वृत्त क्र. 30
ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन
राज्य क्रीडा दिन म्हणून होणार साजरा
नांदेड (जिमाका), दि. 9 :- महाराष्ट्राचे महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी 2024 हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सायं. 4 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, स्टेडियम परिसर, नांदेड येथे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळात सहभागी व राज्यभर क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 13 जानेवारी 2024 पर्यत सादर करावेत. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलम्पिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळाला. त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती. या अनुषंगाने राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचा शासन निर्णय 29 डिसेंबर 2023 अन्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment