Friday, October 25, 2024

 वृत्त क्र. 978

मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड दि. 25 : मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 14:43 वा व 15:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली.

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपसदृश्य हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे 1.5 व 0.7 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून 12 किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हाप्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
०००००

वृत्त क्र. 977

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम 

मनपा आयुक्ताकडून जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा

 

नांदेड,25 - आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.

 

यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, मतदान शपथ, महिला बचत गटांचे मेळावे, विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणे, तसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितले.

 

 महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि ध्वनीक्षेपक रिक्षांचे उद्घाटन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मी मतदान करणार या स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण करण्यात आले. यात अनेकांनी सहभाग घेतला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहमती दर्शवली. तसेच येत्या दिवाळीमध्येही स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आडे, प्रा. डॉ. घनश्याम येळणे, अधीक्षक एस.आर. पोकळे, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड, सारिका आचमे, कविता जोशी, संजय भालके, सुनील मुत्तेपवार, साईराज  मदिराज, आशा घुले, माणिक भोसले, शिवराज पवार, मुकुंद अनासपुरे, गणेश कस्तुरे, अनिल कांबळे यांच्यासह 86- नांदेड उत्तर मतदार संघ व 87- नांदेड दक्षिण मतदार संघाचे स्वीप कक्षाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

00000






वृत्त क्र. 976

नांदेड विधानसभा मतदार संघात धडक कारवाई

आतापर्यंत 24 लाखांचा ऐवज जप्त

 

नांदेड, दि. 25 ऑक्टोंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत 24 लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील काही दिवस आणखी सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने फिरते पथक व स्थिर निगराणी पथक तैनात केली आहेत.

 

या पथकामार्फत  काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप,रोख रक्कम,अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येवून एकूण 24 लाख 4 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

यात भोकर 1 लाख 70 हजार 30 रुपये, देगलूर 2 लाख 77 हजार 650, हदगाव 26 हजार 900, किनवट 1 लाख 71 हजार 725, लोहा 44 हजार 100, मुखेड 71 हजार 140, नायगाव 3 लाख 10 हजार 980, नांदेड उत्तर 12 लाख 35 हजार 380, नांदेड दक्षिण 97 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 ०००००

वृत्त क्र. 975

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

 

नांदेड, दि. 25 ऑक्टोंबर :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

 

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. वैशिष्ट्ये सी व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा. अचूक कृती व देखरेख या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. लाईव्ह फोटो, व्हिडिओ या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. डाटा सुरक्षा या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

 

नांदेड विधानसभा मतदार संघात आतापर्यत सी-व्हीजील ॲपवर एकूण 32 तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी 11 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत, तर 21 तक्रार बेदखल होत्या. तरी नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲपवर नोंदवाव्यात तसेच 1950 टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार नोंदविता येईल.

00000

 


गेल्या तीन दिवस चाललेल्या बुद्धिबळ राज्यस्तर स्पर्धेच्या समारोपापूर्वी स्पर्धकांच्या रंगलेल्या फेरी

Thursday, October 24, 2024

आजचे महत्वाचे वृत्त क्र. 974 

21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज 

नांदेड, दि. 24 ऑक्टोबर :- विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 21 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी आणखी दोन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत. 

आज राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे तसेच सध्याच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्यांपैकी  83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भिमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. 84-हदगावमध्ये आज कॉग्रेसचे आमदार माधव निवृत्तीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 88-लोहा मतदारसंघात आज माजी खासदार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला. 89-नायगाव येथे भाजपचे आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 91-मुखेड येथे कॉग्रेसचे पाटील हनमंतराव व्यंकटराव (एबी फॉर्म अप्राप्त), भाजपचे आमदार तुषार गोविंदराव राठोड (एबी फॉर्म अप्राप्त), शिवसेना उबाठाचे दशरथ मंगाजी लोहबंदे (एबी फॉर्म अप्राप्त)  यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अपक्ष म्हणून भास्कर बालाजी हंबर्डे, संजय शिवाजीराव भोगरे, नय्यर जहा मोहमंद फेरोज हुसेन यांनी 87-नांदेड दक्षिण मधून तर लोहामधून अपक्ष मनोहर बाबाराव धोंडे यांनी अर्ज दाखल केला.  

आज दिवसभरात किनवटमधून 14, हदगावमधून 28, भोकरमधून 56, नांदेड उत्तरमध्ये 30, नांदेड दक्षिणमध्ये 18, लोहामध्ये 8, नायगावमध्ये 20, देगलूरमध्ये 37, मुखेडमध्ये 33 असे एकूण 240 अर्ज इच्छूकांनी प्राप्त केले आहेत. आतापर्यंत 1 हजार 68 अर्ज इच्छुकांनी प्राप्त केले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले व रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी एकुण 3 अर्ज दाखल झाले आहेत. 

