Friday, August 29, 2025

 वृत्त क्रमांक 914

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानातर्गंत

 शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- सन 2025-26 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान या नावाने राबविण्यात येत आहे. यामध्ये बायोचार या घटकांचा समावेश केला आहे. यासाठी केंद्र : राज्य 60 : 40 टक्के याप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्नधान्याच्या गरजेसोबतच नगदी पिकांचीही गरज भागविण्यासाठी कापूस पिकाचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कापूस अंतर्गत, बायोचार ही बाब नव्याने प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हास्तरावर 7 चे लक्षांक प्राप्त आहे.

उद्दिष्टे :- बायोचार वापरामुळे जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढून जमीनीची सुपिकता वाढवणे. शेतातील कापूस पिकाचे पऱ्हाट्याचा वापर करुन जमिनीतील कार्बनचे प्रमाणे वाढवून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे.लाभार्थी : वैयक्तिक लामार्थी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/ कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था.

अनुदान दर : 10 हजार रुपये प्रति युनिट किंवा खर्चाच्या 50 टक्के यापैकी निम्नतम दर. लाभार्थी निवड : लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलव्दारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल. लाभार्थी निवड झालेल्या व पुर्वसंमती प्राप्त होऊन बायोचार युनिट उभारण्यास तयार असणाऱ्या लाभार्थ्यांना एक दिवशीय प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, कृषी विदयापीठ, शासकीय संशोधन संस्था इ. मार्फत देण्यात येणार आहे.

तरी इच्छुक वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/ कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बायोचार या घटकासाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 913

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीत

अर्ज करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यत मुदतवाढ

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 होती. तरी आता या जाहिरातीस मुदतवाढ देण्यात आली असून सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेतपर्यत अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ दिली आहे. 

तरी विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यत सादर करावीत. अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in येथील ताज्या घडामोडी या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. 

00000

 सुधारित दि. 29 ऑगस्ट 2025

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, नांदेड 

 

महोदय,

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मा. पालकमंत्री श्री. अतुल सावे हे आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायं. ८ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड  येथे  येणार आहेत, तरी आपण उपस्थित रहावे, ही विनंती. 


प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

           नांदेड

0000000000000000


दि. 29 ऑगस्ट 2025


प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, नांदेड 

 

महोदय,

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मा. पालकमंत्री श्री. अतुल सावे हे आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड  येथे  येणार आहेत, तरी आपण उपस्थित रहावे, ही विनंती. 


प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

           नांदेड

वृत्त क्रमांक 912

पालकमंत्री अतुल सावे यांचा दौरा 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 29 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने सायं. 6 वा. नांदेड येथे आगमन व अतिवृष्टी स्थळांची पाहणी करतील. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. 

00000

वृत्त क्रमांक 911

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेवून बचावकार्य सुरु 

अति आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील  सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ, सीआरपीएफ, नांदेड मनपा व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे.

पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणासोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अति आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

नांदेड येथील पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालीयनला बोलाविले आहे. तात्पुरते स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत असून, कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद कंधार मंडळ व माळाकोळी मंडळ (लोहा) मध्ये प्रत्येकी 284.50 मि.मि. नोंदविली आहे. 

तालुकानिहाय अतिवृष्टी झालेली मंडळे- नांदेड 07, बिलोली-06,मुखेड-08, कंधार -07, लोहा-06, हदगांव-05, भोकर-04, देगलूर-05, किनवट-01, मुदखेड-03, हिमायतनगर-01, धर्माबाद-04, उमरी-04, अर्धापूर-03, नायगांव-05 मंडळात अतिवृष्टी नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्याच्या पर्जन्यमान हे 65.00 मि.मि. पेक्षा जास्त असून, त्यापैकी 11 तालुक्याचे पर्जन्यमान हे 100.00 मि.मि. पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तेलंगाना राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर, पोचमपाड या धरणातील बॅक वॉटर व विसर्गामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद व मुखेड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यत एकूण 5 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एसडीआरएफ, सीआरपीएफ, स्थानिक पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्तीग्रस्त लोकांना हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. 

अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील 3 तलाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यत एकूण 3 व्यक्ती नैसर्गिक आपत्तीकारणाने मयत असून 01 व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध चालू आहे. यामध्ये नायगाव तालुक्यातील 1 इसम, उमरी तालुक्यातील रेल्वे विभागातील कार्यरत 1 रेल्वे  स्टेशन अधिक्षक यांचा मृत्यू, किनवट तालुक्यात विज पडून 1 व्यक्तीचा मृत्यू तर किनवट येथील एक व्यक्ती बेपत्ता आहे. 

नांदेड जिल्ह्याला प्रभावीत करणारे धरण, लघु, मध्यम प्रकल्प, बॅरीकेज स्थिती 

• उर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर टक्केवारी, 5 दरवाजे उघडले असून विसर्ग 8 हजार 313 क्युसेस आहे.

• येलदरी धरण ता. जिंतूर जि. हिंगोली-येलदरी धरणाच्या उर्ध्व बाजुने आवक कमी झाली असल्याने आज सकाळी 7 वाजता येलदरी धरणाचे गेट क्र. 5 व 6 बंद करण्यात आले आहेत. गेट क्र.01 व 10 हे 0.5 मी. ने चालू असून 4 हजार 219.94 क्युसेस (119.496 क्युमेकस) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात चालू आहे. स्पीलवे गेटमुळे पुर्णा नदीपात्रात  स्पीलवे गेट-4 हजार 220 +हायड्रोपावर 2 हजार 700 क्युसेस असा एकूण 6 हजार 920 क्युसेस (196 क्युमेकस) विसर्ग सुरू आहे. 

• सिध्देश्वर धरण ता. औंढा जि. हिंगोली- 343.792 क्युमेकस /12141 क्युसेस.

• शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प- 10 दरवाजे उघडले असून विसर्ग 119,008 क्युसेस .

• बळेगाव उच्च पातळी बंधारा ता. उमरी जि. नांदेड- सर्व 16 दरवाजे उघडले असून विसर्ग 5 हजार 97 क्युमेक्स आहे. बंधाऱ्याच्या उर्ध्व बाजूच्या विष्णुपूरी प्रकल्पातून 2 हजार 880 क्युसेस विसर्ग सुरु. सद्यस्थितीत बंधाऱ्याची पातळी 345 मी (FRL-342m) इतकी असून पाण्याची आवक पाहता अजून वाढण्याची शक्यता आहे.  

• निजामसागर प्रकल्प- या प्रकल्पाचे 23 गेट उघडले असून एकूण ओव्हर फ्लो 1,67,541 क्युसेस आहे. 

• अपर मानार प्रोजेक्ट, लिंबोटी- सकाळी 5.30 वाजता 12 दरवाजे 1.5 m व 3 दरवाजे 2 m ने चालु केले असून 2065 क्युमेकस (72275क्युसेस) विसर्ग सुरु आहे. 

अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे. 

000000




पावसामुळे किनवट येथील परिवहन विभागाचे नियोजित एक दिवसीय शिबिर रद्ध करण्यात आले आहे.

 





 

वृत्त क्रमांक माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जिल्हाध...