Wednesday, January 8, 2025

 वृत्त क्रमांक 31

59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे

11 ते 13 जानेवारी दरम्यान ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन

जेष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांनी घ्यावा

संचालक डॉ. विजय पवार यांचे आवाहन

                                                                                                                                                                        नांदेड दि. 8 जानेवारी :-  59 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे 11 ते 13 जानेवारी, 2025 कालावधीत ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले आहे.  आयुका पुणेचे निवृत्त संचालक डॉ. अजित केंभावी हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष, तर महाराष्ट्राचे शिक्षण (योजना) संचालक डॉ. महेश पालकर हे या उदघाटक असतील. 

तंत्रशिक्षण सह-संचालक अक्षय जोशी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती उदघाटन प्रसंगी राहणार आहे. विशेषतः नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे अधिवेशनास भेट देऊन उपस्थितांना प्रोत्साहित करणार आहेत. तसेच शारदा कन्स्ट्रक्शन प्रा. लीचे संचालक सुमित गणपतराव मोरगे, मविप नवीन नांदेडचे अध्यक्ष सुरेश जोंधळे  देखील उपस्थित असतील. 

दोन दिवसीय अधिवेशनात इसरोच्या चंद्रयान-२ मध्ये सहभागी संशोधिका डॉ. तनुजा पत्की, नॅशनल सेंटर फॉर (कँसर) सेल सायन्सच्या संचालिका डॉ. शर्मिला बापट, मानसिक स्वास्थ्य तज्ञ डॉ. राजेंद्र आगरकर, अनुवंश शास्त्रतज्ञ डॉ. स्नेहल महाजन, नॅशनल केमिकल लॅबचे संचालक डॉ. आशिष लेले व संबंध ऑस्ट्रेलियाला खड्डेमुक्त करणारा मराठी माणूस म्हणून सुप्रसिद्ध डॉ. विजय जोशी यांचे मार्गदर्शन असेल. विज्ञान शिक्षक मुख्याध्यापकांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प कसे करावेत यावर (कट्टा मॉडेल) पुणे येथील विचारवंत डॉ. मिलिंद वाटवे, विनोदराय इंडस्ट्रीजचे संचालक सुनील रायठट्टा तर मॅजिक इनोव्हेशन सेंटर छत्रपती संभाजीनगरचे प्रसाद कोकीळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाय विविध परिसंवादातून संशोधन कृषी विज्ञापीठ परभणीचे संचालक डॉ बी. पी. वासकर, राहुरीचे डॉ सचिन नलावडे, ठाणे येथील अविनाश हरड, डॉ बाळकृष्ण जमदग्नी यांचे देखील मार्गदर्शन होणार आहे. 

ही विज्ञान शिक्षकांसाठी वैज्ञानिक पर्वणीच असणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जगविख्यात शास्त्रज्ञ नांदेडला प्रथमच भेट देत असल्याने यांचा लाभ मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व विज्ञान प्रेमींनी नक्की घ्यावा असे आवाहन मराठी विज्ञान परिषद - मध्यवर्ती चे अध्यक्ष तथा इंडियन केमिकल इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. जेष्ठराज जोशी व ग्रामीण टेक्निकल कॅम्पसचे संकुल संचालक डॉ. विजय पवार यांनी केले आहे.

मराठी भाषेतून वैज्ञानीक संकल्पनांना, कुतुहलांना उजाळा देत मानवी बुद्धिमतेच्या जोरावर वैज्ञानिक प्रगती साधण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या मराठी विज्ञान परिषद - मध्यवर्तीच्या वाटचालीस 58 वर्षे पूर्ण होत आहेत. निमित्ताने अखिल भारतीय अधिवेशनाचे आयोजन मराठी विज्ञान परिषद - मध्यवर्ती, मराठी विज्ञान परिषद, नवीन नांदेड यांच्यातर्फे अधिवेशनाचे संयोजन करण्यात येत असून आयोजन ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या तर्फे करण्यात येत आहेत. 

याच अधिवेशनातून मविप जीवन गौरव पुरस्कार, प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण, सन्मानकार्यांचा गौरव, तसेच स्मरणिका, विविध ई-पुस्तकांचे प्रकाशन संपन्न होईल तर १३ जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन केंद्र, सगरोळी येथे तंत्रशिक्षण सहलीचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात येत आहे. सहभाग व नोंदणीसाठी प्रा. डॉ. धोत्रे पाटील यांचेशी संपर्क 8668537398 साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी मविपची संकेतस्थळास भेट द्यावी https://mavipa.org/59-adhiveshan-2024/  असेही कळविले आहे. 

