Saturday, February 3, 2024

 वृत्त क्र. 102

 

सारथी 4.0 संगणकीय प्रणाली

अद्ययावत करण्याचे काम सुरू  

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सारथी प्रणाली 4.0 च्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण होणार असून तद्नंतर अर्जदारांना सारथी प्रणालीवरून अर्ज करणे सुलभ होईल. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

 

नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु मागील दोन दिवसपासून सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल / दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रातर्फे सुरू आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अर्जदारांना काही अर्ज व तद्षनुंगीक शासकीय शुल्क भरताना अडचणी निर्माण होत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 101 

हौशी छायाचित्रकारांसाठी

“क्लिक नांदेड” छायाचित्र स्पर्धा

 

·    महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा” च्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महोत्सवाचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे “क्लिक नांदेड” छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

छायाचित्र स्पर्धेत पुढील विषय देण्यात येत आहेत. या​त निसर्ग, पशु-पक्षी, शिक्षण, कला, स्थापत्य, जीवनशैली, खेळ, पर्यटन, खाद्यसंस्कृती, जैवविविधता, परंपरा, संस्कृतीवरील छायाचित्रांचा समावेश असावा. हे छायाचित्र  जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत काढलेले छायाचित्र असावेत. यासाठी पुढील नियमावली, अटी ठेवण्यात आल्या आहेत.

 

छायाचित्र नांदेड जिल्ह्यातीलच असावीत. प्रती छायाचित्र (IMAGE) जास्तीत जास्त 10 एमबी व कमीत कमी 03 एमबी ची छायाचित्रे ग्राह्य धरल्या जातील. स्पर्धकाने आपली छायाचित्रे clicknanded@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत दोन ते तीन वाक्यात छायाचित्राबाबत मराठी भाषेत माहिती युनिकोड फॉन्टवर टाईप करुन पाठवावी. एका छायाचित्रकाराला स्पर्धेत दिलेल्या विषयासाठी एकुण 10 छायाचित्र देता येतील. आयोजकांतर्फे मुळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केली गेल्यास, स्पर्धकास ती सादर करावी लागतील. स्पर्धेत जानेवारी 2023 ते फोटो स्पर्धा सामिल होण्याच्या अंतिम तारखे पर्यंत काढलेली छायाचित्रच ग्राह्य धरल्या जातील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. DSLR आणि Mobil फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. ड्रोन द्वारे काढलेली छायाचित्र स्वीकारली जाणार नाही. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशनचे जेपीजी JPEG किंवा पीएनजी PNG मध्ये असने आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईटमार्क,ओळखीचे चिन्ह, अथवा कोणतीही अन्य दृष्य स्वरुपाची बाब टाकता येणार नाही.

 

रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटो (चे) क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे, परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर आणि/किंवा वास्तविकतेवर परिणाम करत नाही. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्याच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक हेतूंसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरुपाची मागणी, स्पर्धकास करता येणार नाही. छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनेल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थिमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडी बाबतकळविले जाईल. सर्व विषयातून प्रत्येकी एका विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्षे 18 खालील असल्यास वरील अर्जावर पालकांची स्वाक्षरी त्यांचा आधार कार्ड नंबर सह नोंदविणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्राचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकाचा असून, संबंधीतछायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल. छायाचित्रे पाठवण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2024 असेल. परिक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहतील. सर्व सहभागी छायाचित्र स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल.

 

छायाचित्र स्पर्धेतील निकाल अंतीम करण्याचे / नाकारण्याचे सर्व हक्क आयोजन समितीचे राहतील. स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हाचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

निवड झालेल्या 100 छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत आयोजीत प्रदर्शन कालावधीत महासंस्‍कृती महोत्‍सवात लावण्यात येणाऱ्या प्रदर्शनीमध्ये करण्यात येईल. महोत्सव प्रदर्शनी पश्चात निवडक 100 छायाचित्रे विविध कार्यालयात प्रदर्शनी भागात लावण्यात येतील. निवड झालेल्या 100 छायाचित्रांना गौरविण्यात येईल व त्यामधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना विविध पारितोषिके देण्यात येतील.

00000

Friday, February 2, 2024

 वृत्त क्र. 100 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान-2024 हे अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्वत:रक्तदान करून उपस्थित नागरिकांना रक्तदान व रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. या शिबीरात कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व इतर नागरिक यांच्यासह जवळपास 41 जणांनी रक्तदान केले. 


