Tuesday, January 9, 2024

 वृत्त क्र. 31 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 9 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

बुधवार 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने नांदेड विमानतळ येथे दुपारी 1.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व हेलिकॉप्टरने पोफाळी हेलिपॅड जिल्हा यवतमाळकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड विमानतळ येथे आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथून हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. 

00000  

वृत्त क्र. 30

 

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन

राज्य क्रीडा दिन म्हणून होणार साजरा

 

नांदेड (जिमाका), दि. 9 :- महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी 2024 हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सायं. 4 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, स्टेडियम परिसर, नांदेड येथे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळात सहभागी व राज्यभर क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 13 जानेवारी 2024 पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.  

 

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळाला. त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती. या अनुषंगाने राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचा शासन निर्णय 29 डिसेंबर 2023 अन्वये कळविले आहे.

0000  

वृत्त क्र. 29

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात

15 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 9 :- शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी 15 फेब्रुवारी 2024 पर्यत सहभागासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

या अभियानात 15 फेब्रुवारी 2024 पर्यत नोंदणी करावयाची असून या स्कुल पोर्टल लिंकवर https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 नोंदणी करावी. तसेच संदेश, कात्रणे, जाहिरात, व्हिडीओ शेअर करण्यासाठीची https://drive.google.com/drive/folders/1SLpCMNhoiOAlfeJZ6rYzSVaD9IVXTzHn?usp=sharing  या लिंकचा वापर करावा, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

 

जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा मध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या अभियानात सहभागी होता येईल.  तसेच शाळांना पुढील प्रमाणे गुणांकन देण्यात येईल.

विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण. शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग 40 गुण. सहभागी शाळांचे कामगीरीच्या आधारे मूल्यांकन, आपला जिल्हा उर्वरीत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे तालुकास्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर व राज्यस्तर असे एकुण 4 टप्पे अभियानाचे स्वरुप आहे.

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांना पुढील  प्रमाणे बक्षीसे आहेत. तालुकास्तर पहिले बक्षीस 3 लक्ष, दुसरे बक्षीस 2 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 1 लक्ष रुपये आहे. जिल्हास्तर पहिले बक्षीस 11 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 5 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 3 लक्ष रुपये. विभाग स्तर पहिले बक्षीस 21 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 11 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 7 लक्ष रुपये. राज्यस्तर पहिले बक्षीस 51 लक्ष रुपये, दुसरे बक्षीस 21 लक्ष रुपये, तिसरे बक्षीस 11 लक्ष रुपये आहे.

 राज्य स्तरावरील स्पर्धा प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी राज्यस्तरीय विजेता निवडण्यात येईल. जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग सर्वस्वी अधिकार शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असणार आहे.

00000

Monday, January 8, 2024

 वृत्त क्र.  28

 

महासंस्कृती महोत्सवाला लोकाभिमूखतेची

जोड देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील कलावंताचा निर्धार

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महासंस्कृती महोत्सव हा एकात्मता, सामाजिक सौहार्द यासह आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. हा महोत्सव नावारूपास आणणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कलांच्या सादरीकरणासाठी विशेष राखीव वेळेद्वारे अधिकाधिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला लोकाभिमूख करण्यासह स्थानिक कलावंतांच्या याबाबत काही सूचना असल्यास त्या नियोजनाच्यादृष्टिने समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते.

 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सुरेश जोंधळे, ज्येष्ठ शाहीर रमेश गिरी, बापु दासरी, नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, जयंत वाकोडकर, आनंदी विकास, विजय निलंगेकर, राधिका वाळवेकर, डॉ. राम चव्हाण, मंजूर हाश्मी, डॉ. वैशाली गोस्वामी, ॲड गजानन पिंपरखेडे, डॉ. विद्या झिने, डॉ. बालाजी पेनूरकर, चित्रकार कविता जोशी, वसंतराव बारडकर, विजय होकर्णे, दिनेश कवडे, शिवाजी टाक, मिना सोलापूरे आदी उपस्थित होते.

 

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत याबाबत बैठकीत सहभागी कलावंतांनी मौलिक सूचना केल्या. बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

00000









 वृत्त क्र. 27

 

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्‍या प्रारूप आराखड्यास मान्यता

 

नांदेड (जिमाका), दि. 8 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2024-25 च्‍या अनुक्रमे रु. 426.00 कोटी, रु.163.00 कोटी व रु.45.52 कोटी असा एकूण रु.634.52 कोटीच्‍या प्रारूप आराखड्यास तसेच जिल्‍हा विकास आराखड्यास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत माहे डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत पुनर्विनियोजन प्रस्‍तावास बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थिती दिली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व सर्व विभागाचे प्रमुख हे प्रत्यक्ष हजर होते. खासदार सुधाकर श्रंगारे, आमदार राजेश पवार, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.