00000

  वृत्त क्रमांक 30

२०२५ मधील नांदेड जिल्ह्याच्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

नांदेड दि. ८ जानेवारी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना असलेल्या अधिकारान्वये सन 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्या आहे. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी, १ सप्टेंबर, १८ डिसेंबर या तीन तारखांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

यामध्ये १७ जानेवारीला हसरत हाजी सैयाह सखरे मगदूम बडी दर्गाह कंधार ऊर्स, एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तर 18 डिसेंबरला श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा निमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.

केंद्र शासनाची कार्यालय, न्यायालय व बँक वगळता राज्य शासनाच्या सर्व कार्यालयाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, शाळा महाविद्यालयांना, या तीन सुट्ट्या लागू असतील,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

00000

Tuesday, January 7, 2025

 वृत्त क्रमांक 29

सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर 

नांदेड दि. ७ जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे.

नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या ७,८३,९१५ शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्‍कम मंजूर केली आहे. ही रक्‍कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी आता पर्यंत जिल्‍हृयातील ३,८३,२९७ इतक्‍या शेतकर्‍यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्‍या त्या गावाच्या तलाठयांना देण्‍यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्‍यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम जमा होणार आहे. उर्वरीत ४ लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील २ दिवसात भरण्‍यात येणार आहे. 

त्‍यामुळे  सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या शेतकरी यांनी आपल्या तलाठीकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक  घ्‍यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्‍यावी,जेणे करुन त्‍यांच्‍या खात्‍यावर मदतीची रक्‍कम जमा होईल,असे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

00000

 मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम

'सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करा'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद

मुंबई, दि. ७ : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.

शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी घेता किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

.....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

@ विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा

@ ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा

@ शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा

@ नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा 

@ उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

@ शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात 

@ शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

वृत्त क्रमांक 28

पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ 

नांदेड दि. 7 जानेवारी :- स्वयं सहायता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये  मल्टीपर्पज हायस्कुल वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या भव्य विक्री प्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जि. ग्रा वि.यं., जि. प. नांदेड यांच्यामार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्हातील स्वयंसहायता समुहातील महिलासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली इ जिल्हातील उत्कृष्ट उत्पादने घेऊन महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनाला नांदेडकराचा उस्फुर्त सहभाग मिळत आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे. मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत. 

००००













Monday, January 6, 2025









 

वृत्त क्रमांक 27

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत विशेष मोहिमेंतर्गत

6  ते 20 जानेवारी कालावधीत गतीमानता पंधरवड्याचे आयोजन

नांदेड दि. 6 जानेवारी :-  सुशिक्षित बेराजगार युवक व युवती यांनी आपला स्वत:चा उद्योग/व्यवसाय स्थापन करावा, या उद्देशाने राज्य शासन पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाची महत्वाकांक्षी योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हयात मोठया प्रमाणावर उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून 6 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतीमानता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

तरी नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयातील इच्छुक व होतकरु युवक/युवती यांनी तसेच बेरोजगार युवक व युवती यांनी नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे वा व्यवसायवाढ करावयाची आहे अशा इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या योजनेतंर्गत प्रक्रिया असलेल्या/उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपयांपर्यंत या प्रकल्प मर्यादेत कर्ज दिले जाते. ज्यात  सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 15 टक्के अनुदान दिले जाते. तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते. योजनेचे https: maha-cmegp.gov.in संकेतस्थळ असून पात्रतेसाठी अर्जदार हा 18-45 व राखीव प्रवर्गासाठी 18-50 वर्षे वय असावे. आवश्यक कागदपत्रांमध्ये, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आहे. आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरीता लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावी.

या गतिमानता पंधरवडातंर्गत जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी जनजागृती, प्रचार, प्रसिध्दी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. ज्याद्वारे या योजनेतंर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रस्ताव अर्ज प्राप्त असल्यास योजनेच्या अटी व शर्ती तपासून संबंधीत बँकांकडे शिफारस करणे, प्रलंबित अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे, नामंजूर प्रकरणात अर्जदारास परिपूर्ण व योग्य ती माहिती देण्यात येणार आहे.  तसेच एक गांव एक उद्योजक या धर्तीवर प्रत्येक गावातून किमान एका पात्र अर्जदाराची निवड करण्यात येत  आहे.

000000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...