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेमूद व डॉ. जागृती यांनी उपस्थित नागरिकांना रक्तदानाचे महत्व सांगितले व सर्वांना स्वखुशीने रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी रक्तदात्यांना रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चहा-बिस्कीट व केळीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोटार वाहन निरीक्षक श्रीमती एस. एल. पोतदार, श्रीमती रेणूका राठोड, निलेश चौधरी, अमोल आव्हाड व कर्मचारी गाजुलवाड, केंद्रे, कंधारकर, शिंदे यांनी परिश्रम घेतले.

00000



वृत्त क्र. 99 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे

17 फेब्रुवारी रोजी आयोजन

 

बेरोजगार महिला उमेदवारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन    

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी या विशेष रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांनी आपली रिक्तपदे अधिसूचीत केली आहे. नांदेड जिल्हयातील ज्या काही इतर आस्थापनांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.in या वेबसाईटवर आपली रिक्त पदे अधिसूचित करावीम. याबाबत काही अडचण आल्यास 8830807312  या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

पुढील काही कंपन्यांनी आपली रिक्तपदे महास्वयम पोर्टलवर अधिसूचीत केली आहेत. मदुरा मायक्रो फायनान्स लि. नांदेड कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 10 पदांसाठी इयत्ता बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहेत. या पदांसाठी वेतन 8 हजार रुपये असून नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

 

परम स्किल छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनीच्या 150 पदासाठी इयत्ता दहावी/बारावी/आयटीआय/पदवी शैक्षणिक पात्रता असून 17 हजार रूपये वेतन राहील. या  पदांसाठी नोकरीचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे राहील.  

 

धृत ट्रान्समीशन छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनी ऑपरेटरच्या 500 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/ आयटीआय/पदवी ही शैक्षणिक पत्रता आवश्यक आहे. या पदांसाठी 12 हजार 500 रुपये वेतन असून नोकरीचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे राहील.

 

एल.आय.सी.ऑफ इंडिया नांदेड येथे इन्शुरन्स ॲडव्हायझरच्या 83 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी 15 हजार रुपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके राहील.

 

जगदंबा सेंद्रीय कृषी सेवा केंद्र हदगाव येथे सेल्स एक्सुकेटिव्हच्या 15 पदांसाठी पदवी व संगणक उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदांसाठी 7 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण हदगाव राहील.

 

कैलास फर्टिलायझर नांदेड येथे डाटा ऑपरेटरच्या 20 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/पदवी/संगणक उत्तीर्ण उमेदवारांसाठी 8 हजार रुपये मानधन असून नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.  

 

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 98

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील

प्राप्त अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर नोंदणी मोबाईल नंबरवर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सदरचे करेक्शन असलेले मेसेज आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सदरच्या त्रुटीची पुर्तता करावी. दिलेल्या विहीत कालावधीनंतर त्रुटीची पुर्तता करुन घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्थता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दिनांक 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

वृत्त क्र. 97

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2024-2025 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

 

प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

 

अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे).

 

इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडी, ग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवा, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.

 

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 15 मार्च 2024 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्वच अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनीच अर्ज सादर करावेत.

 

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्याचा आधार कार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र. याप्रमाणे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. तेंव्हा आवश्यक कागदपत्रासह अचुक माहिती भरुन अर्ज दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे. या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन, वरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी कळविले आहे.

00000

Thursday, February 1, 2024

 वृत्त क्र. 96

 

महासंस्कृती महोत्सवात

शिवकालीन पारंपारीक खेळ सादर करण्‍याची खेळाडूंना संधी

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

 

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हामध्‍ये जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे महासंस्‍कृतीक महोत्‍सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्ये  खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे.  कुस्ती या खेळप्रकाराकरीता 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नावे नोंदविता येतील व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश यात करण्यात आला आहे. या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत विहित नमुन्यातील फॉम भरुन खेळाडूची/संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.

 

या कालावधी नंतर प्राप्‍त प्रवेश अर्जाची छाणणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्‍यात येवून, निवडक खेळाडूं/ संघास "महासंस्‍कृती महोत्‍सवात" सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणा-या खेळाडू / संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...