Tuesday, January 7, 2025

 वृत्त क्रमांक 29

सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर 

नांदेड दि. ७ जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील माहे सप्‍टेबर 2024 मधील अतिवृष्‍टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहे.

नांदेड जिल्‍ह्यात सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या ७,८३,९१५ शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लक्ष इतकी रक्‍कम मंजूर केली आहे. ही रक्‍कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी आता पर्यंत जिल्‍हृयातील ३,८३,२९७ इतक्‍या शेतकर्‍यांना ४१७ कोटी ५२ लक्ष इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याचे संदर्भ क्रंमांक ( व्ही.के. नंबर ) त्‍या त्या गावाच्या तलाठयांना देण्‍यात आले आहेत. ( व्ही.के. नंबर ) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकर्‍यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम जमा होणार आहे. उर्वरीत ४ लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील २ दिवसात भरण्‍यात येणार आहे. 

त्‍यामुळे  सप्‍टेबर २०२४ या महिन्‍यात अतिवृष्‍टीमुळे पिक नुकसान झालेल्‍या शेतकरी यांनी आपल्या तलाठीकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक  घ्‍यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्‍यावी,जेणे करुन त्‍यांच्‍या खात्‍यावर मदतीची रक्‍कम जमा होईल,असे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

00000

 मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम

'सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करा'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद

मुंबई, दि. ७ : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.

शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी घेता किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

.....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

@ विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा

@ ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा

@ शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा

@ नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा 

@ उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

@ शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात 

@ शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

वृत्त क्रमांक 28

पाच दिवसीय भव्य विक्री प्रदर्शनचा थाटात शुभारंभ 

नांदेड दि. 7 जानेवारी :- स्वयं सहायता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये  मल्टीपर्पज हायस्कुल वजिराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते या भव्य विक्री प्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जि. ग्रा वि.यं., जि. प. नांदेड यांच्यामार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्हातील स्वयंसहायता समुहातील महिलासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली इ जिल्हातील उत्कृष्ट उत्पादने घेऊन महिलांनी सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनाला नांदेडकराचा उस्फुर्त सहभाग मिळत आहे. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे. मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत. 

००००













Monday, January 6, 2025









 

वृत्त क्रमांक 27

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत विशेष मोहिमेंतर्गत

6  ते 20 जानेवारी कालावधीत गतीमानता पंधरवड्याचे आयोजन

नांदेड दि. 6 जानेवारी :-  सुशिक्षित बेराजगार युवक व युवती यांनी आपला स्वत:चा उद्योग/व्यवसाय स्थापन करावा, या उद्देशाने राज्य शासन पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही शासनाची महत्वाकांक्षी योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हयात मोठया प्रमाणावर उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून 6 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना गतीमानता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

तरी नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयातील इच्छुक व होतकरु युवक/युवती यांनी तसेच बेरोजगार युवक व युवती यांनी नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे वा व्यवसायवाढ करावयाची आहे अशा इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या योजनेतंर्गत प्रक्रिया असलेल्या/उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपयांपर्यंत या प्रकल्प मर्यादेत कर्ज दिले जाते. ज्यात  सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 15 टक्के अनुदान दिले जाते. तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते. योजनेचे https: maha-cmegp.gov.in संकेतस्थळ असून पात्रतेसाठी अर्जदार हा 18-45 व राखीव प्रवर्गासाठी 18-50 वर्षे वय असावे. आवश्यक कागदपत्रांमध्ये, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आहे. आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरीता लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावी.

या गतिमानता पंधरवडातंर्गत जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी जनजागृती, प्रचार, प्रसिध्दी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. ज्याद्वारे या योजनेतंर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रस्ताव अर्ज प्राप्त असल्यास योजनेच्या अटी व शर्ती तपासून संबंधीत बँकांकडे शिफारस करणे, प्रलंबित अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे, नामंजूर प्रकरणात अर्जदारास परिपूर्ण व योग्य ती माहिती देण्यात येणार आहे.  तसेच एक गांव एक उद्योजक या धर्तीवर प्रत्येक गावातून किमान एका पात्र अर्जदाराची निवड करण्यात येत  आहे.

