Wednesday, January 21, 2026

वृत्त क्रमांक 77 

शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर सज्ज

आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग व एंडोस्कोपी तपासणी 

नांदेड, दि. 21 जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाने युद्धपातळीवर तयारी पूर्ण केली आहे. याठिकाणी भाविकांना आरोग्याशी संबंधीत विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय एम. पेरके यांनी केले आहे. 

मुख्य कार्यक्रम २५ जानेवारी रोजी असला, तरी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षात घेता २२ ते २६ जानेवारी या कालावधीत व्यापक स्वरूपात आरोग्य सेवा व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व शासकीय आरोग्य यंत्रणांसह नांदेड व परभणी जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. 

मुख्य कार्यक्रमस्थळी २ बाह्यरुग्ण विभाग (OPD) तसेच ५ खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येणार असून, येथे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत असंसर्गजन्य रोग, कर्करोग, दंतरोग, महिलांचे आजार यांची मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषधोपचार सेवा दिली जाणार आहे. 

आपत्कालीन सेवेसाठी कार्यक्रमस्थळी १० शासकीय रुग्णवाहिका तसेच टोल फ्री क्रमांक १०८ अंतर्गत १५ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पोटाच्या आजारांसाठी एंडोस्कोपी तपासणी तसेच कर्करोग तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना स्वतंत्र कामकाजाचे वाटप करण्यात आले असून, भाविक व नागरिकांना दर्जेदार, तात्काळ आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे, तपासणीअंती वृद्ध नागरिकांना काठीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच विविध योजनांशी संलग्न खाजगी रुग्णालयांमार्फत नांदेड शहरातील प्रमुख मार्ग, वाहनतळ तसेच भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अरुणोदय सिकल सेल तपासणी शिबिरे, रक्तक्षय तपासणी, असंसर्गजन्य रोग तपासणी, वृद्ध व बालकांची आरोग्य तपासणी, आर.के.एस.के. कार्यक्रम तसेच आभा कार्ड निर्मिती यासाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 

याशिवाय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे विशेष राखीव खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णतः सज्ज असून, नागरिकांनी या मोफत सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

विशेष वृत्त क्रमांक 74 

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या त्याग व बलिदानाला विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतातून दिला उजाळा 

सामूहिक गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश पोहोचविण्याचे कार्य – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड, दि. 21 जानेवारी : हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या धर्मरक्षण, त्याग व बलिदानाला भावपूर्ण उजाळा दिला. 

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हात जोडून “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” हे गीत सादर केले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर”, “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आला आहे. या माध्यमातून गुरुंचा ऐतिहासिक त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी सहभागी शालेय विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. तसेच दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा एक भाग म्हणून हा सामूहिक गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास हिंद दी चादर क्षेत्रीय समितीचे सह-अध्यक्ष कैलास खसावत, क्षेत्रीय समितीचे सह-सचिव तथा जागरण समितीचे सदस्य भगवान राठोड, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी तथा कार्यक्रमाचे शासकीय समन्वयक डॉ.जगदीश सकवान, नोडल अधिकारी विजयकुमार पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, खालसा आयटीआयचे प्राचार्य गुरुबचन सिंग शिलेदार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी सचखंड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या नकाशाच्या स्वरूपात उभे राहून सामूहिक गीत गायन सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सामूहिक गीत गायन कार्यक्रमात नांदेड शहरातील पिपल्स हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, खालसा हायस्कूल, खालसा आयटीआय, अशोक हायस्कूल, फेजुल उलूम हायस्कूल, केंब्रिज विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, राजश्री शाहू हायस्कूल, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, ज्ञानभारती विद्यामंदिर, नागार्जुना पब्लिक स्कूल, ग्यानमाता विद्याविहार, पिनॅकल इंटरनॅशनल, नारायणा इंटरनॅशनल, पोतदार इंटरनॅशनल, दशमेश ज्योत इंग्लिश स्कूल, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, आंध्र समिती हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल आदी शाळांतील जवळपास १० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

000000















 वृत्त क्रमांक 76 

जलतारा- पाणीदार नांदेड मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलतारा कामाचा ऑनलाईन आढावा 

नांदेड, दि. 21 जानेवारी :- जलतारा – पाणीदार नांदेड या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जलताराचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जलतारा प्रकल्पाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली उपस्थित होत्या. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या संकल्पनेला अनुसरून जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमिनीची धूप रोखणे, जमिनीची पोत सुधारणे व उत्पादनक्षमता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. 

या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय जलतारा कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश देण्यात आले. तसेच मनरेगाच्या तांत्रिक सहाय्यकांमार्फत गावस्तरावर कॅम्प आयोजित करून प्रस्ताव तयार करावेत व अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे स्पष्ट करण्यात आले. 

