Thursday, September 8, 2016

ठिबक, तुषार संच बसविण्यासाठी
अर्ज करण्याची 6 ऑक्टोंबर पर्यंत मुदत
        नांदेड, दि. 8 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजने अंतर्गत (PMKSY) केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन येाजना सन 2016-17 साठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज ऑनलाईन www.mahaagri.gov.in व www.mahaethibak.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन भरलेल्या अर्जांची एक प्रत सातबारा उतारा, 8-अ  उतारा, आरटीजीएसची सुविधा असलेल्या बँकेतील खाते पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्ससह संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात गुरुवार 6 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या कार्यक्रमातंर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 60 टक्के व सर्वसाधारण भुधारकांसाठी 45 टक्के तर अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 45 टक्के व सर्वसाधारण भुधारकासाठी 35 टक्के अनुदान देय आहे. या योजने अंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऊस, कापुस यासारखी सर्व नगदी पिके, केळी, द्राक्षे, डाळींब यासारखी सर्व फळपिके, याशिवाय सर्व कडधान्य, तृणधान्य, गळीत पिके तसेच हळद, आले इत्यादी पिकांसाठी या योजने अंतर्गत शेतक-यांना सर्व प्रकारच्या सुक्ष्म सिंचन पध्दतीला अनुदान अनुज्ञेय आहे. दिनांक 6 ऑक्टोंबर 2016 पर्यंत अर्ज ऑनलाईन केले नाही व ठिबक / तुषार संच बसविले तर या संचास नवीन मार्गदर्शक सुचनान्वये अनुदान दिले जाणार नाही.

0000000
प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्राधान्यक्रम यादी
ग्रामसभेद्वारेच अंतिम होणार  - जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

नांदेड, दि. 8 :- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी तयार करावयाच्या प्राधान्यक्रम याद्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधितांना जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत. योजनेची यादी तयार करण्यासाठी काल्पनिक असा विहित अर्ज तयार करुन तो लाभार्थी निहाय ग्रामपंचायतस्तरावर भरुन घेतला जात आहे. हे अर्ज चुकीचे असून या प्रक्रियेवर कुणीही अवलंबून राहू नये. यातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक होऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. असे विहित अर्ज शासनाकडून भरुन घेण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. ग्रामसभेद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची प्राधान्यक्रम यादी तयार होणार आहे. याबाबत संबंधिताने नोंद घ्यावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाने ग्रामीण भागातील बेघर कुटूंब लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल देण्यासाठी सन 2016-17 यावर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही राबविण्यात येणार आहे. या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी योजनेसाठी पात्र कुटुंबांची ग्रामपंचायत प्रवर्गनिहाय याद्या पडताळणी करुन ग्रामसभेद्वारे अंतिम करण्यात येत आहे.
या योजनेचा ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना लाभ देण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण-2011 ची माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा वापर करुन प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेसाठी लाभार्थी निवडीची प्राधान्यक्रम याद्या ग्रामपंचायतनिहाय ग्रामसभा आयोजित करुन तयार करण्याचे पुढीलप्रमाणे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) चे ग्रामपंचायत निहाय प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी किंवा त्यादरम्यान ग्रामसभेचे आयोजन करणे. ग्रामसभेपुढे योजनेच्या अनुषंगाने पुढील विषयाचा समावेश राहणार आहे.  
प्रत्येक ग्रामपंचातीकडे प्राप्त प्राधान्यक्रम यादीतून इतर संवर्गातून अल्पसंख्यांक संवर्गातील जैन, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारशी व मुस्लिम कुटुंबांची स्वतंत्र प्रपत्र-अ मध्ये यादी मुळ प्राधान्यक्रम यादीतील प्राधान्यक्रम अबाधित ठेवून तयार करावयाचे आहे. ग्रामपंचायतीकडे जेवढे प्राधान्यक्रम यादी प्राप्त झाली आहे. त्या यादीतील अपात्र लाभार्थीची नावे वगळुन, कमी करुन प्रपत्र-ब मध्ये (अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक व इतर) प्रवर्गाची प्रवर्गनिहाय यादी तयार करणे.प्रत्येक ग्रामपंचायतीकडे जेवढी प्राधान्यक्रम यादी प्राप्त झालेली आहे. या यादीतील ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेचा लाभ न देणेसाठी विविध कारणाने कमी करावयाचे आहे, वगळावयाचे आहे जसे यादीत चुकीने समाविष्ठ, यापुर्वी लाभ, मयत, पक्के घर, स्थलांतरीत व अशा इतर कारणानी  अशा लाभार्थीची प्रवर्गनिहाय नावे प्रपत्र-क मध्ये घ्यावयाची आहेत. संबंधित ग्रामपंचायतींकडे प्राप्त प्राधान्यक्रम यादीमध्ये समावेश नसलेल्या परंतु प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) करीता योजनेचा लाभ देणेसाठी पात्र ठरणाऱ्या ग्रामसभेनी सुचविलेल्या नवीन कुटुंबांची लाभार्थी निहाय संवर्गनिहाय स्वतंत्र अशी यादी (अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक व इतर) प्रपत्र-ड  मध्ये  तयार  करुन  मान्यता  घेऊन  सादर  करावयाची आहे.
याप्रमाणे प्रक्रिया पुर्ण करुन ग्रामसभा ठरावाद्वारे संवर्गनिहाय याद्या संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती तथा अध्यक्ष तालुकास्तरीय समिती यांच्याकडे सादर करावयाचे आहे. संबंधित ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठीच्या याद्या तातडीने सादर करण्याबाबत जिल्हास्तरावरुन पाठपुरावा करण्यात येणार आहे.  