000000


 वृत्त क्रमांक 26

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 10 जानेवारीपर्यंत

स्कूलबस तपासणी विशेष मोहीमेचे आयोजन

नांदेड दि. 6 जानेवारी :-  प्रादेशिक परिवहन विभागामार्फत 10 जानेवारीपर्यत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. तरी सर्व स्कूलबस चालक, मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावी. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावेत. तसेच वाहनाचे कागदपत्रे वैध नसल्यास सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. या तपासणी मोहिमेत दोष आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थी वाहतुक करणारी वाहने या वाहनांची तपासणी मोहीम राबवितांना सर्व पालकांनी शालेय प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. सदर वाहनांद्वारे वाहतुक करतांना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची सर्व वाहनधारक, चालक व पालकांनी दक्षता घ्यावी . तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे शालेय स्कुलबस परिवहन समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांच्या अखत्यारितील स्कूल बसमधून नियमानुसार विद्यार्थी वाहतुक करावी असेही प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 25

गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा : जिल्हाधिकारी 

 जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम 

नांदेड दि. 6 जानेवारी :- बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) अर्थात कुत्रीम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे अधिक गतीमान व अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे.माध्यम प्रतिनिधीनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने पत्रकारितेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज सोमवारी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांसाठी आयोजित 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी', या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह नांदेड येथील ज्येष्ठ संपादक, वरिष्ठ पत्रकार, वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी ,विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, समाज माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापरासाठी हे तंत्रज्ञान सकारात्मकतेने व प्राधान्याने आत्मसात केले पाहिजे.आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक कामे सहज, सुलभ झाले असून एका क्लिकवर अनेक विषयाची माहिती खूप कमी कालावधीत मिळू शकते. तसेच अनेक श्रमाची कामे, बौध्दिक कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे शक्य झाले आहे. विविध विषयाच्या माहितीचा डाटा कमी वेळेत संकलित करणे शक्य झाले आहे. माहितीपूर्ण बातमी देण्यासाठी वाचकांना अधिक शिक्षित करण्यासाठी व अतिरिक्त माहिती देण्यासाठी, बातमीतील गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा वापर करावा. यातील फायदेशिर बाबीचा विचार करुन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितच गतीशील बातमीदारीसाठी फायदा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चॅटजिपीटी, जेमीनी, मेटा अशा काही प्राथमिक ॲपच्या वापराला नवपत्रकारांनी सुरुवात करावी, सरावातून यावर प्राविण्य मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोबतच त्यांनी यातील धोक्याची जाणीव करून दिली. बहुतांश डाटा हा विदेशातील असल्यामुळे, माहिती कोणाकडून निर्माण झाली असावी याबाबतही तपासणी करणे खूप आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अस्मिता, परंपरा, संस्कृती भंजन होणार नाही. तसेच आपली लिखाणाची शैली गमावली जाणार नाही. आपली बातमीवरील लिखाणावरील व्यक्तिगत छाप कमी होणार नाही याचीही काळजी घेणे एक बातमीदार म्हणून आवश्यक असल्याचे  सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनीही संबोधित केले .बातमीदारीला रंगत आणते ते स्पॉट रिपोर्टिंग, ग्राउंड रियालिटी हे स्पॉट रिपोर्टिंग मधून समजते. त्यामुळे आपल्या बातमीदारीत कॉपी-पेस्टची निरसता येणार नाही, याची काळजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. काळानुसार माध्यमात खूप बदल घडत आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील महत्वाची कामे किंवा बातमीतील भाव, कॉपी राईट, ॲपमध्ये संकलित करण्यात येत असलेले माहितीचे वर्गीकरण, याबाबत अनेक फायदे व तोटे आहेत. त्याचे वर्गीकरण करण्याचे प्राविण्य मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीचा शासनात वापर करण्यात येत असून नुकतेच नागपूर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर सुरु केले आहे. पोलीस विभागाच्या तपासात सुध्दा याचा उपयोग मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. सर्व माध्यमाद्वारे आपण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या जवळ पोहोचलो आहोत. यांचा चांगला कायदेशिर वापर करुन करणे काळाची गरज असल्याचे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी खिळे लावण्यापासून सुरू झालेल्या पत्रकारितेला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नव्या आयुधाच्या वापराला सामोरी जावे लागत आहे. त्यामुळे या बदलाला समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना ज्यांच्याकडे उत्तम ज्ञान आहे, वाचन आहे, समज आहे, परिणामाची जाणीव आहे, अशाच पत्रकारांना या नव्या तंत्रज्ञानाचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे पत्रकारितेतील मूलभूत आणि पायाभूत अशा बाबींसाठी प्रशिक्षण, वाचन आजही आवश्यक असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी, या कार्यक्रमाची सुरुवात करताना मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. संतोष पंडागळे यांनी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत केले. तर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार श्री.मकरंद दिवाकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे स्वागत केले. 

00000

https://fb.watch/wXDQmDYQPb/


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...