Monday, January 27, 2025

 वृत्त क्र. 112

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये

 जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक 

नांदेड दि. 27 जानेवारी :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे उद्या मंगळवार 28 जानेवारीला नांदेड येथे येत आहेत. दुपारी 3 वा. त्या विविध विभागाचा आढावा घेणार आहेत. 

नांदेड येथे त्यांचे प्रथम आगमन असून उद्या विविध विभागाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे बैठकीमध्ये घेणार आहेत.

0000

  वृत्त क्र. 111

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आज नांदेडमध्ये 

नांदेड दि.27 जानेवारी : राज्यांना आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आज नांदेडमध्ये येत असून उद्या विविध विभागाचा आढावा ते घेणार आहेत.

उद्या सकाळी त्यांचे नऊ वाजता मुंबईवरून आगमन होणार असून त्यानंतर सकाळी ११.३० वाजता अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्याकडे ते आढावा घेणार आहेत.

त्यानंतर दुपारी बारा वाजता शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत शालेय पोषण आहार संदर्भात आढावा घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा कार्यक्रमाधिकारी व प्रकल्प अधिकारी तसेच विविध योजनेचे पुरवठादारासोबत चर्चा करणार आहेत.सोबतच उद्या ते विविध शासकीय गोदामांची पाहणी सुद्धा करणार आहेत.

00000

 वृत्त क्र. 110

नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

नांदेड दि. २८ जानेवारी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा  साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नांदेड येथील नांदेड येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले.यावेळी बोलताना मिनगीरे यांनी मराठी भाषा संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेचे जतन व्हावे, प्रचार प्रसिद्धी व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषेचे ज्ञान राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.    

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

प्रख्यात व्याख्याते नितीन कसबे यांनी देखील यावेळी मराठी संवर्धनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रचालक केंद्र सूत्रसंचालन कैलास चंद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महानगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

00000



 वृत्त क्र. 109 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत 

किनवट येथे ८ फेबुवारीला शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर 

नांदेड, दि.२८ जानेवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11ः00 वाजता या महाशिबिराचे उदघाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, अभिजीत राउत, जिल्हाधिकारी, नांदेड,श्रीमती दलजीत कौर जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले आहे.

00000

 महत्त्वाचे वृत्त क्र. 108   

चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित

नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही 

 

·         कोणत्याही अफवांना बळी पडू नका

·         पशुसंवर्धन विभागाचे नागरिकांना आवाहन

 

नांदेड दि. 27 जानेवारी :- बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाज माध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.   

 

यासंदर्भात आज एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारा संदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक  प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्डफ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केला आहे.

 

किवळा या गावी साधारणता 20 तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रीयस्तरीय प्रयोग शाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्डफ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील 1 किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे 382 मोठे पक्षी आणि 74 छोटे पक्षी असे एकूण 456 पक्षी नष्ट केले आहेत. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.

 

त्याचबरोबर संसर्ग झालेल्या 1 किमी क्षेत्राबाहेरील बाधित क्षेत्राच्या 10 किमी अंतरापर्यत आपण सर्तकता क्षेत्र घोषित केले आहे. त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत त्याचे नमुने दर 15 दिवसाला पुढील 3 महिन्यांपर्यंत प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे निदान केले जाणार आहे. त्या पक्षांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहे. 

 

साधारपणे बर्डफ्लू हा रोग 2006 पासून राज्यात दिसून आला आहे. तेंव्हापासून एक आदर्श कृती प्रतिसाद धोरण पशुसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे. याअंतर्गत नियमितपणे आजारी व निरोगी कुक्कुट पक्षाचे नमुने प्रयोग शाळेमध्ये सादर केले जातात. त्यातूनच आपल्याला कुठे जर बर्डफ्लूची लक्षणे दिसून आली तर त्याचे निदान होते. बर्डफ्लू आजार केवळ स्थलांतरण झाले तर पक्षांमध्ये पसरतो. त्यामुळे स्थलांतरण रोखणे त्यावरचा प्रमुख उपाय असतो. जिथे हा रोग आढळून येतो तिथले कुक्कुट पालन 3 महिन्यासाठी थांबविण्यात येते. त्यामुळे या रोगाचा प्रसार निश्चितपणे थांबवता येते. नागरिकांनी यासंदर्भात निर्धास्त असावे. आपण खात असलेले चिकन, अंडी हे शंभर टक्के सुरक्षित आहेत, याचीही खात्री प्रत्येक नागरिकांनी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

