Saturday, February 11, 2017

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 11  :- जिल्ह्यात गुरुवार 23 फेब्रुवारी 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, निवडणुका, उत्सव, उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
ऑनलाईन वाहन नोंदणीसाठी
    परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड दि. 11 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 13 जानेवारी 2017 पासून वाहन नोंदणीसाठी वाहन 4.0 या नवीन प्रणालीद्वारे ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांनी नोंदणीसाठी 13 जानेवारी 2017 पुर्वी वाहन सादर केले होते परंतू काही त्रुटीमुळे त्यांचे नोंदणी झालेली नाही त्यांनी सदर त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी.

तसेच ज्या वाहन मालकांनी वाहनाच्या विविध सेवांसाठी कागदपत्रे कार्यालयात सादर केले आहे परंतू या नवीन प्रणालीमुळे कामकाज प्रलंबित आहे त्यांनी सुद्धा संबंधीत काम विहित शुल्क अथवा वाढीव शुल्काचा भरणा करुन कार्यालयाशी संपर्क साधावा व प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
जिल्हा कोषागार कार्यालयाकडून
 सोमवारी कार्यशाळेचे आयोजन  
नांदेड दि. 11 :- राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) संगणकीयकरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवार 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी केले आहे.
या कार्यशाळेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ऑनलाईन प्रक्रिया, मोबाईल ॲप डाऊनलोड प्रोसेसे, रिसेट आयपीन आदी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या संगणकीयकरणाच्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

000000

Friday, February 10, 2017

जिल्ह्यातील आरोग्य सुविधा , सेवांबाबत
यंत्रणांनी तत्पर रहावे - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड दि. 10 :- कर्करोगाच्या दुष्परिणामाविषयी प्रभावी जनजागृती करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री होऊ नये, सार्वजनिक ठिकाणी तंबाखुचे सेवन, धुम्रपान यासाठी कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. आरोग्याशी निगडीत विविध यंत्रणांनी समन्वयाने आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबाबत काही यंत्रणा पुरेशा सतर्क नसल्याबाबत श्री. काकाणी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशीत केली.
आरोग्य विभागाशी निगडीत विविध समन्वय समितींच्या बैठकीत श्री. काकाणी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हत्तीरोग नियंत्रणासाठीची सामुदायीक औषधोपचार मोहीम, कर्करोग पंधरवडा म्हणून 20 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम याबाबत बैठकीत माहिती सादर करण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागाशी निगडीत विविध कार्यक्रम, समन्वय आणि संनियंत्रण समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. बी. एम. शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॅा. राजेंद्र पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा. उत्तम इंगळे, डॅा. डी. टी. कानगुले आदींसह, पोलीस उपअधिक्षक अशोक बनकर आदींची उपस्थिती होती.
बैठकीत कुष्ठरोग प्रतिबंध आणि रुग्णांसाठीच्या सेवा-सुविधा, प्रसृतीपुर्व लिंग निवड  प्रतिबंत्माक कायद्यातील उपाय योजना आणि तरतूदी, तसेच अत्यावश्यक सेवा 108 रुग्णवाहिका, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्यासह जिल्हा शल्य चिकीत्सकांकडील विविध योजना, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विविध योजना यांचाही आढावा सादर करण्यात आला. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध सूचना केल्या. तसेच या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अद्ययावत अहवाल सादर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

000000
जिल्हयातील सर्व न्यायालयात
आज  राष्ट्रीय लोकअदालत
तडजोडीसाठी 7 हजार 961 प्रकरणे 
नांदेड दि. 10 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेडच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 11 फेब्रुवारी 2017 रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा न्यायालयात लोकअदालतीसाठी एकूण 10 पॅनल तयार करण्यात आले असून प्रलंबित 1175 प्रकरणे व दाखल पुर्व प्रकरणे 2907 अशी एकूण 4082 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. जिल्हयातील तालुका न्यायालयातील प्रलंबित 1968 प्रकरणे व दाखलपुर्व 1793 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय यांचे पॅनल सुध्दा त्या-त्या न्यायालयात कार्यरत आहेत. जिल्ह्यातून एकूण  7961 प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली असून त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, भूसंपादन, महसूल व इतर, तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात असलेली प्रलंबित व दाखपुर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आली आहेत. ते सामंजस्याने मिटविण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील, सर्व विधिज्ञ, भूसंपादन अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी, मनपा अधिकारी, हे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
नांदेड अभिवक्तासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच विविध विमा कंपनी, मनपा, महसुल विभाग यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली निघतील असा विश्वास सविता बारणे यांनी व्यक्त केला आहे. या दिवशी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत व आपसातील वाद सामंजस्याने मिटविण्याच्या या  संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे प्रभारी सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी केले आहे.                  

0000000
धर्मादाय आयुक्तांचे संस्था, न्यासांना आवाहन
नांदेड दि. 10 :- जिल्ह्यातील सर्व संस्था व न्यासाच्या विश्वस्तांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये विशेष मोहिमेअंतर्गत आपल्या संस्थेच्या संदर्भातील कलम 22 अन्वये बिनवादाची फेरफाराची सर्व प्रलंबीत प्रकरणे 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत कार्यालयामार्फत निकाली काढावयाची असल्याने सर्व संबंधितांनी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून व आवश्यक सर्व दस्तऐवज सादर करुन प्रलंबीत बिनवादाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी केले आहे.

0000000
जि.प.,पं.स. निवडणूक मतदानादिवशीचे
आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड दि. 10 :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या हद्दीत ज्या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्यास आणि ते अन्य दिवशी भरण्यास मान्यता प्रदान केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्रदान अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या हद्दीत ज्या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
ज्या गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 17 फेब्रुवारी 2017 रोजी भरविण्यात यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

000000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...