Friday, September 23, 2016

लेख

पशुसंगोपन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी विविध योजनांचा आधार

नैसर्गिक आपत्ती, अनियमित पर्जन्यमान यासारख्या अनेकविध कारणाने कृषी उत्पादनात घट होते, त्यातूनच शेतकरी अडचणीत सापडतो. अशावेळी शेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. म्हणून राज्य शासनाने पशुसंगोपन, शेळीपालन व कुक्कूट पालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहे. नांदेड जिल्ह्याने या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याविषयी….

शेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन , शेळीपालन व कुक्कूटपालन व्यवसाय करण्यात येतो.  पशुपालन व्यवसाय करुन स्वयंरोजगार निर्मिती होते. मानवी आहरासाठी दुध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी , लोकर इत्यादी तसेच शेतीसाठी शेणखत यासाठी पशुधनाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आता पशुसंगोपन करणे हा जोडधंदा किंवा पुरक व्यवसाय न राहता स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत आहे.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी, अत्यल्प व अल्प कुंटुंबातील पशुपालकांसाठी पशुसवंर्धनाच्या विविध योजना रोजगाराचे मुख्य साधन निर्माण झाले आहे. पशुपालकांनी स्वत:कडील पशुचे जातीने लक्ष देवून पालन पोषण करणे आगत्याचे आहे. त्यांना वेळेवर लसीकरण, औषधोपचार वेळेच्यावेळी करुन घेण्यासाठी जिल्हयाचे ठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय  तसेच तालुक्याचे ठिकाणी तालुका लघु पशुवेद्यकीय सर्व चिकित्सालये अर्धापूर, कंधार, देगलूर, नायगाव व धर्माबाद या 5 ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय स्थानिक स्तरावरील श्रेणी एकचे 74 पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी-2 चे  104 पशुवैद्यकीय दवाखाने असे एकूण 184 पशुवैद्यकीय संस्था जिल्ह्यात कार्यान्वित आहेत.
जनावरांना घटसर्प, फ-या, लाळखुरकुत तसेच शेळया मेंढयाना आंत्रषिार , पीपीआर व कुक्कूट वर्गीय पक्षांना लासोटा, राणीखेत, कोंबडयाची देवी इत्यादी ससंर्गजन्य आजार होत असतात. या जिवघेण्या आजारापासून संरक्षण व आर्थिक उत्पन्नाला बाधा येवू नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे 
पशुपालकांसाठी राज्य शासनाने पशुधन विमा योजना ही देखील एक वरदान ठरणारी योजना आहे. नुकताच 1 ऑगस्ट 2016 ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात आला. यामध्ये पशुपालकांकडील दुभत्या जनावराचा तसेच शेळया मेंढया इत्यादीचा विमा काढण्याची मोहिम राबविण्यात आली. पशुपालकांनी स्वताकडील बहुमुल्य जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी पशुधन विमा करणे आगत्याचे आहे. यामुळे पशुपालकांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून तात्काळ मिळू शकेल.
शेतक-यांचे दारात कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुधनाची वंशावळ टिकून रहावी यासाठी अनुवंशीक सुधारणा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अधिक दुध उत्पादन देणा-या गाई म्हशीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. तसेच त्यांना उच्च वंशावळीच्या रेतनापासून कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यापासून जन्मलेल्या कालवडीसाठी 5 हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात येतात.
पशुपालकाकडे असलेल्या जनावरांना हिरवा चारा, कडबा हा बारीक कुटी करुन खाऊ घालणेसाठी 50 टक्के अनुदानावर 500 लाभार्थीना 2 एचपी विदयुत चलित कडबाकुटी यंत्राचे वाटप सन 2015-16 मध्ये करण्यात आले व सन 2016-17 मध्ये 500 कडबाकुटी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे वाया जाणा-या वैरणीची 40 टक्के बचत होईल.
जिल्ह्यात या वर्षातील आतापर्यत  पाऊस चांगला झालेला आहे. निसर्गाची साथ मिळालेली आहे. पावसाचे पाणी टिकवून ठेवणे व त्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे किमान खरीप व रब्बी या दोन हंगामामध्ये पिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊन अन्नधान्याचे व जनावरासाठी सकस चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. उन्हाळयातील चा-याची कमतरता भासू नये म्हणून मुबलक होणा-या चा-याचे उत्पादनातून मुरघास तयार करणे फायदयाचे ठरेल. यासाठी प्लास्टीकच्या चारा बॅगचाही वापर करता येईल. अतिरिक्त वैरणीचे उत्पादन मुरघासचे रुपात साठवून ठेवता येईल व त्याचा वापर उन्हाळयाच्या दिवसात तसेच चा-याची कमतरता असलेल्या दिवसात करता येऊ शकेल.
शहरातील पशुपालकासाठी जमिनी अभावी वैरण उत्पादन घेणे शक्य नसते अशावेळी शहरानजिकच्या पशुपालकांकडून हिरवी, वाळलेली वैरण कुटी करुन विक्री करणे हा देखील व्यवसायरुपाने करता येवू शकेल व उत्पन्नात वाढ करता येईल. शेतीला पुरक ठरणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून ओळखला जात आहे. या पूरक व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधा आर्थिक मदत, शेतकऱ्यांचा त्यामध्ये असणारा सहभाग या सर्व बाबींचा विचार केला तर नजिकच्या कालावधीत पशुसंवर्धन हा जोड व्यवसाय न रहाता मुख्य व्यवसाय म्हणून नावारुपास येईल.  
-         दिलीप गवळी,
जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

0000000
जिल्ह्यात हंगामात 90.99 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 22.97 मि.मी. 

           नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात  शुक्रवार 23 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 367.57 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 22.97 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 869.47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. ( सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा- 123.72, अर्धापूर- 106.87, भोकर- 105.93, नांदेड- 105.45, हदगाव- 98.75, कंधार- 94.41, मुखेड- 93.40, बिलोली- 92.10, माहूर- 89.80, नायगाव- 86.78, हिमायतनगर- 86.49, मुदखेड- 80.96, धर्माबाद- 80.17, उमरी- 75.30, देगलूर- 72.98, किनवट- 72.70. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  90.99 इतकी झाली आहे.     
जिल्ह्यात शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 29.25 (961.64), मुदखेड- 23.33 (691.02), अर्धापूर- 33.00 (929.33) , भोकर- 9.75 (1055.50), उमरी- 18.67 (750.27), कंधार-12.17 (761.48), लोहा- 56.00 (1031.00), किनवट- 0.57 (901.46), माहूर-4.75 (1113.50), हदगाव- 6.86 (965.12), हिमायतनगर- 3.00 (845.31), देगलूर- 37.33 (657.01), बिलोली- 38.60 (891.60), धर्माबाद- 17.00 (734.05), नायगाव- 32.00 (794.60), मुखेड- 45.29 (828.56) आज  अखेर  पावसाची सरासरी 869.47  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13911.45) मिलीमीटर आहे. 

00000
मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास असणारे
ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : माजी कुलगुरू डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाने शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. म्हैसेकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. शिक्षण, समाजकारण, ग्रामविकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला अमीट ठसा उमटविला होता. विशेषतः मराठवाड्याच्या विकासाचा अखेरपर्यंत त्यांना ध्यास होता. देशातील शिक्षण व्यवस्थेतील बदलाबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधून या क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. राज्य नियोजन समिती, राज्य तांत्रिक शिक्षण मुल्यमापन समिती, पंचायत राज मुल्यमापन समिती, रोजगार हमी योजनेबाबतची समिती अशा विविध समित्यांसह मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत त्यांचा मोठा वाटा होता.

…………………………………..…………………………………..
प्रसिद्धी पत्रक                                                                                                                                                              राजभवन, मुंबई            
                                       दि. 23 सप्टेंबर 2016

गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, माजी कुलगुरू, राज्यसभा सदस्य प्राचार्य डॉ. गोविंद रामचंद्र म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.  
डॉ. गो. रा. म्हैसेकर थोर शिक्षक, प्रशासक आणि आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एक सुहृद व्यक्ती होते. गरीब विद्यार्थ्यांना व उपेक्षितांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावी याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा सदस्य तसेच इतर जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. डॉ. म्हैसेकर माझे गुरु होते. त्यांच्या निधनाबद्दल मी सरांच्या स्मृतीला अभिवादन करतो, तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी चेन्नई येथून पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. (राज्यपालांकडे तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते सध्या चेन्नई येथे आहेत.)
000000



Thursday, September 22, 2016

राष्ट्रीय स्वच्छता मोहिम 25 सप्टेंबर ते
11 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार
नांदेड, दि. 22 :- स्व. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर 2016 रोजीच्या जयंती दिनापासून 11 ऑक्टोंबर 2016 या जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनापर्यंत राष्ट्रीय स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी असे केंद्र शासनाने कळविले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करुन 2 ऑक्टोंबर 2014 पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यास एक वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने लोकांच्या वर्तणुकीत चिरस्थायी बदल करण्यास्तव व्यापक जनजागृती करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन ही मोहीम राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रविवार 25 सप्टेंबर ते मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असताना अभियानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉकेथॉन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, पथनाट्य, पदयात्रा, संगीत व निबंध स्पर्धा, चर्चासत्र, प्रदर्शन, स्वच्छताविषयक इतर सामुदायीक उपक्रम आयोजित करण्यात यावेत. रेडीओ, टिव्ही, वृत्तपत्रे इत्यादी जनसंपर्क माध्यमाचा इंटरनेट मोबाईल इत्यादी डिजीटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शासनाच्या दि. 23 सप्टेंबर 2015 रोजीच्या परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक 201509231616296525 असा आहे. संबंधितांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नांदेड यांनी केल्या आहेत.
0000000
जप्त केलेल्या रेतीसाठ्याच्या तिसऱ्या फेरीचा   
तहसिल कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 22 -  नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 40 ठिकाणचा अंदाजे 17 हजार 136 ब्रास रेतीसाठा जप्‍त करण्यात आला असून या रेती साठ्याचा तिसरी फेरी लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली शुक्रवार 23 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
इच्छुकांनी नांदेड तालुक्यातील स्थळाचे ठिकाण असलेला रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
ओटिएसपी योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबर मुदतवाढ
           नांदेड, दि. 22 :-  सन 2016-17 या वर्षामध्ये ओटिएसपी (आदिवासी) योजनेअंतर्गत नवीन विहिर व इतरबाब घटकांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांनी परिपूर्ण अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत पंचायत समिती स्तरावर सादर करावेत, असे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती कृषि समिती जिल्हा परिषद नांदेड व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषि‍ विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...