Friday, January 6, 2023

सुधारित वृत्त क्रमांक 14

 “उजवीकडून चाला” हे अभियान

रस्ते अपघातात निष्पाप पादचाऱ्यांचे बळी रोखण्यास प्रभावी

- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- रस्त्यावर होणाऱ्या अपघातात केवळ वाहन चालकांनाच दोष देऊन चालणार नाही. इतर असंख्य घटक अपघाताला कारणीभूत असतात. रस्त्यावरील पादचाऱ्यांना होणारे अपघात हे वाहनचालक आणि पादचारी या दोघांनी काळजी घेतली तर कमी होऊ शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रस्त्याच्या उजव्या बाजुने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून पादचाऱ्यांना आपली सुरक्षितता घेता येऊ शकते. यादृष्टिने वॉक ऑन राईट अर्थात “रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला” ही मोहिम खूप महत्वाची असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले. 

वॉक ऑन राईट अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजुने चाला या अभिनव मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. 

वर्षांनुवर्षे आपल्यावर डाव्या बाजुने चालण्याचे संस्कार झाले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, वाढलेले महानगरे, लोकसंख्या यांचा समन्वय साधत जर सेवासुविधांचा विचार केला तर रस्त्यावर चालतांना पदोपदी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या-त्या शहरातील उपलब्ध असलेली वाहने नेमकी कोणत्या मार्गाने ये-जा करतात, किती व्यक्तींकडे गाडीबाबतचे आवश्यक कागदपत्रे, वाहन चालक परवाना नुतनीकरणासह उपलब्ध आहे याबाबतचा डाटा असणे आवश्यक आहे. यावरुन त्या-त्या मार्गावरील वाहतुक वर्दळीचा एक निश्चित अंदाज घेता येऊन त्याबाबत नियोजन करता येईल, असे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सांगितले. या डाटासाठी प्राथमिक पातळीवर प्रत्येक कार्यालयाने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अशी माहिती संकलित करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालण्याबाबत शपथ दिली. कोणत्याही बदलाची सुरूवात ही आपण स्वत:पासून जर केली तर त्याचा व्यापक परिणाम आपल्याला दिसून येतो. यासाठी आपल्या वर्तणात बदल करून उजवीकडे चालण्याची सवय प्रत्येकांनी अंगी बिंबवण्याची अत्यावश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी यावेळी अभियानाला शुभेच्छा दिल्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तर आभार प्रदर्शन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. 

उजव्या बाजूने चालत रॅलीद्वारे

विद्यार्थ्यांनी दिला कृतीशील संदेश

या अभियानाच्या निमित्ताने आयोजित रॅलीस एनसीसी, स्काउट आणि इतर विद्यार्थी-विद्यार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दोन मार्गावर जाणाऱ्या रॅलीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज व मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात केली. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचविला.

0000








                                     औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

विभागीय आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

 

                  औरंगाबाद, दि.5, (विमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीसंदर्भातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विभागीय स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियत्रंण कक्षात 0240-2343164 या दुरध्वनी क्रमांक व deg.aurangabad@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करता येणार आहे.

 

                  नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारी, कर्मचारी  दुरध्वनीवर व व ई-मेलवर प्राप्त होणारे सर्व तक्रारी, संदेश स्वीकारतील व तात्काळ नोंदवहीत नोंद घेतील. महत्वाचे व तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असणाऱ्या संदेशाची माहिती दूरध्वनीवरुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. असे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 1 जानेवारी, 2023 पासून स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष निवडणुक प्रक्रिया संपेपर्यंत कार्यरत असणार आहे.

*****

 विभागस्तरावरील लोकशाही दिन

निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द

 औरंगाबाद (विमाका) दि 5 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आचार संहितेमुळे 9 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त जगदिश मिनियार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

 

औरंगाबाद, दि.5, (विमाका) : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर, 2022 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ओरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत मतदान व गुरूवार, 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

                  या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून, 2011 च्या शासन निर्णयानुसार या निवडणुकीच्या मतदारांना एक दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

*****

 

राज्यातील खाजगी चित्रीकरण

स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन    

मुंबई, दि. ४ : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक  अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.

महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.

अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल.  गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

******

Thursday, January 5, 2023

 वृत्त क्रमांक 13 

अपघातापासून सुरक्षिततेसाठी “उजवीकडून चाला”

अभियानाचा 6 जानेवारीला शुभारंभ    

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन यावर उपाययोजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले. पूर्वीच्या प्रघातानुसार आपण डाव्या बाजुनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहने आपल्याला दिसावीत व त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यादृष्टीने नांदेड जिल्ह्यात “उजव्या बाजुने चाला” ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. 

या अभिनव मोहिमेचा शुभारंभ 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदीर, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजुने चालून या अभियानाची सुरूवात करतील. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजिराबाद पोलीस स्टेशन, महावीर चौक, वजिराबाद रोड, एसपी ऑफीस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजुने चालून लोकांपर्यंत हा संदेश पोहचवतील. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000    

 वृत्त क्रमांक 12 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

अनुषंगाने विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी या दृष्टीकोणातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध आदेश दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी निर्गमीत केले आहेत.   

विश्रामगृहाच्या वापरावर नियंत्रण

शासकीय व निवडणुकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय नांदेड जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही. 

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यात कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास निर्बंध घालण्‍यात आले आहेत.  

शासकीय कार्यालय, विश्रामगृह इत्यादी परिसरात

मिरवणुका, घोषणा देणे, सभा घेण्यास निर्बंध

या निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, विश्रामगृह याठिकाणी पुढील बाबीस प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे याबाबी करण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे.  

ध्‍वनीक्षेपकाचा वापर नियंत्रीत करणे

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व धवनिवर्धकाचा वापर सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनांवर ध्वनिक्षेप व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2013 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. 

05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत हा आदेश दिनांक 2 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहील.  

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...