Friday, June 23, 2023

 वृत्त 

शासकीय योजनांच्या साक्षरतेसाठी 25 जूनला शासन आपल्या दारी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभवाटप


पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

 

·         नांदेड येथील कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातून येणार लाभार्थी

·         वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र आराखडा

·         योजनांच्या मेळाव्यासह आरोग्य तपासणीचे शिबीर

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व भव्य शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन रविवार 25 जून रोजी दुपारी 1.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अबचलनगर येथील भव्य मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने हा भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे. शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती जोपर्यंत लाभार्थ्यांना होत नाही तोपर्यंत त्या योजनांप्रती लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासमवेत ग्रामपंचायत पातळीपर्यंत योजनांचा जागर पोहचावा या उद्देशाने नांदेड येथे भव्य प्रमाणात शासन आपल्या दारी याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातुन नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

 

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यांच्या मार्फत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून तर नांदेड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांशी समन्वय साधला गेला आहे. मनपा क्षेत्रातून 15 हजार, नगरपालिका क्षेत्रातून 10 हजार व ग्रामीण भागातून 20 हजार नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनाच्या या महामेळाव्यास 75 हजार नागरिक येवू शकतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले गेले आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत चारशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यादृष्टिने संपूर्ण नियोजन केले असून उष्णता व पावसाची शक्यता याबाबी विचारात घेवून भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूला शासकीय योजनांचे स्टॉल्स व प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या विभागाचा जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती देईल. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करुन ठेवण्यात आली आहे. आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रथमोपचार व्यवस्थाही तत्पर ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचता यावे यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सुमारे 100 अधिकारी व त्यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

00000





No comments:

Post a Comment

नांदेड लोकसभा, विधानसभा मतमोजणीला शांततेत सुरूवात #विधानसभानिवडणूक२०२४ #लोकसभापोटनिवडणूक #मतमोजणी #नांदेड #मतदान