Wednesday, September 7, 2016

स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करणाऱ्यांनी
सामाजिक भान ठेवून काम करावे
- जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी

नांदेड, दि. 7 :- स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करुन प्रत्यक्ष काम करताना सामाजिक भान ठेवून काम करावे आणि आपली कर्मभुमी हीच मातृभुमी आहे अशी भावना मनात रुजवावी , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.
उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता वर्ग-1 पदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबीरात श्री. काकाणी बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे हा सोहळा काल संपन्न झाला. यावेळी मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रा. मनोहर भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या यशावर न थांबता यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजे त्याच बरोबर समाजाचे काही देणे लागतो ही ऊर्जा मनात ठेवून इतरांनाही प्रवाहात आणावे. दैनंदिन जीवन जगत असताना दररोजच्या परिक्षेला मानसिकतेने तयार राहिले तर त्याच ऊर्जेतून नवीन दिशा मिळत जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 पदासाठी निवड झालेले उमेश मुदखेडे, लिंगुराम राजुरे, सखाराम माने, राहूल शिवशेट्टे, शिवहार येजगे, मयुरी पुणे, शिवगंगा पवार, राजेश गजलवाड तर जिल्हा प्रशिक्षण संस्था जेष्ठ अधिव्याख्याता वर्ग-अ पदी निवड झालेले जगन्नाथ कापसे, मंजुषा औढेंकर या गुणवंताचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. मनोहर भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच गुणवंतानी आपले मनोगत व्यक्त केले. उज्ज्‌वल नांदेड उपक्रमात आम्ही आमचे योगदान देवू असे सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले. शिबिरासाठी आरती कोकुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, रघुवीरसिंह, लक्ष्मण शन्नेवाड, मयुर कल्याणकर यांनी संयोजन केले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...