Thursday, May 15, 2025

 वृत्त क्रमांक 498 

दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू    

नांदेड दि. 15 मे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीसाठी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. 

इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा निकाल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून या अनुषंगाने पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै 2025 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची अर्ज (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने इयत्ता दहावीसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 

नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाची मुदत 15 ते 24 मे 2025 पर्यंत तर विलंब शुल्कासह 25 ते 29 मे 2025 पर्यंत राहील. माध्यमिक शाळांनी आरटीजीएस, एनईएफटीद्वारे रक्कम भरावयाची मुदत शुक्रवार 30 मे 2025 पर्यंत आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस, एनईएफटी पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत सोमवार 2 जून 2025 पर्यंत आहे.   

सर्व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे भरून SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापकांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. 

इयत्ता दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

ऑनलाईन अर्ज भरतांना फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करू इछिणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. 

कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे याची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी. 

सर्व माध्यमिक शाळांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे प्राप्त ऑनलाईन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून NEFT / RTGS द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/ Axis Bank च्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. 

माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 497

डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांचे आवाहन

नांदेड दि. 15 मे :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

 नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन शुक्रवार 16 मे 2025रोजी साजरा होत आहे. 2025 या वर्षीचे  घोषवाक्य  ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा ’ असे आहे. नागरिकांमध्ये जागरुकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, निरउपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो.

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्ततपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2022- (744) 93 (निरंक). सन  2023 -(1490) 292 (निरंक). सन  2024 -(1302) 297 (निरंक)  तर  एप्रिल 2025 अखेर- (72) 6 (निरंक).

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 496

मेरा युवा भारत अंतर्गत युवकांना 

नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

                                                                                                                                                                        नांदेड दि. 15 मे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे देशभरातील युवकांना माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी सक्रियपणे एकत्रित करत आहे. हे राष्ट्रव्यापी आवाहन युवकांना, नागरिकांना राष्ट्रीय कार्यात, विशेषतः आपत्कालीन परिस्थिती आणि संकटाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम करण्याच्या एकत्रित प्रयत्नांचा एकभाग आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनाला पूरक ठरू शकणारी सुप्रशिक्षित, प्रतिसाद देणारी आणि लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

                                                                                                                                                                        सध्याची परिस्थिती आणि उदयोन्मुख सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत, समुदाय-आधारित प्रतिसाद यंत्रणा स्थापन करण्याची तातडीची आणि वाढती गरज आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक विविध सेवांद्वारे स्थानिक अधिकाऱ्यांना पाठिंबा देऊन यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये बचाव आणि निर्वासन कार्ये, प्रथमोपचार आणि आपत्कालीन काळजी, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये मदत करणे समाविष्ट आहे. सज्ज आणि प्रशिक्षित नागरी दलाचे महत्त्व पूर्वी पेक्षा जास्त आहे आणि मायभारत या राष्ट्रीय मोहिमेत योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.

                                                                                                                                                                        म्हणूनच, मायभारत त्यांच्या युवा स्वयंसेवकांच्या गतिमान नेटवर्कला आणि इतर सर्व उत्साही युवकांना, नागरिकांना पुढे येऊन माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करते. विद्यमान माय भारत स्वयंसेवक आणि या पदावर देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या नवीन व्यक्तींना ही सामील होण्यास स्वागत आहे. हा उपक्रम केवळ तरुणांमध्ये नागरी जबाबदारी आणि शिस्तीची तीव्र भावना निर्माण करत नाही तर त्यांना व्यावहारिक जीवनरक्षक कौशल्ये आणि गंभीर परिस्थितीत जलदगतीने कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देखील देतो.

                                                                                                                                                                        नोंदणी प्रक्रिया सोपी असून अधिकृत माय भारत पोर्टलद्वारे https://mybharat.gov.in उपलब्ध आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी सर्व इच्छुक युवकांना/जनतेला एकत्रित करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. तसेच अधिक माहितीसाठी चंदा रावलकर, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत-नांदेड (भ्रमणध्वनी क्र. 9422859073) यावर संपर्क करण्याचे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना

Wednesday, May 14, 2025

वृत्त क्रमांक 495 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा

 

नांदेड दि. 14 मे :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या शनिवार 17 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 17 मे 2025 रोजी परभणी येथून दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शिवसेना महिला आघाडी पदाधिकऱ्यांशी संवाद व लाडक्या बहिणींशी संवाद. स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. स्टार एअर विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्रमांक 494

दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती   

नांदेड दि. 14 मे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली दहावी व बारावी परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशक सेवा सुरु ठेवण्यात येत आहे.

याबाबत समुपदेशकांची भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे.

9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022, 9552982115. हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुक्ल आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 493

कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

नांदेड, दि. 14 मे :- पानी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये कृषी वि‌द्यापीठाच्या सहकार्याने डिजिटल शेतीशाळा राबवित असते. सदर डिजिटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पानी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमातून व शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून येत आहे. कृषि विभाग व पानी फाउंडेशन यांचेमार्फत सन 2025-26 करिता डिजिटल शेतीशाळा राबविणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. या डिजिटल शेतीशाळेचे माहे मे 2025 चे वेळापत्रक प्राप्त झाले आहे. 

गुरुवार 15 मे 2025 पासून शेतीशाळा सुरु होत आहेत. 15 मे रोजी आंबा व पेरू, 19 मे रोजी बाजरी व सोयाबीन, 20 मे खरीप ज्वारी व कापुस, 21 मे भात, मका व पशुधन, 22 मे घेवडा (राजमा) व संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू, 23 मे तुर, मुग व उडीद 24 मे रोजी भाजीपाला या पिकांच्या शेतीशाळाचे आयोजन प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन करण्यात आले आहे. डिजिटल शेतीशाळा पाहण्यासाठी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, प्रोजेक्टर इ. साधनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.  या डिजिटल शेतीशाळासाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, कृषिताई, ग्राम कृषि विकास समिती यांचे सदस्य,स्वयंसेवक यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या तांत्रिक शंकांचे निरसन करणार आहेत. डिजिटल शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांना स्वतः झुम लिंकवर किंवा पानी फाउंडेशन युटयुब चॅनलवर लाईव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या शंका झुमच्या चॉट बॉक्स किंवा युटयुबच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहावे. या डिजिटल शेतीशाळेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...