Tuesday, May 21, 2019


उच्चरक्तदाब दिनाचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 21 :-  जागतिक उच्चरक्तदाब दिनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागात आज करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  एन. आय. भोसीकर यांनी उपस्थित रुग्णांना उच्चरक्तदाब या आजाराबद्दल मार्गदर्शन केले. रुग्णालयातील एनसीडी विभागाद्वारे 85 रुग्णांचे  उच्चरक्तदाब (बीपी) व शुगरची तपासणी करण्यात आली. तसेच जागतिक दहशतवादी विरोधी दिनानिमित्त दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रुग्णालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. 
000000



मतमोजणी केंद्र परिसरात चोख बंदोबस्त
नांदेड, दि. 21 :- शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार 23 मे 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड  या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरामध्‍ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध करण्‍यात आले आहे.
या मतमोजणीच्‍या अनुषंगाने कर्मचारी, उमेदवार व त्‍यांचे प्रतिनिधी, प्रसार माध्‍यमांचे प्रतिनीधींना  अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय इतर कुणीही प्रवेश करणार नाही. तसेच कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्‍यासाठी शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या 5 प्रवेशद्वाराजवळ विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मुख्‍य प्रवेशद्वार नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्‍या समोर येथून नियुक्‍त अधिकारी / उमेदवार यांचे शिवाय इतर कुणाचेही वाहन प्रवेश करणार नाही.
उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींना माधव दालमीलकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्‍यात येणार आहे व त्‍यांच्‍या वाहनांसाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती नवामोंढा येथे पार्कींगची व्‍यवस्‍था केली आहे. सर्व वाहने वाहनतळावर लावूनच सर्वांनी प्रवेश घ्‍यावा. रहदारीस अडथळा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

Monday, May 20, 2019


मतमोजणीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था
अबाधित रहाण्यासाठी अधिसुचना प्रसिद्ध
नांदेड दि. 20 :- 16- नांदेड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार 23 मे 2019 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड येथे होणार आहे. या मतमोजणीच्‍या ठिकाणी कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी यादृष्‍टीने जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधिसुचना प्रसिद्ध केली आहे.
उमेदवार व त्‍यांचे प्रतिनिधींना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गुरुवार 23 मे 2019 रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेमध्‍ये भाग घेण्‍यासाठी माधव दालमीलकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रोडवरुन प्रवेश देण्‍यात येणार आहे व त्‍यांच्‍या वाहनांसाठी नवामोंढा येथे पार्कींगची व्‍यवस्‍था केली आहे. उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधी व इतरांनी जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयातून मिळालेले ओळखपत्र सर्वांना दिसेल अशा पध्‍दतीने आपल्‍या शरीरावर धारण करावे, ओळखपत्र नसल्‍यास प्रवेश दिला जाणार नाही.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे जाणारा रस्‍ता वाहनांच्‍या वाहतुकीसाठी ज्‍या ठिकाणी लाकडी बॅरिकेड्स लावून तात्‍पुरता बंद ठेवण्‍यात आला असून ती ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. माधव दालमील समोरुन आनंदनगरकडे जाणारा रस्‍त्‍यावरील टी पॉंईंट येथे. याच रस्‍त्‍यावर उज्‍वल गॅस एजन्‍सी समोरुन मगनपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावरील टी पॉंईंट येथे. उज्‍वल गॅस एजन्‍सीकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावर विद्युत विभागाच्‍या डी. पी.जवळ (सार्वजनीक शौचालय जवळ). आनंदनगरकडून महात्‍मा फुले शाळेकडे जाणाऱ्या रस्‍त्‍यावर (जुने) अभिरुची हॉटेल समोर यशवंत महाविद्यालय कॉर्नर जवळ टि पॉंईंट येथे. लॉ कॉलेज कॉर्नर जवळील टि पॉंईंट येथे. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कोणत्‍याही वाहनास या ठिकाणाहून प्रवेश दिला जाणार नाही.
मतमोजणी इमारतीमध्‍ये कोणतेही इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरण (उदा. मोबाईल फोन, लॅपटॉप) ज्‍वलनशील पदार्थ, आगपेटी, लायटर, कोणतेही शस्‍त्र, धारदार वस्‍तू नेण्‍यास बंदी आहे. या अधिसुचनेत नमूद बाबी गुरुवार 23 मे 2019 रोजी 16-नांदेड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 20 मे 2019 रोजी निर्गमीत केलेल्या अधिसुचनेत म्हटले आहे.
0000


