Wednesday, June 19, 2024

वृत्त क्र. 500

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड दि. 19 :- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात अचानक धाडी टाकून एकूण 30 तंबाखू विक्रेत्यांकडून 14 हजार  रुपये दंड आकारण्यात आला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वेणुगोपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमरे व पोलीस कॉन्स्टेबल सुपारे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000






वृत्त क्र. 499

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे

-    जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

·   पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये

नांदेड दि. 19 :- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी करुनच बियाणे वापरावे. तसेच स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पिक प्रात्याक्षिके योजना अंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणीत बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी.  बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना  त्याची त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पदधतीने किंवा प्लॉनटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीन उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवनक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. मार्केट मधील बियाणे खरेदी केलेल्या केलेल्या बॅग मधील प्रतिनिधीक स्वरुपातील बियाणाची उगवणक्षमता तपासुनच पेरणी करावी.

 

75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी ३ तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, असे कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 498

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी

30 जूनपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


नांदेड दि. 19 :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्याबाबत पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत सन 2024-25 या वर्षासाठी इच्छूक विद्यार्थी व विद्यार्थीनीनी परिपूर्ण प्रस्ताव संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड यांच्याकडे 30 जून 2024 पर्यत विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.


इतर मागास बहुजन कल्याण हा विभाग नव्याने निर्माण झालेला असून या विभागांतर्गत नव्याने राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

00000

वृत्त क्र. 497

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या

लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित


·   डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्यासाठी 25 जूनपर्यत कागदपत्रांची पूर्तता करावी


नांदेड दि. 19 :- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याच्या पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स ,आधारकार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी तलाठी शेळके व श्रीमती बोकन संजय गांधी शहर योजना यांच्याकडे अथवा संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे.  

 

आजपर्यंत 2 हजार 522 लाभार्थ्यांनी कागदपत्रे कार्यालयात जमा केली आहेत. अजून 4 हजार 117 लाभार्थ्यांचे कागदपत्रे जमा करावयाची शिल्लक आहेत .जे लाभार्थी विहित मुदतीमध्ये आपले कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे सर्व संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना विहित मुदतीत आपले कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन तहसीलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे.

००००

 वृत्त क्र. 496

दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कार्याचा अहवाल

25 जून पर्यंत सादर करण्याचे आवाहन


नांदेड दि. 19 :- दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणाऱ्या ईच्छूक व्यक्तीनी दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कार्याचा अहवाल जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद, नांदेड कार्यालयास 25 जून 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

दिव्यांग कल्याण विभागाच्या पत्रान्वये दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशासकीय व्यक्तीचे नामनिर्देशन सादर करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचे नाव व वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका व्यक्तीचे नाव अशा दोन व्यक्तीचे नावे व त्यांच्या कार्याचा अहवाल  आयुक्तालयास सादर करावयाचा आहे.

0000

 वृत्त क्र. 495

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत

वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


·  वैयक्तिक  शेततळयासाठी 4 कोटी 18 लाख रुपये मंजूर तरतूद

 

नांदेड दि. 19 :- नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे सन 2024-25 अंतर्गत तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले आहे. या लक्षांकासाठी 4 कोटी 18 लक्ष रुपयांची तरतूद मंजूर आहे. त्यानुसार जिल्ह्याची प्रवर्गनिहाय खातेदार संख्या व पेरणी क्षेत्रानुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण, अनु.जाती, अनु. जमातीसाठी तालुका निहाय लक्षांक पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -31, अर्धापूर-22, मुदखेड-25, लोहा-56, कंधार-58, देगलूर -48, मुखेड-66, नायगांव-43, बिलोली-41, धर्माबाद-23, किनवट-47, माहूर-21, हदगांव-58, हिमायतनगर-29, भोकर-33, उमरी-27 असे एकूण 628 भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या भौतिक लक्षांकासाठी जिल्ह्यास एकूण 4 कोटी 18 लक्ष रुपये आर्थिक तरतूद मंजूर आहे.

00000

Tuesday, June 18, 2024

 वृत्त क्र. 494

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात आजपासून मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन 

बुधवारी सकाळी ११ वाजता यशवंत महाविद्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन  

नांदेड दि. 18 :-  आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्त यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नांदेड येथे 19 ते 21 जून 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहूउद्देशीय क्रीडा संकुल येथे, योग अभ्यासावर आधारित मल्टीमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड व श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

 यावेळी माजी मंत्री तथा श्री. शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनिल बेतीवार, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकले, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनानिमित्त संपूर्ण योग अभ्यासाची माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळावी यासाठी 19 ते 21 जून दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकूल येथे द आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या सहकार्याने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाभ्याची माहिती विद्यार्थांना मिळावी यासाठी विविध शाळांमध्ये योगावर आधारित पोष्टर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 21 जून 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाची संकल्पना "महिला सक्षमीकरणासाठी योग" ही असून यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. महिलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक आरोग्य आणि शांतता यांना प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव 2024 चा उद्देश आहे.

00000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...