Tuesday, May 21, 2019


मतमोजणी केंद्र परिसरात चोख बंदोबस्त
नांदेड, दि. 21 :- शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार 23 मे 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड  या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरामध्‍ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध करण्‍यात आले आहे.
या मतमोजणीच्‍या अनुषंगाने कर्मचारी, उमेदवार व त्‍यांचे प्रतिनिधी, प्रसार माध्‍यमांचे प्रतिनीधींना  अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय इतर कुणीही प्रवेश करणार नाही. तसेच कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्‍यासाठी शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या 5 प्रवेशद्वाराजवळ विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मुख्‍य प्रवेशद्वार नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्‍या समोर येथून नियुक्‍त अधिकारी / उमेदवार यांचे शिवाय इतर कुणाचेही वाहन प्रवेश करणार नाही.
उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींना माधव दालमीलकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्‍यात येणार आहे व त्‍यांच्‍या वाहनांसाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती नवामोंढा येथे पार्कींगची व्‍यवस्‍था केली आहे. सर्व वाहने वाहनतळावर लावूनच सर्वांनी प्रवेश घ्‍यावा. रहदारीस अडथळा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...