Monday, December 18, 2023

 वृत्त क्र. 871 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवरी 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

वृत्त क्र. 870

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी

“लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यावर 6 हजार, सहावीत गेल्यावर 7 हजार, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 

श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, जिल्हा माहिला व बालकल्याण विकास अधिकारी रमेश कांगणे व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत माहिती घेतली. महिला बचतगटाच्या माहूरगड येथील स्टॉलला त्यांनी भेट दिली.

00000



 










वृत्त क्र. 869

 शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  नांदेड जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांनी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत / अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2023  रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.  

परवानाधारकाने आपला शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नियमानुसार नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे, आपले शस्‍त्र परवान्‍यात नमूद असलेल्या अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे 20.12.2023 पासून संबंधित विभागात दाखल करावा. याबाबत सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Saturday, December 16, 2023

वृत्त क्र. 868

 विकसित भारत संकल्प यात्रेला

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·  शेंबोली येथील कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची प्रमुख उपस्थिती

 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- शासकीय योजनांप्रती प्रत्येक गावात विश्वासर्हता निर्माण व्हावी, लोकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन व्हावे यादृष्टीने विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. शेंबोली येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.  

 

सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, आरोग्यापासून निवासापर्यंत सुविधा मिळाव्यात, शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृद्ध व्हावेत यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. लोकांच्या मनामध्ये शासकीय योजनांप्रती ज्या काही धारणा आहेत त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होत आहे.  

 

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्या  समन्वयातून ही यात्रा प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचावी यादृष्टिने चोख नियोजन केले आहे. आज शेंबोली येथील कार्यक्रमात ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत व ज्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नाव नोंदणी केली अशा युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुदखेडचे तहसीलदार मुगाजी काकडे, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी गुट्टे, महिला बाल विकास अधिकारी श्रीमती पुणे, आरोग्य अधिकारी कासराळीकर, विस्तार आधिकारी लतीफ यांच्यासह तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

00000





वृत्त क्र. 867

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आज

नवीन मतदारांची नावे भरण्यासाठी विशेष मोहिम

 

·   नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

·  रविवार 17 डिसेंबर रोजी प्रत्येक बिएलओ यांना मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश

 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात यासाठी विशेष मोहिम आयोजित केली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आपल्या मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या एचटूएच पडताळणीमध्ये नांदेड जिल्ह्यात आढळून आलेली मयत मतदारांची संख्या, एकुण संख्या व प्रत्यक्षात वगळणी करण्यात आलेल्या मयत मतदारांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली आहे. तसेच जिल्ह्यात 18-19 वयोगटातील मतदारांची नोंदणी देखील समाधानकारक झालेली नाही. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. रविवार 17 डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय प्रपत्रातील अहवाल बीएलओ यांच्या प्रमाणपत्रासह सायं. 6 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

 

नवीन मतदारांची  नावे समाविष्ट करण्यासाठी, मयत मतदारांची नाव वगळण्यासाठी कुटुंबियांनी बिएलओ यांना संपर्क करावा. जिल्ह्यातील मतदार यादीत ज्यांची नावे नाहीत विशेषत: यात वय वर्षे 18 ते 19 वयोगटातील नावे नसलेल्या युवकांनी मतदान ओळखपत्रासाठी आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन नावे नोंदवावीत, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

00000

वृत्त क्र. 866

 विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी कलीना विमानतळ येथून खाजगी विमानाने दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. नागेश आष्टीकर यांची मुलगी चि.सौ.का. पुजा हिच्या विवाहप्रित्यर्थ सदिच्या भेट स्थळ नांदेड रोड हदगाव. दुपारी 2 वा. हदगाव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्र. 865

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेला

29 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ  

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली असून शासन निर्णयान्वये योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार 29 डिसेंबर 2023  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटी, शर्तींची पूर्तता करुन घेऊन पात्र बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास 30 नोव्हेंबर 2023 ही शेवटची तारीख दिली गेली होती. परंतु विविध संघटनांनी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्याने शुक्रवार 29 डिसेंबर 2023  पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...