 

केंद्र व राज्य सरकारच्या जिल्ह्यात अतिशय चांगल्या वैशिष्ट्यपूर्ण योजना गोरगरीब सर्वसामान्यांसाठी सुरू आहेत. यात व्हिजेएनटी यांच्यासाठी मोदी आवास योजना, आरोग्य, कृषि आदी विविध क्षेत्रात असलेल्या या वैविध्यपूर्ण योजनांच्या पाठीमागे सर्वसमावेशकतेची भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. “हर घर नल से जल” या योजनेद्वारे जिल्ह्यात 1 हजार 234 योजना जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत. 30 मोठ्या योजना महाराष्ट‍्रजीवन प्राधिकरण पूर्ण करीत आहे. जिल्हा परिषदेने आजवर 299 योजना युद्धपातळीवर पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत योजना शासनाच्या निकषानुसार तात्काळ पूर्ण करण्याबाबतची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. दिवसेंदिवस कुठे अतिवृष्टी, कुठे वादळवारे असे आपत्तीचे प्रमाण व आव्हाने वाढत आहेत. यामुळे विद्युत सेवा-सुविधेपासून सर्वच विभागांवर मोठ्या परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळ वाऱ्यामुळे अनेक गावातील विद्युत पोल उन्‍मळून पडले. याच्या कामासाठी जिल्ह्याच्या विस्ताराप्रमाणे अधिक आर्थिक तरतूद व्हावी व गती मिळावी याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आग्रही मागणी केली.

 

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून नांदेड-बिदर या रेल्वे योजनेला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्राने यासाठी साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामुळे आता नांदेड-वर्धा रेल्वेच्या उपलब्धतेनंतर विदर्भातून थेट बिदर पर्यंत मधला मार्ग विकसीत होणार असल्याने याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याला अधिक होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील या मार्गाचे सुमारे 75 टक्के काम होत असून महाराष्ट्र शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार राम पाटील रातोळीकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याला मान्यता दिली.

 

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विविध विषय मांडून लक्ष वेधले. मुखेड सारख्या कोरडवाहू क्षेत्रात जे काही तलाव होते ते गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झाले आहेत. काही तलाव फुटले आहेत. याच्या दुरूस्तीसाठी तात्काळ निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी आमदार तुषार राठोड यांनी केली.

 

जिल्हा विकास आराखडा अंतर्गत थेट परकीय गुंतवणूकीमध्ये राज्याला दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर नेणे, भारताच्या सकल उत्पन्नामध्ये राज्याचे योगदान 15 टक्के वरुन 20 टक्क्यावर नेणे, शाश्वत विकास ध्येयामध्ये राज्याला 9 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर नेणे सर्व 16 शाश्वत विकास ध्येयांमध्ये राज्य फ्रन्टरनर किंवा त्यापेक्षा वरच्या श्रेणीत नेणे. ही चार प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आली असून राज्याच्या परिष्टपुर्तीसाठी "बॉटमअप" दृष्टीकोन वापरुन आर्थिकवाढ व राज्याच्या सकल उत्पन्नासाठी उत्प्रेरक म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक असल्‍याने नांदेड जिल्ह्यात प्राथमिक क्षेत्र म्हणून कृषि व संलग्न सेवा यानंतर उद्योग व खानकाम आणि पर्यटन या तीन क्षेत्रांना प्राधान्याने अधोरेखित केले आहे. या बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

00000









 वृत्त क्र. 26


नांदेड येथे दोन दिवस रंगणार बाल कलावंताचा नाट्य आविष्कार

·         बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

नांदेड (जिमाका), दि. 8 :- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 20 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे 10 व 11 जानेवारी 2024 रोजी कुसुम सभागृहात सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण 11 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बाल कलावंताना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 जानेवारी रोजी दुपारी १२ वा. केंब्रीज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, वैभव देशमुख दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी 1.15 मिनिटांनी बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “काहीतरी चुकतंय वाटतय”, दुपारी 2.30 वा. ज्ञानभारती विद्यामंदिर, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, राहुल जोंधळे दिग्दर्शित “बुद्धाची गोष्ट”, दुपारी 3.45 मिनिटांनी जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर, जिंतूरच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, नागेश कुलकर्णी दिग्दर्शित “मदर्स डे” दुपारी 5 वा. नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरणीच्या वतीने “जड झाले ओझे” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, स्वाती घाणेकर दिग्दर्शित “एलियन्स द ग्रेट”, दुपारी 12 वा. राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, धर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना”, दुपारी 1.15 मिनिटांनी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेडच्या वतीने आसिफ अन्सारी लिखित, महेश घुंगरे दिग्दर्शित “वडाळा ब्रिज”, दुपारी 2.30 मिनिटांनी टायनी एंजल्स स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,गौतम गायकवाड दिग्दर्शित “करामती पोर”, दुपारी 3.45 मिनिटांनी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित उपेंद्र दुधगावकर दिग्दर्शित “जगण्याचा खो” आणि दुपारी 5 वा. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, परभणीच्या वतीने गोविंद गोडबोले लिखित डॉ. सिद्धार्थ मस्के दिग्दर्शित “गोष्टीची गोष्ट” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे असे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे.

0000



 वृत्त क्र. 25

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी

 22 जानेवारीपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- क्रीडा विभागाच्यावतीने राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 22 जानेवारी, 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

 

या पुरस्कारासाठी  राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा अर्ज मागविण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...