Monday, September 12, 2022

 सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी

13 सप्टेंबरला पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मंगळवार 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी पेन्शन अदालतीला उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000



 क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकाऱ्यांची 

मुलाखतीद्वारे होणार निवड 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत क्षेत्रीय डाक जीवन विमा अधिकारी यांची मुलाखात घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमून्यात अर्ज भरून गुरूवार 22 सप्टेंबर 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर नांदेड येथे थेट मुलाखातीसाठी उपस्थित राहावे. सोबत बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र, सेवामुक्ती प्रमाणपत्र घेऊन यावेत असे अधिक्षक डाकघर नांदेड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

उमेदवारांना अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड येथे उपलब्ध होईल. उमेदवाराचे वय मुलाखातीच्या दिवशी जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. अर्जदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याचा निवृत्त अधिकारी / कर्मचारी असावा. तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारची विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू नसावी. उमेदवाराची निवड थेट मुलाखातीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इत्यादी ज्ञान असणे आवश्यक आहे. 

निवड झालेल्या उमेदवारास रूपये पाच हजार अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी किंवा केव्हीपी स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रूपांतरीत केली जाईल. परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. उमेदवाराची नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे अधीक्षक डाकघर नांदेड विभान नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.  

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 38.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 12 :- जिल्ह्यात सोमवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 38.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 983.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 24 (956.60), बिलोली-33.80 (969.30), मुखेड- 14.80 (878.40), कंधार-7.40 (856.10), लोहा-12.20 (874.70), हदगाव-25.70 (874.30), भोकर-44.80 (1071.80), देगलूर-20.30 (821.20), किनवट-117.80 (1228.40), मुदखेड- 24 (1108.80), हिमायतनगर-80.90 (1252.50), माहूर- 91.10 (1051.70), धर्माबाद- 50.90 (1201.60), उमरी- 27.50(1135.40), अर्धापूर- 27.60 (890.80), नायगाव-29 (871.00) मिलीमीटर आहे.

0000

Friday, September 9, 2022

 मुलांच्या निरीक्षणगृहात वाचनालयाचा शुभारंभ  

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  मुलांनी पुस्तकांचे वाचन करून स्वत:मध्ये सुधारणा करावी. आपल्या जीवनात कोणतेही वाईट कृत्य करू नये, असे प्रतिपादन डॉ. शालीन इटनकर यांनी केले. नांदेड येथील मुलांचे निरिक्षणगृह येथे त्यांच्या हस्ते आज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे हे होते. वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करावे, असे आवाहन मिलिंद वाघमारे यांनी केले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुलांचे निरीक्षणगृहाचे अधीक्षक एस. के. दवणे, परिविक्षा अधिकारी एस. आर. दरपलवार, गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या अळणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपअधिक्षक सतिश हिवराळे यांनी केले तर शेवटी आभार अधिक्षक दवणे यांनी मानले.

000  

 

 

 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा दुखवटा   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महामहीम महाराणी एलीझाबेथ द्वितीय, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन आणि उत्तर आर्यलँड यांचे दिनांक 8 सप्टेंबर  2022 रोजी दु:खद निधन झाले आहे. दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहन्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण देशात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

00000

 मतदान ओळखपत्रास आधार जोडणी करण्यासाठी

10 व 11 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्याच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांचे निवडणूक ओळखपत्राशी आधार लिंकींग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअन्वये 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील 344 व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 308 मतदान केंद्रावर शनिवार 10 सप्टेंबर व रविवार 11 सप्टेंबर रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. मतदारांनी या मासिक शिबिरात निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. 

मतदारांनी निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकींग करण्यासाठी पुढील सुविधाचा वापर करावा. व्होटर हेल्प लाईन ॲपचा वापर करुन निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकींग करावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकचालक यांच्यामार्फत निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करता येईल. याचबरोबर संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय नांदेड येथील बीएलओ कक्ष, निवडणूक विभाग तसेच नांदेड तालुक्यातील सर्व नागरी सुविधा केंद्रावर हे काम विनामुल्य आहे. याबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेडचे संबंधित वसुली अधिकारी, सुपरवायझर यांना तसे आदेश दिले आहेत.

000000

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी

प्रकल्पांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत आहे. त्यानंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प गावातील संबंधित कृषी सहाय्यक किंवा समूह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

कृषी विभाग व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प गावातील लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाला जुळवुन घेण्यास सक्षम करणे. शेती पूरक व्यवसाय किफायतशिर करण्यासाठी जिल्ह्यात ३८४ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.  सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत एकूण प्राप्त अर्जांवर निकषानुसार पूर्व संमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या विषयी संबंधीत शेतकऱ्याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे. 

प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर (http://dbt.mahapocra.gov.in) नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा,  आठ- अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड बाबीसाठी स्वतंत्र अर्ज करावा, असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...