Friday, October 6, 2023

 जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :-  नांदेड जिल्‍हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, शामल एज्युकेशन कॅम्पस देऊळगाव रोड समोर खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 7 ते 11 ऑक्‍टोंबर 2023 या कालावधीत सकाळी 5 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

करण्याचे वेळापत्रक जाहीर

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी  परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने सोमवार 9 ऑक्टोंबर 2023 ते सोमवार 6 नोव्हेंबर 2023 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream)सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने ऑनलाईन भरावयाच्या तारखा सोमवार 9 ऑक्टोंबर 2023 ते सोमवार 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस / एनईएफटी पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख / प्राचार्यांनी नोंद घ्यावी.

 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.

 

इयत्ता 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी आवेदनपत्र त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. शासन निर्णय 14 ऑगस्ट 2017 नुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्र स्विकारण्यासाठी सरल डाटाबेस विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर सरल डाटावरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) आयटीआय नियमित विद्यार्थ्यानी माहिती सरल डाटा मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

000000

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ    

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अंतिम मुदतवाढ प्रवेश अर्ज 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे.  विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शनिवार 7 ऑक्टोबर ते रविवार 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर सोमवार 9 ऑक्टोबर ते बुधवार 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. सोमवार 23 ऑक्टोंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000 

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         47 रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         819 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 768

 

 नांदेड, (जिमाका) दि. 6 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 819 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 768 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 4 ऑक्टोंबर ते 5 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 136 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 3 नवजात बालक (पुरुष जातीचे 1, स्त्री जातीचे 2 ) व बालक 1 (स्त्री जातीचे) व प्रौढ 7 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 1) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 47 शस्त्रक्रिया झाल्या. यात 34 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 9 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

Thursday, October 5, 2023

 विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांची

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षाला भेट

 

·  मराठा समाजाच्या अनिवार्य निझामकालीन पुरावे व महसुली

  पुराव्याच्या संदर्भातील कागदपत्रांची केली पाहणी

·  सिमेवर जिल्हा असल्याने शेजारी राज्याच्या समन्वयातून पुराव्याची शक्यता अधिक  

 

नांदेड (जिमाका), दि. 5 :- मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य असलेले निझामकालीन पुरावे, महसुली पुरावे, निझामकाळात झालेले करार, निझामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी व इतर महत्त्वाची आवश्यक ती कागदपत्रे तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखात अर्थात भूमि अभिलेख कार्यालयाच्या दस्त यामध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेता त्यासंदर्भातील आवश्यक ती नोंद असलेली कागदपत्रे गांभीर्याने पडताळून तपासून शोधावीत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी दिले. आज सायंकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयाला भेट देऊन विविध कागदपत्रे पडताळून पाहिली.

 

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, भूमि अभिलेख अधीक्षक गजानन दाबेराव, भूमि अभिलेख उपअधीक्षक बळवंत मस्के व इतर अधिकारी उपस्थित होते.  

 

नमुना नंबर 33 लातूर जिल्ह्यात मिळाला. यासारखी इतर कागदपत्रे नांदेड जिल्ह्याच्या अभिलेखात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर अनेक कागदपत्रे हे उर्दू व मोडी लिपीतून असल्याने ही भाषा जाणणाऱ्या तज्ज्ञांकडून ती तातडीने पडताळून घेण्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

00000







 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

राज्यातील आरोग्य व्यवस्थेसह नांदेडचा आढावा

 

· शासकीय रुग्णालयांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी

आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा

· औषधांचे दररोज ऑनलाईन पद्धतीने होईल सनियंत्रण

· विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांची भेट देऊन पाहणी    

 

नांदेड (जिमाका), दि. 5 :- कोरोना सारख्या अत्यंत आव्हानात्मक काळात राज्यातील आरोग्य यंत्रणेने, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य आहोरात्र बजावून राज्यातील जनतेच्या आरोग्याला सावरले आहे. शासनाने आरोग्यासाठी निधी कमी पडू दिलेला नाही. भविष्यातही कमी पडू देणार नाही. जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर आपात्कालीन, मध्यावधी व दीर्घकालीन नियोजन करून तातडीने उपाययोजनेसाठी आवश्यक ती पूर्ती करून तत्पर राहिले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.   

 

राज्यातील आरोग्य व्यवस्था व नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथील सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिल्ली येथून घेतला. या बैठकीस मुंबई येथून मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.  तर नांदेड येथून विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.    

 

नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री. शिंदे यांनी यावेळी दिला. औषध खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

प्राथमिक पाहणीत औषधाची कुठेही कमतरता आढळून आली नाही. परिचारिका यांची आवश्यक ती संख्या दिसून आली. याचबरोबर डॉक्टरांची कुठे जाणिवपूर्वक चूक होती असे दिसून आले नसल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. यात लहान मुलांचा जो मृत्यू झाला त्याच्या कारणांचा शोध घेऊन केवळ तात्पुरत्या स्वरुपात नियोजन न करता आरोग्याच्याबाबत रुग्णांची वाढलेली संख्या, उपलब्ध असलेली यंत्रणा, भविष्यात लागणाऱ्या गरजा याचा सारासार विचार करून दिर्घकालीन नियोजन प्राथमिकतेने करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतांना सांगितले.

 

रुग्णालयात जे नियोजन व खाटांची संख्या आहे त्या तुलनेत रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. नांदेड येथे 508 क्षमता असलेल्या रुग्णालयात 1 हजार रुग्ण उपचार घेतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने येथील रुग्णालयाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 

मनुष्यबळ कमी असल्यास आउटसोर्सिंग करण्याचे अधिकारही जिल्हास्तरावर देण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना साधन सामग्री, मनुष्यबळाअभावी विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल आणि औषधे, मनुष्यबळाची कमतरता ही कारणे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारही मुख्यमंत्र्यांनी दिला.

 

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये नेमकी कुठे कोणती कोणती औषधे आहेत, त्या सर्व औषधांचा दररोज साठा तपासता यावा, कुठे कोणत्या औषधाची कमतरता असेल तर त्याचे तात्काळ नियोजन करता यावे, यादृष्टिने ऑनलाईन औषधांचे नियंत्रण करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

 

विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी

रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी 

छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आज डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात प्रामुख्याने नवजात शिशुंचा वार्ड, मेडिसीन वार्ड येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. याचबरोबर रुग्णालयाच्या सद्यस्थिती बाबत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, बालरोग विभाग प्रमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000    









छायाचित्र : सदानंद वडजे, नांदेड 


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नांदेड जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...