000000

Wednesday, September 7, 2016

गणेश मंडळांनी संवाद पर्वच्या माध्यमातून
शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात
-        जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

  नांदेड, दि. 7 :- गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनावर आधारीत देखावे व संवाद पर्वच्या माध्यमातून गणेश मंडळांनी जनतेपर्यंत पोहचाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.   
नांदेड जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान, लोकमान्य गणेशोत्सव पुरस्कार घोषणा व गणराया अवार्ड-2015 चे वितरण श्री. काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, हजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक डी. पी. सिंघ, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आदी उपस्थित होते.  
गणेशोत्सव कालावधीत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध पुरस्कारही जाहीर केले आहेत. गणेशोत्सव प्रभावी माध्यम असल्याने गणेश मंडळांनी शासनाच्या विविध समाजपयोगी व कल्याणकारी योजनेवर आधारीत देखावे सादर करुन त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचावी. गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने “संवाद पर्व” हा उपक्रम हाती घेतला आहे. गणेश मंडळांनीही यामध्ये सहभागी व्हावे. कृषि व्यवसायाशी निगडीत तसेच लोकशिक्षणामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, उज्ज्वल नांदेड आदी लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावे असे सांगून श्री. काकाणी यांनी गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सहिष्णुता, एकोपा व सहकार्याचा वातावरणात व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक  संजय ऐनपुरे यांनी केले. तर शांततेच्या, खेळीमेळीच्या व उत्सवाच्या वातावरणात बकरी ईद व गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांनी केले.
या
वेळी गणेशोत्सव-2015 मध्ये नांदेड जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपताना पर्यावरणपूरक व समाजोपयोगी केलेल्या कामगिरी बद्दल विविध गणेश मंडळांना पोलीस विभागाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांक- श्री सर्वश्वर गणेश मंडळ रंगार गल्ली नांदेड, द्वितीय क्रमांक- पटेल बाल गणेश मंडळ विनायकनगर नांदेड, तृतीय क्रमांक- श्री कृष्ण यादव गणेश मंडळ गोकुळनगर देगलूर यांना देण्यात आले. विविध उपक्रमांतर्गत साई गणेश मंडळ मोरया गल्ली कंधार, अष्टविनायक गणेश मंडळ नवीन बस्थानक भास्कर नगर बिलोली, श्री विठ्ठलेश्वर गणेश मंडळ मांजरम ता. नायगाव, आर्य वैश्य गणेश मंडळ सराफा लाईन किनवट, सार्वजनिक गणेश मंडळ इस्लापूर यांना देण्यात आले. तर उत्तेजनार्थ बक्षीस सार्वजनिक गणेश मंडळ मोंढा भोकर, जयभवानी युवा गणेश मंडळ कंधार, शासकीय आयुर्वेदीक गणेश मंडळ वजिराबाद नांदेड, विघ्नहर्ता गणेश मंडळ धर्माबाद या गणेश मंडळांना श्री. काकाणी व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.  
प्रारंभी प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची सादरीकरणातून माहिती दिली. या अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील 200 गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आदर्श गणेश विसर्जन कसे व्हावे याची चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. देवराये यांनी केले. या कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.  

000000
स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करणाऱ्यांनी
सामाजिक भान ठेवून काम करावे
- जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी

नांदेड, दि. 7 :- स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करुन प्रत्यक्ष काम करताना सामाजिक भान ठेवून काम करावे आणि आपली कर्मभुमी हीच मातृभुमी आहे अशी भावना मनात रुजवावी , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.
उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता वर्ग-1 पदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबीरात श्री. काकाणी बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे हा सोहळा काल संपन्न झाला. यावेळी मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रा. मनोहर भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या यशावर न थांबता यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजे त्याच बरोबर समाजाचे काही देणे लागतो ही ऊर्जा मनात ठेवून इतरांनाही प्रवाहात आणावे. दैनंदिन जीवन जगत असताना दररोजच्या परिक्षेला मानसिकतेने तयार राहिले तर त्याच ऊर्जेतून नवीन दिशा मिळत जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 पदासाठी निवड झालेले उमेश मुदखेडे, लिंगुराम राजुरे, सखाराम माने, राहूल शिवशेट्टे, शिवहार येजगे, मयुरी पुणे, शिवगंगा पवार, राजेश गजलवाड तर जिल्हा प्रशिक्षण संस्था जेष्ठ अधिव्याख्याता वर्ग-अ पदी निवड झालेले जगन्नाथ कापसे, मंजुषा औढेंकर या गुणवंताचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. मनोहर भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच गुणवंतानी आपले मनोगत व्यक्त केले. उज्ज्‌वल नांदेड उपक्रमात आम्ही आमचे योगदान देवू असे सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले. शिबिरासाठी आरती कोकुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, रघुवीरसिंह, लक्ष्मण शन्नेवाड, मयुर कल्याणकर यांनी संयोजन केले.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...