Tuesday, May 27, 2025

 वृत्त क्रमांक 543

अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ कृषी विभागाचे आवाहन

नांदेड दि. 27 मे :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजनेअंतर्गत अर्धापूर तालुक्यातील अपघातात मृत्यु पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना व अपघातात एक, दोन अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अर्धापूर तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष तहसिलदार अर्धापूर, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी व इतर सदस्य गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी आहेत. 

तहसिलदार अर्धापूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, अर्धापूर येथे तालुकास्तरीय समितीची बैठक घेऊन त्यात पात्र लाभार्थ्यांना अपघातात मृत्यू पावलेले यांच्या वारसांना दोन लाख व अपघातात एक अवयव निकामी होणे यांना एक लाख असे लाभ देण्यात येत असून आजपर्यत सन 2023 मध्ये 6 प्रस्ताव व 2024 मध्ये 17 प्रस्ताव समितीसमोर मंजूर, नामंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी 16 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड कार्यालयामार्फत वारसांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येत आहे. 

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसिलदार रेणुकादास देवणीकर व सचिव तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांनी केले आहे. 

0000

वृत्त क्रमांक 542

माजी सैनिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन                                                               

नांदेड दि. 27 मे :-भारत सरकारच्या उपमहासंचालक, सिव्हिल डिफेन्स यांच्या नेत्वृत्वाखाली मॉक ड्रिल सराव आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सिव्हिल डिफेन्स रेग्युलेशन 1968 नुसार ईएसएम माजी सैनिक यांची भरती करावयाची आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक साठी आपले नाव तात्काळ जिल्हा सैनिक कार्यालयास नोंदणी करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 541

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

नांदेड दि. 27 मे :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 जून 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर याकुब शेख यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 30 जूल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर रु.450/-, तीन चाकी वाहनांसाठी रु.500/- व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी रु. 745/- इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटी चा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 26 मे 2025 रोजी पर्यत 21 हजार 658 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून अद्याप ९ हजार ३८३ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. वाहनधारकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे व वाहनधारकांना अत्यल्प प्रतिसादामुळे व वाहनधारकांना येणारा दंड टाळण्यासाठी वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम ३० जून २०२५ रोजी पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Monday, May 26, 2025

वृत्त क्रमांक 540

बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था करता येतील अर्ज 

नांदेड दि. 26 मे : खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी पिक प्रात्यक्षिकाच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यांसाठी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

खरीप हंगाम सन 2025 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग व उडिद पिकांसाठी (10 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) व राष्ट्रीय खा‌द्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकासाठी (5 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षीकांसाठी 31 मार्च 2024 च्या पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासाठी महाडीबीटीवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ते 29 मे 2025 पर्यंत चालु आहे. 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर गटांची निवड करण्यात येणार आहे. सदर पिक प्रात्यक्षिके ही सुधारीत लागवड तंत्रज्ञान आधारीत राबविण्यात येणार असुन त्यामध्ये बियाणे व इतर कृषि निविष्ठा अर्थसहाय्यीत दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

00000

वृत्त क्रमांक 539 

हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या

पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

 

·  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती 

 

नांदेड दि. 26 मे :- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

 

नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा  (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.  

 

प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर श्री. शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे अनावरण केले. तसेच त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने श्री. शाह व श्री. फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.  

 

हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी रुपये 13 लक्ष 99 हजार एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. सुशोभिकरणाचे अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.

00000


























वृत्त क्रमांक 538

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

नांदेड दि. 26 मे :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, तसेच पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.

000000

 






















25.5.2025

 वृत्त क्रमांक 536

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 25 मे -- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 26 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 26 मे 2025 रोजी दुपारी 2.10 वा. नागपूर येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वा. श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. मोटारीने स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 वा. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण सोहळयास ते उपस्थित राहतील.

दुपारी 3.25 वा. मोटारीने नवा मोंढा मैदान, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. नवा मोंढा मैदान, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.40 वा. जाहीर सभा. सायंकाळी 5.10 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर, नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शिष्टमंडळा समवेत भेट. सायं. 6.30 वा. मोटारीने नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.35 वा. नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. सायं. 6.35 वा. भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगर कार्यालयाचे उदघाटन. सायं. 6.50 वा. मोटारीने आनंद निलयम, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.55 वा. आनंद निलयम, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. रात्री 8.30 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेडकडे प्रयाण. रात्री. 8.40 वा. श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. रात्री 8.45 वा. विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.
0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...