0000



Sunday, January 26, 2025

  वृत्त क्रमांक 107

'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे

२२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा

नांदेड, दि. २६ जानेवारी : भोकर मतदार संघातील युवकांसाठी श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार नावाच्या फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे,  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार,आदी मान्यवर उपस्थित होते. 

आमदार झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी पहिल्याच महिन्यात त्या कामाला लागल्या असून, त्यांच्या 'युवा उमेद' उपक्रमातून युवकांना रोजगाराची संधी चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री ना अतुल सावे यांनी व्यक्त केली. रोजगार व स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक दर्जोन्नतीसाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी सुरु केलेल्या 'युवा उमेद' उपक्रमाचे फेसबुक पेज व इन्स्टाग्रामचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

'युवा उमेद'च्या वतीने शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे विमोचन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ती संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था 'महाज्योती'चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी आवर्जून घोषित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. मराठवाड्यासारख्या भागात देखील ही गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खा. अशोकराव चव्हाण या कार्यक्रमात म्हणाले. आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार मेळावा तर आयोजित केलाच आहे; सोबतच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत कशी होते, तिथे कसे बोलायचे, कसे कपडे घालायचे, आदींबाबत माहिती देणारे मेळावापूर्व प्रशिक्षण देखील आयोजित केले आहे. यातून मुलाखतीसाठी जाताना युवकांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा लाभ होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही 'युवा उमेद' उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.

0000








 वृत्त क्रमांक 106

पोलीस कवायत मैदानावर

पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेकांचा सत्कार पुरस्कार  

•  पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी केले हितगुज

* चित्ररथाच्या सादरीकरणाचेही कौतुक   

नांदेड दि. 26 जानेवारी :  76 व्या प्रजास्त्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात आज अनेक मान्यवरांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. काहींना त्यांच्या उपलब्धीसाठी तर काहींना विशिष्ट सेवेसाठी मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी चित्ररथांनी देखील मैदानावरील पथावर संचलन केले. 

या कार्यक्रमाला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

स्वातंत्र्य सैनिकांशी हितगुज 

ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. यावेळी त्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत घटनेच्या प्रास्ताविकेचे फोटो देण्यात आले. यावेळी बाबुराव भानुदास जोशी, गयाबाई व्यंकटराव कर्डीय, गंगाबाई शामराव नरंगळे, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुर्यकांता गंगाधरराव गणमुखे, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, सुमंत त्र्यंबकराव कुलकर्णी, प्रेमिलाबाई रामराव अंबुलगेकर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.  

संविधान प्रास्ताविकेचे वितरण 

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान अभियानांतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वितरण केले. 

पुरस्काराचे वितरण

पोलीस विभागातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक संजय जोशी, भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस हवलदार दिलीप राठोड, ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेल्या शेतकऱ्यांमध्ये खैरगाव येथील रामदास लांडगे, हनवता चव्हाण, सोमनाथ सिनगारे, विजय लंगडे, गंगाधर बासरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.   

विद्यार्थ्यांना टॅब वाटप

यावेळी विजाभज प्रवर्गातील आश्रम शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे टॅब वाटप करण्यात आले. विजाभज प्रवर्गातील आश्रमशाळेतील हे 5 विद्यार्थी असून बारावी विज्ञानमध्ये शिकत आहेत. यामध्ये प्रतिक्षा पवार, अश्विनी राठोड, आरती लिमकर, माऊली जगदाडे, दत्ता आडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.  

ग्रामपंचायत विभाग 

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत उल्लेखनीय कार्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील सरपंच प्रतिक्षा पवार, ग्रामपंचायत अधिकारी शैलेंद्र वडझकर, पंचायत विभागाचे आनंद गुणाजी राहटीकर, सचिन पंडितराव सोनुने, मधुकर मानसिंग मोरे यांना पंचायत विभागातील विविध उपलब्धीबाबत पुरस्कृत करण्यात आले. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार भोकर तालुक्यातील नागपूर ग्रामपंचायतला देण्यात आला. द्वितीय पुरस्कार हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतला देण्यात आला तर तृतीय पुरस्कार कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचोलीला देण्यात आला.  

पथकाचे पथसंचलन

परेड कमांडर डॉ. अश्विनी जगताप यांच्या संचलनात आज अनेक पथकांनी पथसंचलन केले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीसबल मुदखेड नेतृत्व निशान सिंह, सय्यद इरफान, जलद प्रतिसाद पथक नेतृत्व योगेश बोधगिरे, वशिष्ठ बिक्कड, पोलीस मुख्यालयाचे दंगा नियंत्रण पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, उमेश कदम, सशस्त्र पोलीस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे, सुरेश टेंगसे, सशस्त्र महिला पोलिस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शालीनी गजभारे, श्रीमती किरण बेंबडे, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे, प्रदीप साखरे, गृहरक्षक दल पुरूष पथक नेतृत्व बळवंत अटकोरे, रवी जनकुट, गृहरक्षक दल महिला पथक नेतृत्व श्रीमती छाया वाघमारे, श्रीमती मंगल बाराते, अग्निशामक दल प्लाटून अग्निशम अधिकारी निलेश कांबळे, सगरोळीचे राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय नेतृत्व शिवराज कदम, मोहित रावणगावकर, राष्ट्रीय छात्रसेना पथक नेतृत्व स्वराज बोरगावे, कु. रंजना यादव, महसूल पथक मंडळ अधिकारी हयुन पठाण, ग्राम महसूल अधिकारी राजकुमार मुंडे, स्काऊट पथक महेश डोबाळे, करण येनगेवाड, एसपीसी प्लाटून शिवांशू मिनू, पोलीस बॅड पथक पीएसआय बी. आर. वाघमारे व सहकारी कर्मचारी, चार्ली (पोलीस विभागाचे मोटार सायकल रायडर) पोलीस कॉ. बंदुके, कैलासे, गायकवाड, बोकारे, श्वान पथक (डॉग स्कॉड युनिट) श्वानाचे नाव आजाद नेतृत्व लकडे, वाहेद बेग, श्री केंद्रे,  मार्क्समॅन वाहन नेतृत्व सचिन घोगरे, रेड्डी. बॉम्ब शोधक व नाशक पथक नेतृत्व प्लाटून कमांडर सोनकांबळे, प्रविण चंदेल, डायल 112 वाहन सय्यद मोईन, दंगा नियंत्रण वाहन नेतृत्व श्री स्वामी, जायभाये, अग्निशमन दलाचे वाहन अग्निशामक अधिकारी के. एस. दासरे, प्रकाश ताटे, 108 रुग्णवाहिका डॉ. रमेश वरवटकर व चालक देविदास किर्तन यांचा समावेश होता. 

विविध विभागाचे चित्ररथ

यावर्षीच्या पथसंचनालनाचे आकर्षण विविध चित्ररथ व सादरीकरण होते. यात महिला व बालविकास विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सगरोळी, भोकरच्या शाहू महाराज विद्यालयाचे मुलींचे लेझीम पथक, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, क्षयरोग निवारण जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, क्रीडा कार्यालयाचे विविध खेळांचे प्रात्याक्षिक, विद्युत वितरण कंपनीचे अपारंपारिक ऊर्जा जनजागृती, कृषिरथ, जिल्हा माहिती कार्यालयाचा शंभर दिवस कामाचे नांदेडच्या विकासाचे, चार्ली पोलीस विभाग मोटारसायकल रायडर या चित्ररथाचा समावेश होता.   

00000












केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...