Wednesday, April 11, 2018


लोकराज्यच्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड दि. 11 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या  एप्रिल 2018 च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन  नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. तोटावार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, मुख्याधिकारी पी. डी. गंगनर, नगररचनाचे के. पी. पाटील आदि उपस्थित होते.
         श्री. डोंगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंती निमित्त  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तत्व, विचार व आचरणावर प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य च्या विशेषांकाचे कौतूक करुन हा अंक ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तत्वाला मानवंदना असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी स्वागत केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत  प्रकाशित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन या विशेषांकाची माहिती दिली.
      या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि डॉ. आंबेडकर (डॉ. जयसिंगराव पवार ) ,परिवर्तनाचे अग्रदूत (डॉ. शैलेंद्र लेंडे ), जलनीतीचे उद्गाते  (अविनाश आ. चौगुले ), ऊर्जाशक्तीला चालना (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक (डॉ. संभाजी खराट ), बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली ?  महामानवाचा स्मृतिगंध  ( मिलिंद मानकर ), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ), बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण ), महामानवाचा जीवनपट,  समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे ), प्रेरणा , ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी (डॉ. विजय खरे ), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे यांच्यावरील  दलित साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे ), आदि लेख वाचनीय आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदरचा अंक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड मार्फत करण्यात येत आहे. यावेळी विजय होकर्णे, आरेवार आदि उपस्थित होते.
0000000


सामाजिक समता आणि 21 वे शतक
या विषयावर शुक्रवारी व्याख्यान  
नांदेड दि. 11 :-  "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" निमित्त सामाजिक समता आणि एकविसावे शतक या विषयावर सुप्रसिद्ध विचारवंत देविदास फुलारी याचे व्याख्यान शुक्रवार 13 एप्रिल 2018 रोजी सामाजिक न्याय भवन नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त जे. एम. शेख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या कार्यक्रमास नांदेडकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन
जयंती दिनापर्यंत विविध उपक्रम
नांदेड दि. 11 :-  राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा रविवार 8 एप्रिल ते शनिवार 14 एप्रिल 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय निर्गमीत केला आहे. त्यानुसार या सप्ताहात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील, असे नमूद करण्यात आले आहे. या निर्देशाचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय , आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या समता सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. ज्यामध्ये महत्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती वस्त्यामध्ये स्वच्छता अभियान. समाज प्रबोधनपर विविध विषयावर व्याख्यान अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शनिवार 14 एप्रिल 2018 रोजी जिल्हास्तरावर मानवंदनेचा शासकीय कार्यक्रम आयोजित करुन या सप्ताहाची सांगता होईल.
000000


जिल्हा युवा पुरस्कारासाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नांदेड,दि. 11 :- एक युवक व युवती तसेच एक नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार नांदेड जिल्हा युवा पुरस्कार 2017-18 साठी अर्ज शुक्रवार 20 एप्रिल 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. संबंधितांनी विहित नुन्यातील अर्ज 13 ते 20 एप्रिल पर्यंत क्रीडा कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवक व युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवामध्ये समाज कार्याचे जागर होवून त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व अधिक माहितीसाठी www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी   
अर्ज सादर करण्याचे आवाहन
               नांदेड,दि. 11 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव शुक्रवार 13 ते 20 एप्रिल 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे प्राप्त होतील, असे आावाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
               जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू पुरस्कार-2 (एक महिला व एक पुरुष) यांचे कार्य / योगदानाचे मुल्यमापन करुन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार 2017-18 वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती नांदेड यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
               पुरस्कारासाठी अर्जदाराचे राज्यात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्ह्यात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य असले पाहिजे. क्रीडा संघटक, कार्यकर्त्यांने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे. वयाची 30 वर्ष पुर्ण असणे आवश्यक असून गुणांकनासाठी जिल्ह्यातील खेळाडुंची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्ण 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी शालेय व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 1 ऑक्टोंबर 2012 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

Tuesday, April 10, 2018



पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून  
आरोग्याविषयी ग्रामीण मुलींचे प्रबोधन   
नांदेड , ‍दि. 10 :- अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 8 वी, 9 वी व दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थींना तसेच ग्रामीण महिलांना सॅनेटरी नॅपकीन वापरासंदर्भात व आरोग्य विषयक प्रबोधन करण्यासाठी पॅडमॅन चित्रपटाचे आयोजन नुकतेच जिल्ह्यातील 70 शाळेत करण्यात आले होते. यात जवळपास 8 हजार 562 विद्यार्थींनींनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील महिला स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक होत आहेत, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेची
प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावीत 
नांदेड , ‍दि. 10 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील इयत्ता 6 वीची प्रवेश परीक्षा शनिवार 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्ह्यातील संबंधीत 39 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ज्या सेतू केंद्रातून प्रवेश अर्ज केला तेथून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावीत. ज्यांनी ऑफलाईन प्रवेश अर्ज शाळेमार्फत केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संबंधीत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळा मुख्याध्यापकांनी प्राप्त करावीत. प्रवेशपत्र प्राप्त होताच संबंधीत विद्यार्थ्यांना त्वरीत वाटप करावीत. पालक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...