 मतमोजणी केंद्र परिसरात
गुरुवारी 144 कलम लागू
 नांदेड दि. 20 :- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार 23 मे 2019 रोजी शासकीय तंत्रनिकेतन बाबानगर नांदेड येथे सकाळी 8 वाजेपासून होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.
माहिती व तंत्रज्ञान  इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड या मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणीच्या कामव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश गुरुवार 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.
0000


आरटीओ कार्यालयात ऑनलाईन
संगणकीकृत अर्ज स्विकारली जाणार
 नांदेड दि. 20 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयात 1 जून 2019 पासून सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाईन संगणकीकृत प्रिंट असलेले स्विकारण्यात येणार आहेत. कोणतेही हस्तलिखीत अर्ज स्विकारली जाणार नाहीत. याबाबत वाहन मालक, चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकरी नांदेड यांनी केले आहे.
परिवहन विभागाचे कामकाज जानेवारी 2017 पासून पूर्णपणे संगणीकृत व ऑनलाईन झाले आहे. अर्जदारास वाहन व लायसन्स संबंधी ऑनलाईन पद्धतीने परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in या संकेतस्थळावर अथवा नजीकच्या सीएससी केंद्रामार्फत अर्ज करता येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.   
000000



Sunday, May 19, 2019


जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा
दुष्काळ निवारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे
-         पालक सचिव एकनाथ डवले

नांदेड दि. 19 :- टंचाईकाळात नागरिकांशी संवाद साधणे आवश्यक असून नागरिकांना पिण्याचे पाणी, रोजगार, चारा छावणी यासारखी महत्वाची कामे हाती घेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्राधान्यांनी कामे करावीत, असे निर्देश मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठक पालक सचिव श्री. डवले यांचे अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांचेसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव श्री. डवले पुढे म्हणाले, यावर्षी मान्सूम पुढे जाण्याची शक्यता असून त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मागणीनुसार नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा यंत्रणेची असून यासंदर्भात नागरिकांची कोणतीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी पाणीटंचाईची कामे सुरु आहेत ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही प्रस्तावित करावी. ग्रामीण भागात 30 जून पर्यंत तर शहरी भागात 31 जुलै पर्यंत पाणी पुरवठा होईल असे नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात टँकर, विंधन विहिर, बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच नळयोजना दुरुस्तीची प्रस्तावित असलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत. जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा करणे सोयीचे जाईल. जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा, बोअर व विंधन विहिर अधिग्रहणाची देयक संबंधितांना त्वरीत अदा करावे त्यामुळे नियमित पाणी पुरवठा सुरु राहिला पाहिजे, असे निर्देश दिले.      
राज्यात दुष्काळ सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पाण्याचा वापर करतांना काटकसरीने वापर करावा. प्रकल्पातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आले असून शेती, उद्योगासाठी प्रकल्पातून पाणी उपसा करु नये, असे आवाहन श्री. डवले यांनी यावेळी केले. याकाळात अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमित आढावा घेतला जात असून जिल्ह्यात विविध पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व उमरी तालुक्यातील सरपंचाशी ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला होता. संवादातून या तीन तालुक्यातील 23 गावातील सरपंचानी चारा छावणी, बोअर अधिग्रहण, टँकर मिळणे, पाणी पुरवठा योजना, बंधारा, जनावरांना पाणी, नरेगासह आदी कामांची मागणी केली होती त्या कामांचा  तसेच जलयुक्त शिवार, रोहयोच्या कामांचा आढावा श्री. डवले आढावा श्री. डवले यांनी यावेळी घेतला.      
विष्णुपुरी जलाशयासह मुखेड तालुक्यात टंचाई गावांची पाहणी
पालक सचिव श्री. डवले यांनी असना व विष्णुपुरी जलाशयातील पाण्याच्या पातळीची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मुखेड तालुक्यातील मोटरगा, बोरगाव, भगनुरवाडी व तांदळीतांडा या गावातील नागरिकांशी संवाद साधून टँकर, पाणीटंचाई व मनरेगाच्या कामांची पाहणी केली. गावात जलसंधारणाची जास्तीतजास्त कामे हाती घेतल्यास टंचाई परिस्थितीवर मात करता येईल, असे सांगून मुखेड तालुक्यात चारा छावणीची मागणी लक्षात घेऊन ती सुरु करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.    
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले. नांदेड शहराला महानगरपालिकेच्यावतीने दर चार दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे निर्देशात आले आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात, आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी. विष्णुपुरी जलाशयात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार महापालिकेने येत्या 25 जुलै पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी सुचना श्री. डवले यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद, नगरपालिका यांनी नियोजन करावे. सुनेगाव तालावातून पाण्याच्या नियोजनासाठी तलावात विहिर, बोर तसेच चराची कामे घेऊन तलावातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
सुरुवातील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी टंचाई संदर्भात प्रास्ताविक करुन जिल्ह्यात पाणी व टंचाई संबंधीत असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेबाबत सुरु असलेल्या कामांविषयी माहिती दिली. 
00000