तालुक्यांना देण्यात आलेली उद्दिष्टे ही किमान स्वरूपाची असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिक जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कोणतीही टाळाटाळ झाल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 

मस्टर काढण्यासंदर्भात आतापर्यंत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी जिल्हास्तरावरून सोडविण्यात आल्या असून, मंजूर झालेल्या सर्व जलतारांचे मस्टर तात्काळ काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या कामांचा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे आढावा घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

यावेळी अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत सादर केलेल्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला. तसेच तालुका कृषी अधिकारी निहाय आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. 

या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, एमआयएस समन्वयक रूपेश झंवर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक-कम-संगणक चालक तसेच CSO प्रतिनिधी उपस्थित होते.

००००





 

 वृत्त क्रमांक 75 

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

 दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे 

नांदेड दि. २१ जानेवारी :- ‘हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने  'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरूनही २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी नांदेडसाठी  हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल. 

चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी , भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल. 

मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचचा समावेश असेल. 

या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

०००००

विशेष लेख दिनांक 21 जानेवारी 2026

‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला !

गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती

सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले.  निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे.

नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या  ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे.

सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ?

या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून जेव्हा “सीस लेकर उसी ओर चल दिए...” हे शब्द उमटतात, तेव्हा त्यात केवळ संगीत नसते, तर १७ व्या शतकातील वेदना आणि त्यागाचा हुंकार असतो. त्यांच्या याच भारदस्त आवाजामुळे तरुणाई पॉप गाणी सोडून इतिहासाकडे वळली आहे.

व्हायरल 'सत्य': अल्गोरिदमलाही फुटल्या भावना!

आकडेवारीवर नजर टाकली तर थक्क व्हायला होते. २५ ऑक्टोबर २०२५ ला प्रदर्शित झालेल्या 'हिंद की चादर' या गाण्याने युट्युबवर अल्पावधीतच २.७६ कोटी (2.76 Crore+) व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. तर १.८३ लाखांहून अधिक लाईक्स असे सिद्ध करतात, की हे गीत लोकांनी फक्त ऐकले नाही, तर अनुभवले आहे.

 केवळ युट्युबच नाही, तर इन्स्टाग्रामवरही (Instagram) या गाण्याची लाट आली आहे. विशेषतः "सीस लेकर उसी ओर चल दिए" या ओळींवर तरुणाईने बनवलेले हजारो 'रिल्स' (Reels) सध्या सोशल मीडियावर इमोशनल ट्रेंड बनले आहेत.

दुसरीकडे, निर्वैर प्रॉडक्शन (Nirvair Productions) निर्मित १६ मिनिटांच्या डॉक्युमेंटरीला मिळालेले ४६ लाख (46 Lakhs+) व्ह्यूज हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत की, चांगल्या कंटेंटला 'अल्गोरिदम'ची गरज नसते, त्याला 'भावनांचा' आधार असतो.

पुस्तकातील धडा 'मोठ्या पडद्यावर'

शाळांमध्ये इतिहास शिकवला जातो, पण तो पडद्यावर 'दाखवला' तर ?  महाराष्ट्र शासनाने नेमका हाच धागा पकडला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये एक आगळावेगळा राबवत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी (गुरूजी) यांच्या जीवन,शिक्षण आणि सर्वोच्च बलिदानावर आधारित माहितीपट दाखवण्यात येत आहे. या माहितीपटात VFX आणि ॲनिमेशनचा वापर करून जुन्या काळातील 'सेपिया' आणि 'गोल्डन' टोन उभा केला आहे.

राज्यातील शाळांमधून गुरुजींचा इतिहास विद्यार्थी मोठ्या पडद्यावर पाहत आहेत. या इतिहासातून ते प्रेरणा घेत आहेत. इतिहास समजून घेत आहेत. जेव्हा विद्यार्थी पडद्यावर पाहतात,  की गुरुजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भाई लखी शाह बंजारा चक्क स्वतःचे घर जाळून टाकतात, तेव्हा वर्गातली शांतता खूप काही सांगून जाते. जे संस्कार शंभर व्याख्यानांतून करणे अवघड आहे, ते या माहितीपटातून होण्यास मदत होते.

महानायकांना सलाम

हा माहितीपट, गीत इतिहास ‍जिवंत करते. अशा महानायकांना सलाम करते. हा सर्व इतिहास पुस्तकातून आता थेट लोकांच्या काळजात कोरल्या जात आहे.

भाई मख्खन शाह लबाना : ज्यांनी समुद्राच्या तुफानातून वाचल्यावर 'खऱ्या गुरूंचा' शोध लावला.

भाई लखी शाह बंजारा: दिल्लीच्या चांदनी चौकात मुघलांच्या नाकावर टिच्चून ज्यांनी "घरदार जळाले तरी चालेल, पण गुरुजींची शान राहिली पाहिजे," हा बाणा जपला

 भाई जैता जी : गुरुजींचे पवित्र शीर (मस्तक) सांभाळून, अतिशय कठीण प्रवासाने आनंदपूर साहिबला आणले व गुरू तेगबहादुर जी यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह जी यांच्याकडे सुपूर्द केले.

