Sunday, June 25, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

                                         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 

·         अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश

 

नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

 

चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.


 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनिस्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनिस्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनिस्सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनिस्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे.  तसेच मलनिस्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.


 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


0000

 

Saturday, June 24, 2023

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

491 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

·  उत्तर नांदेडमध्ये एकुण 162 कोटी रुपयांचे कामाचे भुमिपूजन 

·   नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेच्या 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन

 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रविवार 25 जून रोजी येत आहेत. या कार्यक्रमासमवेत त्यांच्या हस्ते केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व संलग्नीकरणाचे 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे  भूमिपूजन होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नांदेड मनपा हद्दीतील उत्तर नांदेड मधील एकूण 162 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे.  

 

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती असणार आहे.

00000

 वृत्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

नांदेड (जिमाका) दि. 24 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

रविवार 25 जून 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने अबचलनगर मैदान नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ अबचलनगर मैदान नांदेड. दुपारी 3.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

Friday, June 23, 2023

 वृत्त 

शासकीय योजनांच्या साक्षरतेसाठी 25 जूनला शासन आपल्या दारी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभवाटप


पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

 

·         नांदेड येथील कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातून येणार लाभार्थी

·         वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र आराखडा

·         योजनांच्या मेळाव्यासह आरोग्य तपासणीचे शिबीर

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व भव्य “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन रविवार 25 जून रोजी दुपारी 1.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अबचलनगर येथील भव्य मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने हा भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे. शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती जोपर्यंत लाभार्थ्यांना होत नाही तोपर्यंत त्या योजनांप्रती लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासमवेत ग्रामपंचायत पातळीपर्यंत योजनांचा जागर पोहचावा या उद्देशाने नांदेड येथे भव्य प्रमाणात शासन आपल्या दारी याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातुन नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

 

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यांच्या मार्फत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून तर नांदेड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांशी समन्वय साधला गेला आहे. मनपा क्षेत्रातून 15 हजार, नगरपालिका क्षेत्रातून 10 हजार व ग्रामीण भागातून 20 हजार नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनाच्या या महामेळाव्यास 75 हजार नागरिक येवू शकतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले गेले आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत चारशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यादृष्टिने संपूर्ण नियोजन केले असून उष्णता व पावसाची शक्यता याबाबी विचारात घेवून भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूला शासकीय योजनांचे स्टॉल्स व प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या विभागाचा जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती देईल. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करुन ठेवण्यात आली आहे. आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रथमोपचार व्यवस्थाही तत्पर ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचता यावे यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सुमारे 100 अधिकारी व त्यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

00000





Thursday, June 22, 2023

 नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

• सर्व विभाग प्रमुखांकडून लाभार्थ्यांचे नियोजन
नांदेड (जिमाका) दि. 22 :-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले आहे. उष्णता व इतर बाबी लक्षात घेता मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, मराठवाडा प्रमुख बाबासाहेब थेटे व इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
इतर जिल्ह्यातील कार्यक्रमांचा अनुभव पाठिशी घेवून नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट व शहरात येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पोलीस व परिवहन विभागाने केले आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकसहभागातून शासकीय योजनांचा महाउत्सव बनेल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केला.
00000



Wednesday, June 21, 2023

 कागदावरच्या योजनांना गरिबांपर्यंत पोहोचवून

त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी
- कृषि मंत्री अब्दुल सत्तार
▪️जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व्यापक बैठक
▪️शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत कृषि मंत्री सत्तार यांनी केल्या सूचना
▪️नांदेड येथे हा अभिनव उपक्रम ऐतिहासिक ठरेल
नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. येत्या 25 जून रोजी नांदेड येथील अबचलनगर येथे होणाऱ्या या भव्य उपक्रमाबाबत आज त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्यांच्यासाठी शासन योजना आखते, त्याला स्वरूप देते, त्यासाठी आर्थिक तरतूद करते त्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थीत पोहोचवणे ही त्या-त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी हाच या उपक्रमापाठिमागचा उद्देश असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. शासन आपल्या दारीच्या महामेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा विश्वास घेता येईल. प्रत्येक विभागाचे स्टॉल्स याठिकाणी असल्याने नागरिकांना ज्या योजना हव्या असतील त्या योजनांबाबतची परिपूर्ण माहिती 25 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्या-त्या विभाग प्रमुखांकडून, अधिकाऱ्यांकडून करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित विभागाने आपआपले जबाबदार कर्मचारी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम केवळ दारावर पाटी लावून चालणार नाही तर या पाठीमागचा जो मुळ उद्देश आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलीचे नाव केवळ पाटीपुरते नाही तर प्रॉपर्टी व शेतीच्या सातबारावर घेण्याचा हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील 103 महसूल मंडळात आजवर शासन आपल्या दारीबाबत शिबीरे झाली आहेत. तालुका पातळीवरील अधिकारी या शिबरांमधून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख टिमवर्कने काम करत असून या योजनेत सहभागी होणारा प्रत्येक लाभार्थी, नागरीक हा महत्त्वाचा व्यक्ती असेल असे समजून नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
00000

छायाचित्र : सदा वडजे






शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 15 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे. 

 

अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक, सन 2022-23 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 27 जून ते 15 जुलै 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

0000

 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...