Friday, May 17, 2019


मंत्रिमंडळ निर्णय : दि.17 मे 2019
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

राज्याच्या दुष्काळी भागात विविध उपाययोजनांना गती
रोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार

रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली.रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सध्या 36 हजार 660 कामे सुरु असून त्यावर तीन लाख 40 हजार 352 मजूर काम करीत आहेत.  याशिवाय शेल्फवर 5 लाख 74 हजार 430 कामे आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मागणी करण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव तीन दिवसात मंजूर करण्यात यावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी डिसेंबर 2018 मधील निर्णयानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि 35 लाख व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 60 लाख शेतकऱ्यांना या अगोदरच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तसेच दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तात्काळ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही आज देण्यात आले. त्यासोबतच दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पोर्ट्याबिलिटी (Portability) सुविधेचा वापर करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
राज्यात सध्या 13 हजार 801 गावे-वाड्यांमध्ये 5,493 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात 2,824 गावे-वाड्यांमध्ये 2,917 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1,429 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 42 हजार 150 मोठी आणि एक लाख दोन हजार 630 लहान अशी सुमारे 9 लाख 44 हजार 780 जनावरे आहेत.राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत.यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 743 योजनांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी 118 पाणी पुरवठा योजना सुरु झाल्या आहेत.  पुनर्जीवित योजना कार्यान्वित करण्यासाठी 28 योजनांचे आदेश देण्यात आले असून त्यापैकी 18 सुरु झालेल्या आहेत.  राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी 300 योजना सुरु करण्यात आल्या आहेत.  या आर्थिक वर्षात 1,034 योजना प्रगतिपथावर असून 2019-20 वर्षाच्या आराखड्यात 10,005 नवीन योजना समाविष्ट करण्यात येत आहेत.
-----0-----
खाजगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
एसईबीसी वर्गातील वैद्यकीय प्रवेशांच्या संरक्षणासाठी अध्यादेश
 राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तात्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एसईबीसी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या अथवा घ्यावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीकरण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील 2019-20 या शैक्षणिक वर्षातील एमडीएस आणि एमडी, एमएस किंवा डीएनएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश व पात्रता परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशास इतर सामाजिक आरक्षणासह आरक्षण अधिनियम-2018 अनुसार एसईबीसी वर्गासाठी 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आरक्षण अधिनियम-2018 अस्तित्वात येण्यापूर्वी सुरू झाली असल्यामुळे या अधिनियमातील कलम 16 (2) नुसार एसईबीसी वर्गासाठी आरक्षण लागू करता येणार नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयाचा आदर करतानाच 16 टक्के आरक्षणानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
त्यानुसार आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) वर्गाकरीता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम-2018 च्या कलम 16(2) मध्ये सुधारणा करण्यास आणि या सुधारणा तात्काळ अंमलात आणण्यासाठी राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने अध्यादेश प्रख्यापित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
-----000-----

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...