Monday, August 12, 2024

वृत्त क्र. 707

दि. 12 ऑगस्ट 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

नांदेड, दि.१२ ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोमवारी दुपारी ४ वाजता  नांदेड,हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले होते. श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 

आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित हिंगोली येथील कावड महोत्सवात सहभागी झाल्यानंतर त्यांनी नांदेड शहरा लगतच्या माजी खासदार हेमंत पाटील यांच्या शेतातील पुरातन शिवमंदिराला व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले यावेळी त्यांना आ.बालाजी कल्याणकर,माजी खासदार हेमंत पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदींनी निरोप दिला.

***




 मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध  

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• हिंगोलीच्या कावड यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली, दि. 12 (जिमाका): मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार आहे. एकूणच मराठवाड्याला समृद्ध करणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.  

हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे कयाधू अमृतधारा महादेव मंदिर आणि आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आनंदाचा शिधा, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षण आदी योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी उपस्थितांना केले.

कळमनुरी येथे आमदार संतोष बांगर यांनी दान स्वरुपात चार एकर जमीन दिली आहे. त्याठिकाणी विपश्यना केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासह अन्य विकासात्मक कार्यासाठी आमदार बांगर यांचे कौतुकही श्री. शिंदे यांनी केले.

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 800 कोटी रुपये निधी मंजूर आहे. तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह सर्व योजनांसाठी भरीव निधींचीही भरीव तरतूद केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

अद्याप मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतु उर्वरीत कालावधीतही मुबलक पाऊस पडावा, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी औंढा नागनाथ येथील नागनाथाला साकडे घातल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आमदार बांगर यांच्या पुढाकारातून मागील दहा वर्षांपासून कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव संस्थान येथून कावड यात्रा काढण्यात येते. कळमनुरी येथून काढलेली ही कावड यात्रा हिंगोलीतील कयाधू नदी तिरावरील अमृतेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येते. या यात्रेस कावडधारींसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
***
















 



 

 वृत्त क्र. 706 

आजपासून तीन दिवस प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा !

 

घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड दि. 12 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी त्यांच्या मनात राहावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अर्थात घरोघरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना आणि प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्यासाठी 9 ऑगस्टपासून आयोजित उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हर घर तिरंगा अभियानात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे. तसेच यंदा घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून आगळावेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय वेशभूषा करून सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ध्वजासोबत सेल्फी घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

***



 वृत्त क्र. 705 

खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप, पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 

सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना देण्यात यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार ना हरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे. 

सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुना पत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून  शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेवपोर्टलवर माहिती भरली जाणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

0000

 

 वृत्त क्र.  704 

शून्य ते सहा वयोगटातील बालकांची श्रवण दोष तपासणी शिबिर संपन्न

 

·  महसूल पंधरवडा निमित्त शिबिराचे आयोजन  

 

#नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  महसूल पंधरवडा-2024 निमित्त जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले. 50 बालकांची श्रवणदोष तपासणी या शिबिरात करण्यात आली.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा चिकित्सक डॉ.  संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलू, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक नितीन निर्मल आदींची  उपस्थिती होती.

 

हे शिबिर केवळ शीघ्र निदानापुरतेच मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळात योग्य ते उपचार करण्यात यावे असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे 800 कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉक्टर संजय पेरके यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिघ्र निदान, उपचाराचे महत्त्व व गरज याविषयी सविस्तर अशी माहिती नितीन निर्मल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तहसिलदार संजय वरकड यांनी या शिबिरास शुभेच्छा दिल्या तर मुरलीधर गोडबोले यांनी सूत्रसंचालनासह सर्वांचे आभार मानले.

00000







वृत्त क्र.  703

श्री चक्रधर स्वामी यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करून घेण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  सन 2024 मध्ये विहित केलेल्या जयंतीच्या परिपत्रकान्वये गुरुवार 5 सप्टेंबर 2024 रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन भाद्रपद शुल्क द्वितीया या तिथीनुसार त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र संबंधित  जिल्हा शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सर्व शासकीय विभागांनी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...