Wednesday, April 13, 2022

 जिल्ह्यात आज आढळला एक कोरोना बाधित  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 52 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. बिलोली तालुक्यात ॲटीजन तपासणीद्वारे 1  कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 106 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 99 हजार 930

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 79 हजार 918

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 106

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-01

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 000000

 गुरुवारी दारु दुकाने बंद

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी गुरुवार 14 एप्रिल रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.  

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी गुरुवार 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता

कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

नांदेड (जिमाका) दि. 13 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी योजनेची कार्यशाळा सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात नुकतीच सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी आयडीबीआय बॅक शाखा व्यवस्थापक अमित कुमार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम, पंडित खानसोळे, कैलास मोरे, रंगराव सुर्यवंशी, श्रीमती माधवी राठोड आदीसह नव उद्योग करण्यासाठी इच्छुक असलेले अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व कर्मचारी उपस्थित होते.

तालुका समन्वयक श्रीमती अंजली नरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात केली. बापू दासरी यांनी या योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक अमित कुमार यांनी नवीन उद्योग सुरु करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना या योजने अंतर्गत कर्ज पुरवठा करण्यास त्यांची बॅक तयार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार, तालुका समन्वयक तर आभार प्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

00000

 डिजिटल रथाद्वारे संविधानाचा जागर

 ·  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत संविधान जागर या डिजिटल रथाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, ‍समाज कल्याण निरिक्षक अशोक गोडबोले, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जयपाल वाघमारे यांची उपस्थिती होती. भारतीय संविधानाचा इतिहास, निर्मिती व भारतीय संविधानाची विशेष माहिती दृकश्राव्य माध्यमातून या डिजिटल रथाद्वारे नांदेड शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोहचविली जाणार आहे.  

00000

Tuesday, April 12, 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने "रस्ता सुरक्षा मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जमदाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची विशेष उपस्थिती होती.

 

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक नियम, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट / सिटबेल्ट च्या वापराबाबत सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी मार्गदर्शन केले. रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास हे प्रमाण नक्कीच कमी होईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात “नो हेल्मेट नो इन्ट्री” या अभियानासह वाहतूक नियमांबाबत त्यांनी माहिती दिली.

 

या शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शरीर रचना विभाग प्रमुख डॉ. इनामदार, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जाधव, सहा. मोटार वाहन निरीक्षक केशव जावळे यांनी परिश्रम घेतले.

00000

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ही परीक्षा शनिवार 16 एप्रिल 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 5 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड येथील 5 विद्यालय / महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 1 हजार 656 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत बदल 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे, उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यापासून बचावासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यानुसार सर्व वाहन चालक / मालकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतले आहे त्यांनी त्यांचे वाहन तपासणीसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...