Monday, January 22, 2018

लघु उद्योग घटकांना
जिल्हा पुरस्काराचे वितरण
 नांदेड दि. 22 :- लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते  सोमवार 29 जानेवारी 2018 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन नांदेड येथे सायं. 5 वा. होणार आहे. यावेळी अधिक्षकीय उद्योग अधिकारी उदय पुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत सन 2017 च्या जिल्हा पुरस्कारासाठी निवड झालेल्या नांदेड जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांना जिल्हा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात प्रथम पुरस्कार देगलूर तालुक्यातील खानापुर येथील श्रीकांत मेडीवार यांचे मे. श्री साई ॲग्रो इंडस्ट्रीज, तर द्वितीय पुरस्कारात नांदेड येथील दुर्गाचारी चेनाजोलू यांचे ओम नृसिंह ट्रॅक्टर ट्रॉली ॲड ॲग्रीकल्चर इक्वीपमेंट मॅन्युफॅक्चर नांदेड यांना वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संबंधीत नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गौतम लाडे यांनी केले आहे.

00000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 22 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्याच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आला आहे. त्यांनी असे खराब झालेले , माती लागलेले जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

000000

Sunday, January 21, 2018

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
यांच्याकडून योगेशच्या कुटूंबियांचे सांत्वन
नांदेड दि. 21 :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या योगेश जाधव या तरुणाच्या हदगाव तालुक्यातील आष्टी येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्यमंत्री श्री आठवले यांनी योगेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली यावेळी वडील श्री प्रल्हाद, आई सौ. संगिता, भाऊ विशाल यांची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून जाधव कुटुंबियाना शेतजमीन, घरकुल, लहान भावास नौकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून योगेशच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असून शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आहे, अशा भावना राज्यमंत्री श्री आठवले यांनी यावेळी व्यक्त केल्या.     
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने एकुण 5 लाखाची मदत जाहीर करुन त्यापैकी योगेशच्या कुटुंबियांना यावेळी 2 लाख रुपये रोख दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार संदिप कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, रिपब्लिकन पक्षाचे गौतम भालेराव, वसंत मुळे, बाबुराव कदम, विजय सोनवणे, गौतम काळे, शरद सोनवणे, मिलींद शिराढोणकर यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.

0000

Saturday, January 20, 2018

टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये भाग घेण्याची संधी ;  
खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन    
नांदेड दि. 20 :- सन 2020 टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्यें भाग घेण्याकरीता खेळाडुंसाठी गेल इंडियन स्पिड स्टार चाचणीचे आयोजन बुधवार 24 जानेवारी 2018 रोजी यशवंत महाविद्यालय मैदान नांदेड येथे सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे. या चाचणीत विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचे राज्यस्तरीय शिबीर व निवड चाचणीसाठी निवड केली जाईल. राज्यस्तर चाचणीत विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड करण्यात येईल. या खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सो. लि. या संस्थेने गेल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीच्या सहकार्याने भारतातील वेगवान धावकांची निवड करुन या धावकांना सन 2020 च्या टोकीयो (जपान) ऑलंम्पीकमध्ये सहभागी होण्याकरीता अद्यावत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  
निवड चाचणी जिल्हयातील सर्व खेळाडूंची होईल. चाचणीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या (कमीत-कमी 25 मुले- 25 मुली व जास्तीतजास्त कितीही) खेळाडू मुले-मुली यांना क्रीडा शिक्षकासह चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडू मुले-मुली व शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाईल. चाचणी  धावणे प्रकार- 100 मी., 200 मी. व 400 मी.धावणे, वयोमर्यादा गट (मुले / मुली) - 11 ते 14 वर्षे- जन्मतारीख 1 जानेवारी 2004 ते 31 डिसेंबर 2006 व 15 ते 17 वर्षे - जन्मतारीख 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2003 अशी राहील. ऑनलाईन नोंदणी  www.nycsindia.com, bhaskrdoibale@gmail.com या ई-मेल आयडीवर नोंदणी करावी.
निवड चाचणीकरीता तांत्रीक प्रमुख प्रलोभ कुलकर्णी- 8625021219 हे राहणार आहेत. यासाठी अधिक माहिती करीता- अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.)- 9764022299, विक्रांत खेडकर-  8379063999, भास्कर भा.डोईबळे- 9975209438 यांचेकडे संपर्क करावा. सबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपल्यास्तरावरुन मुले-मुली खेळाडूंस उपस्थित ठेवण्याकरीता आदेशीत करावे व शाळा बाह्य मुले-मुली खेळाडूंनी पालकाचे संमतीपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
शारीरिकदृष्टया सक्षम खेळाडू मुले-मुली यांना देखील या चाचणीसाठी पाठवावे. खेळाडू सोबत पाणी बॉटल, जेवणाचा डब्बा, आवश्यक क्रीडा साहित्य असणे आवश्यक आहे.  खेळाडूचे आधार कार्ड, मुख्याध्यापक, पालकाचे संमतीपत्र, शाळेतील सहभागी खेळाडू यादी सोबत आणावीत. प्रवास खर्च स्वत: करावा लागेल.
            निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण व अनिरुध्द शिरसाठ (जिल्हा समन्वयक, एन.वाय.सी.ए.) हे तांत्रीक समिती सदस्य संयोजन करीत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

00000
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन      
नांदेड दि. 20 :-  राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी इयत्ता दहावीत 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन इयत्ता 11 वी व 12 वी प्रवेश घेणाऱ्या अनु. जाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधीत प्राचार्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचेकडून अर्जाचा नमुना प्राप्त करुन बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी केले आहे.
सन 2012-13 ते 2016-17 पर्यंत ही योजना ऑनलाईन राबविण्यात येत होती. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे सन 2017-18 मध्ये राबविण्याचे निश्चित केले. या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता आली नाहीत, त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचा आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

00000
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा दौरा
नांदेड दि. 20 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार, 21 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन आणि आष्टी ता. हदगावकडे प्रयाण करतील. दुपारी 3.20 वा. वाहनाने आष्टी येथे आगमन व भिमा कोरेगाव घटनेसंदर्भातील मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट. दुपारी 3.30 वा. आष्टी येथुन नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती. सायं. 5 वा. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सायं 6 वा. नांदेड येथुन रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
सायबर जाणीवजागृती
कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद
नांदेड दि. 20 :- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ट्रान्सफॉर्मिग महाराष्ट्र अंतर्गत सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांचे मार्गदशनाखाली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला. आयसीआयसीआय बँकेचे सायबर तज्ज्ञ सुमित महाबळेश्वरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. महाबळेश्वरकर यांनी इंटरनेटच्या माध्यमातून बँकीग व ऑनलाईन व्यवहार, फेसबुक, टिव्टर, व्हॉटस्ॲप या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीला तसेच अमिषाला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नका. ऑनलाईन बँकींग व्यवहार करतांना आपली वैयक्तीक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी माहिती गोपनीय ठेवा कुणालाही शेअर करु नका. क्रेडिट व डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करुन आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करा. ऑनलाईन शॉपींग करताना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा आदी माहिती दिली.

कार्यशाळेस शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पी. डी. पोपळे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. शिरसेवाड, पी. एम. राठोड ,महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...