Wednesday, September 7, 2016

गणेश मंडळांनी संवाद पर्वच्या माध्यमातून
शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात
-        जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

  नांदेड, दि. 7 :- गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनावर आधारीत देखावे व संवाद पर्वच्या माध्यमातून गणेश मंडळांनी जनतेपर्यंत पोहचाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.   
नांदेड जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान, लोकमान्य गणेशोत्सव पुरस्कार घोषणा व गणराया अवार्ड-2015 चे वितरण श्री. काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, हजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक डी. पी. सिंघ, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आदी उपस्थित होते.  
गणेशोत्सव कालावधीत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध पुरस्कारही जाहीर केले आहेत. गणेशोत्सव प्रभावी माध्यम असल्याने गणेश मंडळांनी शासनाच्या विविध समाजपयोगी व कल्याणकारी योजनेवर आधारीत देखावे सादर करुन त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचावी. गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने संवाद पर्व हा उपक्रम हाती घेतला आहे. गणेश मंडळांनीही यामध्ये सहभागी व्हावे. कृषि व्यवसायाशी निगडीत तसेच लोकशिक्षणामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, उज्ज्वल नांदेड आदी लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावे असे सांगून श्री. काकाणी यांनी गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सहिष्णुता, एकोपा व सहकार्याचा वातावरणात व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक  संजय ऐनपुरे यांनी केले. तर शांततेच्या, खेळीमेळीच्या व उत्सवाच्या वातावरणात बकरी ईद व गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांनी केले.
या
वेळी गणेशोत्सव-2015 मध्ये नांदेड जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपताना पर्यावरणपूरक व समाजोपयोगी केलेल्या कामगिरी बद्दल विविध गणेश मंडळांना पोलीस विभागाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांक- श्री सर्वश्वर गणेश मंडळ रंगार गल्ली नांदेड, द्वितीय क्रमांक- पटेल बाल गणेश मंडळ विनायकनगर नांदेड, तृतीय क्रमांक- श्री कृष्ण यादव गणेश मंडळ गोकुळनगर देगलूर यांना देण्यात आले. विविध उपक्रमांतर्गत साई गणेश मंडळ मोरया गल्ली कंधार, अष्टविनायक गणेश मंडळ नवीन बस्थानक भास्कर नगर बिलोली, श्री विठ्ठलेश्वर गणेश मंडळ मांजरम ता. नायगाव, आर्य वैश्य गणेश मंडळ सराफा लाईन किनवट, सार्वजनिक गणेश मंडळ इस्लापूर यांना देण्यात आले. तर उत्तेजनार्थ बक्षीस सार्वजनिक गणेश मंडळ मोंढा भोकर, जयभवानी युवा गणेश मंडळ कंधार, शासकीय आयुर्वेदीक गणेश मंडळ वजिराबाद नांदेड, विघ्नहर्ता गणेश मंडळ धर्माबाद या गणेश मंडळांना श्री. काकाणी व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.  
प्रारंभी प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची सादरीकरणातून माहिती दिली. या अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील 200 गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आदर्श गणेश विसर्जन कसे व्हावे याची चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. देवराये यांनी केले. या कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.  

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...