Saturday, October 26, 2024

 वृत्त क्र. 989

 वृत्त क्र. 988 

मुखेड येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले प्रशिक्षण

 

मुखेड दि. 26 ऑक्टोबर : मुखेड येथे आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तानाजी चव्हाण, राजेश जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला 845 मतदान केंद्राध्यक्ष आमंत्रित होते. 794 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक उपस्थित होते.

 

आजच्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्ती व 85 वयांवरील मतदार यांना पोचपावती देऊन मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले व सूचना करण्यात आल्या.

     

स्वीप उपक्रमांतर्गत शहरातील शाहीर आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड येथे मतदान जनजागृती बाबत कार्यक्रम घेण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाला उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केले.

000000

 

 वृत्त क्र. 987

हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती 

नांदेड, दि. २६ ऑक्टोंबर: - 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग  परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, संजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर्तव्य पूर्ण करावे,असे मत त्यानी व्यक्त  केले.

मनपा शाळा सुध्दा मतदान जनजागृतीमध्ये हिरीरीने भाग घेतात आणि जनजागृती करतात. यास प्रतिसाद देवून स्वीप कक्षाच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा आणि लोकसभा पोट निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा नक्कीच योग्य उपयोग करावा असे प्रतिपादन मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ सधू यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजा पटेल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराज मुदिराज,आशा घुले,संदीप लबडे,संभाजी पोकले,नाजिया तब्बसुम,निखत परविन,महेजबीन बेगम स्वच्छता निरीक्षक झियाउल्ला खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००








  वृत्त क्र. 986

राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

नांदेड दिनांक २६ ऑक्टोंबर :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 25 ते 27 ऑक्टोंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे उदघाटन डॉ. हंसराज वैद्य (अध्यक्ष, नांदेड जिल्हा वुशू असो.) यांचे अध्यक्षतेखाली व सोपानजी कटके (सचिव, ऑल महाराष्ट्र वुशू असो.), यांचे हस्ते  आज संपन्न झाला.

 

या कार्यक्रमासाठी श्रीमती अॅड. अर्चना जांभळे (विधी तज्ञ), जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , एपीआय दिगंबर कांबळे, क्रीडा अधिकारी लातूर उपसंचालक कार्यालयचे डी.व्ही. गडपल्लेवार , राजेश जांभळे (सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो.) श्रीमती प्रतिक्षा शिंदे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी), सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी), डॉ. पचलिंगे (वैद्यकीय अधिकारी), अविनाश पाटील (जिल्हा सचिव कोल्हापूर), अमित म्हात्रे (जिल्हा सचिव, ठाणे), दिनेश माळी (जिल्हा सचिव, मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील 08 विभागातून खेळाडू मुले-मुली, निवडसमिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेकरीता पंच म्हणून अविनाश पाटील (कोल्हापूर), लक्ष्मण उदमले (अहिल्यानगर), महेश इंदापुरे (छ.संभाजीनगर), निलेश राऊत (वर्धा), श्रीमती प्रतिक्षा शिंदे (पुणे), विजय खंडार (अमरावती), प्रफल्ल करंजीकर (पुणे), श्रीमती तृप्ती चांदवडकर (पुणे), अभिषेक सोनवणे (वर्धा), गणेश कुटटे (परभणी), सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी, नांदेड), संदिप शेलार (शिवछत्रपती पुरस्कारार्थी, मुंबई), अमिर शेख (लातूर), कृष्णा सुरवसे (परभणी), प्रकाश ग्यानोबा वाघमारे (व्य. लिपीक), दिपक बिसेन (नागपूर), बंटी राठोड (छ. संभाजीनगर), गणेश साकुरे (भंडारा), सददा सय्यद (छ. संभाजीनगर), अनिल खराडे (बीड), राज वासवंड (पुणे), अतुल जाधव (जळगांव), प्रणव वाघमारे (नांदेड), अक्षय जांभळे (नांदेड), अजय नवघडे (नांदेड), माधव शेरीकर (सोलापूर), दिनेश सोनवणे (जळगांव), प्रणव विटणकर (वर्धा), रोहीत राऊत (पुणे), सुमित खरात (छ. संभाजीनगर), सौरभ पाटील (कोल्हापूर), पियुष ढोणे (मुंबई शहर), शोऐब शेख (मुंबई शहर), साहिल भंडारी (ठाणे), दिनेश माळी (मुंबई उपनगर), संकेत गायकवाड (पनवेल शहर) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी तथा कार्यासन), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन), श्रीमती शिवकांता देशमुख, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे व आर्चरी असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहेत.

 

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमी, रसिक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

०००००


















  वृत्त क्र. 985

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

 

नांदेड, दि. 26 :- लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही जाहिरात तयार करताना, तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, यावरील पोस्ट, बल्क एसएमएस, रेडिओ जिंगल्स चित्ररथावरील व्हिडिओ थोडक्यात कोणत्याही प्रसिद्धीसाठी परवानगी आवश्यक असून ती घेणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

 

जिल्‍ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

 

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारण, चित्रपटगृहे, रेडिओ, खाजगी एफएम, सार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारण, ई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशन, बल्क एसएमएस (SMS) / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो. तसेच मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरीता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते. यासाठी भारत निवडणूक आयोगाने वेगवेगळे अर्ज उपलब्ध केले आहे . ते अर्ज दाखल करून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे .जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये.

 

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात माध्‍यम कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या कक्षाच्‍या माध्‍यमातून जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कार्यवहन केले जात आहे. या समितीत 9 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी व वृत्‍तपत्राचा एक माध्‍यम प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्‍य सचिव म्‍हणून जिल्‍हा माहिती अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम काम पाहतात. लोकसभा पोटनिवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक दोन्ही निवडणुकीसाठी या संदर्भातील परवानगी घेणे आवश्यक आहे. नुकतीच दोन्ही निवडणूक खर्च निरीक्षकांनी माध्यम कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

०००००




 वृत्त क्र. 984

मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

८७ नांदेड दक्षिणचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड दि. २6 : लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून १६-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

८७-नांदेड दक्षिणच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते. ८७ नांदेड दक्षिणच्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याचे नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा नांदेड येथे आज प्रथम प्रशिक्षण आयोजित केले होते.

 

मतदान केंद्रावर कार्यरत पोलींग टिमने मतदान सुलभ पध्दतीने घेतल्यास मतदानाची टक्केवारी सुद्धा आपोआपच वाढते. माँक पोल घेतल्यानंतर इव्हिएम मशीन क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

 या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व पहिले मतदान अधिकारी असे एकूण 884 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी सहा. निवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा सांगितली. तहसीलदार प्रविण पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदार, संजय नागमवाड, मुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळे, प्रशिक्षण टिमचे सदस्य संजय भालके, सुनील दाचावार व प्रा. राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

 

यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून पि.बी.राऊत, एम.जी.कलंबरकर,रायभोळे एम.पी.शिलेदार डि.के. यांनी कार्य केले. 

 

प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जाते, कोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणता, याचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले, याच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसी, पि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य  आर.जी.कुलकर्णी यांनी केलें. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार, रुस्तुम आडे,संजय भालके,सुनील दाचावार, राजेश कुलकर्णी, कविता जोशी,सारिका आचमे,हनुमंत राठोड,जमील शेख यांनी परिश्रम घेतले.

०००००







 वृत्त क्र. 983

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य - जिल्हाधिकारी

 

नांदेड, दि. 26 : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

 

लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार ओळखपत्र नसणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

 

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

०००

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...