0000

 वृत्त क्र. 973

प्रचाराचे व्हिडिओ बनविताना उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा,चिन्हांचा,वापर करू नये 

जाहिरात,व्हीडीओ बनवतांना घ्या काळजी 

नांदेड दि. २४ ऑक्टोंबर : निवडणुकांमध्ये प्रचारासाठी हल्ली उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल देणारा व्हिडिओ तयार करण्याची सर्वमान्य प्रक्रीया आहे. मात्र ही प्रक्रिया किचकट असते. त्याला वेळ लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनवतानाच भारत निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास याची मान्यता तातडीने मिळण्यास मदत होईल, त्यामुळे आयोगाला अमान्य असणाऱ्या गोष्टी टाळण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उमेदवारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रिंट माध्यमांसाठीच्या जाहिराती, प्रचार रथांवरील व्हीडीओ ,समाज माध्यमांसाठी रिळ, रेडिओ सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनल बलके एसएमएस रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेजेस सोशल मीडिया इंटरनेट संकेतस्थळे यावर द्यावयाच्या जाहिराती यामध्ये हे व्हिडिओ व रीळ प्रामुख्याने वापरले जातात.

निवडणुकीच्या उमेदवारांचे हे सर्व व्हिडिओ माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे मान्यतेला देण्यापूर्वीच या व्हिडिओमध्ये काय असावे व काय असू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांच्या अर्थात प्रिंट मीडियाच्या जाहिराती संदर्भात शेवटचे दोन दिवस परवानगी घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रम संहितेनुसार व्हिडिओमध्ये अभिरुचीहीन किंवा सभ्यतेविरुद्ध प्रसारण, मित्र देशांवर टीका,धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे दृश्य, किंवा शब्दांचा समावेश असलेले चित्रण,अश्लील, बदनामीकारक,जाणीवपूर्वक, चुकीचे किंवा अर्धसत्य माहिती, प्रसारण, हिंसेला प्रोत्साहन, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे किंवा राष्ट्रविरोधी व्यक्तींना उत्तेजन देणारे चित्र, न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीविरुद्ध आक्षेप व्यक्त करणारे प्रसारण,राष्ट्रीय ऐक्यास बाधा आणणारे प्रसारण,नैतिक जीवन मलीन करणारी टीका,अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीस खतपाणी घालणारे चित्रण, महिलांचे विकृतीकरण दर्शवणारे चित्रण, बालसंहितेविरुद्ध प्रसारण, विशिष्ट भाषिक आणि प्रादेशिक घटकांच्या संदर्भात उपरोधिक आणि निंदनीय वृत्ती दर्शविणारे दृश्य किंवा शब्द असणारे प्रसारण या शिवाय सीनेमेट्रोग्राफ कायदा 1952 च्या तरतुदीचे उल्लंघन करणारे प्रसारण दाखवण्यात येऊ नये.

तसेच जाहिरात संहितेनुसार पुढील प्रकारच्या जाहिरातीस प्रतिबंध आहे. कोणत्याही वंश, जात, वर्ण, पंथ, आणि राष्ट्रीयत्वाचा उपहास करणे, भारतीय राज्यघटनेचा अवमान करणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, हिंसाचार करणे किंवा कायद्याचे उल्लंघन करणे किंवा अश्लील त्याचे उदातीकरण करणे, गुन्हेगारी योग्य असल्याचे सादर करणे, राज्यमुद्रा किंवा राज्यघटनेच्या कोणत्याही भागाची किंवा राष्ट्रीय नेत्याचे किंवा राज्याच्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे, स्त्रियांचे चुकीचे चित्रण करणे, विशेषतः महिलांची बदनामी करणाऱ्या कोणत्याही दृष्याला परवानगी दिली जाणार नाही.   सिगारेट तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

व्हीडीओत काय नसावे... 

भारत निवडणूक आयोगाने माध्यमांसंदर्भातील दिलेल्या निर्देशानुसार

१. मंदिर, मशिद, गुरुद्वारा व अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांचे दृश्य वापरू नये

२. दुसऱ्या पक्षांवर आरोप नसावे. स्वतः काय केले ते सांगावे.

३. परस्परांच्या खाजगी आयुष्यावरील आरोप नसावे. सभ्यता सोडून भाषा, आरोप नसावे

४. विरोधी पक्षांवर टीका टिपणी नसावी, हेतू आरोप नसावे

५. सैन्याचे फोटो, सैन्य अधिकाऱ्यांचे फोटो याचा वापर नसावा

६. अन्य कुठल्याही देशावर आरोप नसावे

७. विशिष्ट जात, धर्म,पंथ यावर आरोप नसावे

८. कुणाचीही मानहेलना,अवहेलना नसावी

९. न्यायालयाचा अवमान नसावा

१o. देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान नसावा

११. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन हेतूआरोप, अपमान नसावा.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...