

फॉर्म सादर न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याने सर्व मतदारांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विठ्ठल परळीकर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, लोहा यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड येथे 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन

नांदेड दि. २४ जून:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे.

या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 08 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

समता दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा राहणार असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल.

या समता दिंडीत नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

शासकीय तंत्रनिकेतन,नांदेडच्या निकालाची उत्तुंग भरारी

नांदेड दि. २४ जून :- नुकत्याच जाहीर झालेल्या MSBTE उन्हाळी परीक्षा 2026 च्या पॉलिटेक्निक परीक्षेच्या निकालात महाविद्यालयातील विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे  लक्ष वेधून घेतले आहे. 

IT,ME,CE,EE, MU आणि PG या शाखातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उच्च  गुण घेऊन महाविद्यालयाचे  नाव उज्वल केले आहे.

यावर्षी विशेष करून महाविद्यालयानी 100 टक्के निकालाची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उत्तीर्णतेमुळे तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष मिळते. जास्तीत जास्त विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.    

गुणवत्ता सुधारणा, तांत्रिक शिक्षण पद्धती, प्रात्यक्षिकांमधील सातत्य आणि परीक्षांच्या दर्जेदार पद्धतींमुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे. खालील विद्यार्थ्यांनी संबंधित शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

IF 6K सोनटक्के शैलेंद्र दीपक 94.12% ,   PG 6K राजगोरे समीक्षा उद्धवराव   91.72%,    ME 6K साळवे दक्षराज विकास 90.39% ,      MU 6K बिरादार अंजली रत्नाकर 92.00%, EE 6K जाधव प्रेरणा परमेश्वर 94.72% ,  CE 6K रविशा आर मोंढे 91.50 % या घवघवीत यशा करिता संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. एन एल जानराव यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच तंत्रनिकेतन कडे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तंत्रशिक्षण संचालनालय यांनी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.आता प्रथम वर्ष पदविका करीता अर्ज सादर करण्यासाठी सुधारित अंतिम तारीख 02 जुलै 2026 निर्धारित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सुधारित अंतिम तारखेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

000000



वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...