Monday, January 30, 2017

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज
 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवार 31 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9.30 ते सायं.5.30 या वेळेत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरात पुणे येथील ख्यातनाम इंग्रजीचे वक्ते प्रा. राजेश अग्रवाल हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या संदर्भातील इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये चार रंगाचा पेन व नोटबुक यासह उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000
कुष्ठरोगाविषयी माहिती देणाऱ्या
जनजागृती रॅलीचा उत्साहात शुभारंभ
नांदेड दि. 30 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानानिमित्त जनजागृती रॅलीचा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी हिरवा झेंडा दाखून नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी पुतळा पासून शुभारंभ केला. यापुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मान्यवरांची पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्याम नागापुरकर, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. डी. टी. कानगुले, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. परतवाघ, डॉ. आईटवार, डॉ. एच. आर. साखरे, डॉ. नईम अन्सारी आदी वैद्यकीय अधिकारी, परिचारीका उपस्थित होते.  
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नांदेड यांच्यावतीने आयोजित ही रॅली गांधी पुतळ्यापासून महावीर चौक, वजिराबाद, पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजी पुतळा मार्गे श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी “दिसता चट्टा-डॉक्टरांना भेटा” , “हात मिळवा कुष्ठरोग मिटवा”, “बहुविध औषधोपचार, केला कुष्ठरोग गेला”, “एमडीटीची गोळी करी कुष्ठरोगाची होळी” आदी फलक हातात घेवून उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले होते.  रॅलीच्या समारोपाप्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पथनाट्यामधून कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज व औषधोपचार याची माहिती सादर केली.  रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी महात्मा गांधी पुतळ्यासमोर कुष्ठरोगाविषयी माहिती देणारे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.   
जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती व कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागात व गावामध्येही घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या काळात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले आहे.
0000000000


Friday, January 27, 2017

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत
जिल्ह्यात आज लसीकरण मोहिम
नांदेड दि. 28 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी 2017 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. घरातील, घराशेजारील, परिचित 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलीओचा डोस आवश्य पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आपण प्रवासात असाल तरी डोस पाजण्यास विसरू नका. पोलिओ बुथ सर्व रेल्वे स्टेशन, बसस्थानके येथे आयोजित केली आहेत. बाळ नुकतेच जन्माला आले असेल तरी डोस पाजून घ्या. बाळ आजारी असेल तरी डोस पाजून घ्या. बाळास यापूर्वी कितीही वेळेस डोस दिलेले असतील तरी डोस आवश्य पाजून घ्या. पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आपले योग्य ते योगदान द्या. लस द्या बाळा, पोलिओ टाळा. लसीकरणाला साथ करा, पोलिओ वर मात करा. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्राच्या येणाऱ्या कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येत असून सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
000000


  जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून
एटीएम रुपे डेबीट कार्डचे वितरण  
            नांदेड, दि. 27 :-  केंद्र शासनाच्या धोरणानुसार सर्व पिक कर्जदारांना या वर्षापासून एटीएम रुपे डेबीट कार्ड देण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नांदेड जिल्ह्यातील सर्व पिक कर्जदारांचे एटीएम रुपे डेबीट कार्ड तयार केले असून जिल्ह्यातील प्रत्येक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे क्षेत्रीय व्यवस्थापक एम. जी. केसराळीकर यांनी कळविले आहे.
नांदेड जिल्ह्यात 44 हजार 461 पिककर्जदारांना किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पिक कर्जाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने वितरण केले आहे. येथून पुढे पिककर्जाचे सर्व व्यवहार एटीएम रुपे डेबीट कार्डमार्फतच करण्यात येणार आहेत. पिककर्जदार लाभधारकांनी आपल्या शाखा कार्यालयात शाखा व्यवस्थापकाकडे आपल्या एटीएम रुपे डेबीट कार्डची मागणी करावी. मागणी करीत असताना आधार कार्डची झेरॉक्स प्रत शाखेमध्ये देऊन एटीएम रुपे डेबीट कार्ड हस्तगत करावे. या कार्डचे वितरण रविवार 5 फेब्रुवारी 2017 पर्यंतच करण्यात येणार आहे. तरी संबंधित पिककर्जदार लाभधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन श्री केसराळीकर यांनी केले आहे.   

000
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
रविवारी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा
परिक्षेविषयी उमेदवारांना सूचना  
नांदेड, दि. 27 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा रविवार 29 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील 42 शाळा, महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येतांना प्रवेशपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी, कॅल्पुलेटर, ब्ल्युटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करु नये. परीक्षेत कॉपी, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. परीक्षा  उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून परिक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त व कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000
हरभरा पिक संरक्षणासाठी कृषि संदेश  
नांदेड, दि. 27 :-  जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000


शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
            नांदेड, दि. 27 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 निवडणुकीच्या दिवशी  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर  करण्यात आली आहे. रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा‍ जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...