नांदेड : विश्वासाचे केंद्र

या साऱ्याचा केंद्रबिंदू आहे—नांदेड. गोदावरीच्या काठावर वसलेले शहर.  हे केवळ शहर नसून एक मोठे पवित्र तीर्थस्थान आहे. हे पवित्र स्थळ शीख धर्मातील पाच तख्‌तांपैकी एक आहे. येथे हजूर साहिब गुरूद्वारा, ज्याला तख्‌त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब म्हणून ओळखले जाते. दहावे गुरू गुरू गोविंद सिंह यांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे. श्री गुरू गोविंद सिंहांचे वास्तव्य या भूमीस लाभले. त्याचबरोबर गुरू गोविंद सिंहांनी त्यांच्यानंतर पवित्र ग्रंथालाच शाश्वत गुरू म्हणून घोषित केले. शीख धर्माचे अकरावे आणि अंतिम गुरू पवित्र गुरू ग्रंथ साहिब याच ठिकाणी आहेत. त्यामुळे या पवित्र भूमीत होत असलेल्या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी ३५० शहीदी आणि श्री गोविंद साहिब जी  ३५० व्या गुरतागद्दी शताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाकडे संपूर्ण जग पाहत आहे.

शाळेतील मुलांच्या प्रभात फेऱ्या असोत किंवा राज्यातील सिनेमागृहात चित्रपटाच्या सुरूवातीला दाखवले जाणारे गुरूजींच्या जीवनावर आधारित गीत, माहितीपट असो; प्रत्येक ठिकाणाहून गुरूजींचे जीवन, शिकवण आणि त्यांचे सर्वोच्च बलिदान हा संदेश दिला जात आहे. सरताज यांनी गायलेले गीत, गुरूजींवर आधारित माहितीपट  ३५० वर्षांपूर्वीच्या प्रेरक इतिहासाचा आजच्या भाषेतला 'दस्तावेज' (Document) आहे. औरंगजेबाच्या तलवारीपेक्षा गुरुजींचा शांततेचा आणि त्यागाचा मार्ग किती शक्तिशाली होता, हे समजून घेण्यासाठी एकदा तरी ही कलाकृती सर्वांनी पाहायलाच हवी !

गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शहीदीला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होताहेत. परंतु नांदेड येथे होत असलेल्या या कार्यक्रमास विशेष असे महत्त्व आहे. या होत असलेल्या भव्य दिव्य अशा या श्री गुरू तेग बहादूर साहिब जी शहीदी आणि श्री गोविंद साहिबजी 350 व्या गुरतागद्दी शताब्दी कार्यक्रमास उपस्थित राहून, प्रत्येकाने इतिहासाचे साक्षीदार देखील व्हायलाच हवे.

🔗  पाहायला हवंच :

•           गीत (Song) :

https://www.youtube.com/watch?v=Sj3Lwp07KxU

•           माहितीपट (Documentary)

 https://www.youtube.com/watch?v=w_kI87w6NzA&t=1s

 -डॉ. श्याम टरके,

सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर




Tuesday, January 20, 2026

वृत्त क्रमांक 73

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

नांदेड, दि. २०- हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाची, अतुलनीय बलिदानाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरातील शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, गायन व निबंध अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शालेय व तालुकास्तरावरील निवड प्रक्रियेनंतर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते.

आज नांदेड येथील गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे या जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

या स्पर्धांचे कामकाज जिल्हा निवड समिती यांच्या देखरेखीखाली पार पडले. समितीमध्ये डॉ. अमोल निळेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे  यांचा समावेश होता. तसेच सचखंड पब्लिक स्कूलचे प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी गुरु ग्रंथसाहेबजी भवन व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

०००००



वृत्त क्रमांक 72

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात 

बहिरेपणा असलेल्या बालकांना श्रवणयंत्र वाटप  

नांदेड, दि. २० जानेवारी :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आयोजित शिबिरात नांदेड जिल्ह्यातील ७३ बालकांची तपासणी करण्यात आली असून ६० श्रवणयंत्रासाठी पात्र झालेल्या बालकांना आज २० जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे. या बालकांना वेळेत श्रवणयंत्र उपलब्ध करून दिल्याने त्या बालकांना ऐकू येण्यास मदत होणार असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून २ वेळा अंगणवाडीतील व एकवेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ० ते १८ या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात. 

याचाच एक उपक्रम म्हणून १६ ऑक्टोबर २०२५  रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या बालकांचे तपासणीचे शिबीर जिल्हा रुग्णालय नांदेड येथे घेण्यात आले होते. 

हृदयरोग तपासणी (2D ECHO) ,नेत्र रोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत ० ते ०६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. 

या शिबिरासाठी अनिल कांबळे RBSK समन्वयक, विठ्ठल तावडे DEIC व्यवस्थापक, श्रीमती अनिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेतले.

0000





वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...