Tuesday, December 17, 2019


राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेंतर्गत अनुदानाचे वाटप
नांदेड, दि. 17 :- राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेंतर्गत नांदेड तालुक्यात पाच लाभार्थ्यांना 16 डिसेंबर रोजी अनुदान वाटप करण्यात आले आहे. ज्यामध्ये श्रीमती कुशवर्ता साहेबराव मनोहरे, श्रीमती लता रजनीकांत सदावर्ते, श्रीमती शिला गणेश श्रीमंगले, श्रीमती बायनाबाई दिलीप पोटफोडे व श्रीमती पुण्यरथा परमानंद पवार या पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान नांदेडचे तहसिलदार अरुण जऱ्हाड यांच्या हस्तेप वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय योजनेंतर्गत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेत कुटूंबातील ज्यांचा उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुखकर्ता पुरुष किंवा स्त्री ज्यांचे वय 18 ते 59 वर्ष लाभासाठी सदरचे कुटूंब हे दारिद्रयरेषेखालील असणे आवश्यक आहे.
या लाभार्थ्यास त्यांच्या पश्चात त्यांचे जे वारस आहेत त्यांना शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा निर्णय 12 मार्च 2013 अन्वये एक रक्कमी 20 हजार रुपये ऐवढे अनुदान वाटप करण्यात येते. यावेळी नायब तहसिलदार व्ही . एन. पाटे, अ.का. डी.आर.पोकले, लिपीक प्रशांत गोडबोले हे उपस्थित होते.
00000


पंचायत समिती सभापती, उपसभापती
पदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची 21 डिसेंबर 2019 रोजी आयोजित निवडणुक तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
ग्रामविकास विभाग, मुंबई यांच्याकडील 10 डिसेंबर 2019 रोजीच्या पत्रात नमुद सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 22 दिनांक 23 ऑगस्ट 2019 अन्वये जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत असल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 42 व 45 खाली जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक  20 डिसेंबर 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेण्यात येणार होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 10 डिसेंबर 2019 अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजीच्या सुधारित शासन पत्रात या आदेशान्वये 120 दिवसाचा कालावधी हा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर प्रचलीत कार्यपद्धती नुसार आवश्यक ती सूचना नोटीस निर्गमीत करुन सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्याचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना नमुद आहेत. त्यामुळे 21 डिसेंबर 2019 रोजीची जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हात परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्यासाठी 10 डिसेंबर 2019 च्या आदेशान्वये पिठासीन अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती‍ व संपुर्ण निवडणुक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
00000


 राष्ट्रीय पुरुष / थोर व्यक्तींची जयंती,
राष्ट्रीय दिन साजरा करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 17 :- सन 2020 मध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 12 डिसेंबर 2019 नुसार सर्व राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्यात यावेत. परिशिष्टात दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व रविवारी तसेच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येत असले तरी ते कार्यक्रम त्या-त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. आपल्यास्तरावरुन सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील संबंधीत सर्व कार्यालयांना सदरचे कार्यक्रम घेण्याबाबत आवश्यक त्या सुचना देवून त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000



Monday, December 16, 2019


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव
31 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 11 वी व 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या व पुढील वर्षांमध्ये व्यावसायिक अभ्यास करण्याकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत मंगळवार 31 डिसेंबर 2019 पर्यंत या समिती कार्यालयास सादर करावे. 
विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालये यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावे, विहित मुदतीनंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन दिनकर पावरा सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी केले आहे.
00000



शबरीमाला उत्सवासाठी भाविकांनी
तांत्रिकदृष्ट्या योग्य वाहनातून प्रवास करावा
नांदेड दि. 16 :- जिल्हयातील शबरीमाला केरळ येथील उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या वाहनातून प्रवास करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
शबरीमाला केरळ येथे होणाऱ्या उत्सवात महाराष्ट्रातील निरनिराळया ठिकाणाहून भाविक जात असतात. या यात्रेस भाविक ज्या वाहनातून प्रवास करतात दरमहा ती वाहने तांत्रिकदृष्टया योग्य नसल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंव्हेबरच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरु होऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात शबरीमाला उत्सव साजरा केला जातो, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन
नांदेड दि. 16 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड येथे शुक्रवार 20 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वा. पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, फ्लेमिंगो फार्यासुटीकल्स लि. कृष्णूर, समस्ता मायर्क्रो फायनान्स लि. लालबाग बॅगलोर, न्युक्लीअर्स टेक्नोलॉजीस नांदेड या नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगारांची संधी मिळावी याकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेत.
ट्रेनी ऑप्रेटर, कस्टमर रिलेशनशिप ऑफीसर, डि.टी.पी. ट्रेनर (प्रशिक्षक), टॅली ट्रेनर (प्रशिक्षक), डेटा इन्ट्री ऑप्रेटर एकुण 246  या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी उर्त्तीण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास येतेवेळेस उमेदवारांनी सेवायोजन नाेंदणी कार्ड (असल्यास) व शैक्षिणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे. असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र नांदेड यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
000000

Saturday, December 14, 2019


जिल्ह्यात लोकअदालतीत 4 हजार 197
प्रकरणात 14 कोटी रक्कमेची तडजोड  
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 4 हजार 197 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 14 कोटी 60 लाख 53 हजार 342 रुपये  (अक्षरी चौदा कोटी साठ लाख त्रेपन्न हजार तिनशे बेचाळीस रुपये मात्र) इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक  धोळकिया यांच्या  मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दि. 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणांचा व विविध बॅंकांचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ, समाजसेवक आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.
ही लोकअदालत यशस्वी व जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायाधीश दि. अ. धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री धोळकिया यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. रोटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी व लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची आपेक्ष व्यक्त केली.
00000


वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...