Friday, May 12, 2023

राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे 16 मे रोजी आयोजन

 राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे 16 मे रोजी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  भारत सरकारतर्फे 10 लाख युवकांना रोजगार देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत  आजपर्यंत 71 हजार पेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकरीचे  नियुक्तीपत्र देण्यात आले. याच धर्तीवर मंगळवार 16 मे रोजी 5 वा राष्ट्रीय  रोजगार मेळावा नांदेडसह  देशभरातील 45 विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यातील एक मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे  आयोजित करण्यात आला आहे.  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व इतर मान्यवर नांदेड येथील मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

 

या मेळाव्याच्या आयोजनासाठी छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

या मेळाव्यादरम्यान भारत सरकारच्या 38 मंत्रालया अंतर्गत विविध विभागांतील सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. त्यापैकी नांदेड येथील मेळाव्यात जवळपास 250 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. उर्वरीत उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्र दिले जातील.

 

भारत सरकारच्या विविध मंत्रालय व विभागांनी ही भरती प्रक्रिया केली आहे. यात संघ लोक सेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भर्ती बोर्ड यासारख्या निवड एजन्सीद्वारे या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पुढील दीड वर्षात याच मिशन मोडवर 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याची माहिती नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

Thursday, May 11, 2023

 जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध सभांचे 16 मे रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि.  11 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा मंगळवार 16 मे 2023 रोजी दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

000000

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) इ. व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन 2023-24 मध्ये राज्य शासनाच्या अनुदान व बिजभांडवल योजना राबविण्यात येत आहेत. तसेच ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजूरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थ्याची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डवर लावली आहे. संबंधित अर्जदारानी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधून कागदपत्र दाखल करावेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

0000

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 मे रोजी महिला लोकशाही दिन

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

15 मे रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 11:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 मे 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

Wednesday, May 10, 2023

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

 मराठा उद्योजक घडविण्यासाठी 

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान 8 मे, 2023 रोजी पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर राधाकांत, डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र बोगा, डेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दास, चीफ मॅनेजर समीर देशपांडे हे उपस्थित होते. 

राज्यातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या शाखांना पत्रकाद्वारे कराराची माहिती देण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून महामंडळाच्या लाभार्थ्यांना सीजीटीएमएसई (CGTMSE) व सीजीएफएमयू (CGFMU) या दोन क्रिएट गॅरंटी देण्यात येणार आहेत. जे तरुण क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. जास्तीत जास्त महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन राज्यात उद्योजक होतील यादृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील आहे. 

 

हा सामंजस्य करार पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक बँक ऑफ इंडिया पुढील कालावधीत प्रसिध्द करणार असून त्यानंतर या कराराची अंमलबजावणी सुरु होईल. या झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणेच या अगोदर देखील मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, कोकण विभागासाठी या प्रकारचा करार करण्यात आला आहे. यापूर्वीच्या कराराचा लाभ या विभागातील लाभार्थ्यांना झालेला आहे. 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक लाख मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने या करारामुळे लाभ होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील यांनी दिली आहे.

0000

आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

 आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक

-         जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

§   नांदेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरात

   सहभागी हजारो युवकांना पोलीस अधिक्षकांचा गुरुमंत्र 

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर घडविण्याची जबाबदारी ही पालकावर नाही तर विद्यार्थी म्हणून प्रत्येकावर येवून पडते. आपल्या उज्वल भवितव्यासाठी युवकांनी सर्वप्रथम स्वत:ला ओळखले पाहिजे. आपली आवड काय आहे याचा निर्णय स्वत: हाच घेतला पाहिजे. ज्यावेळेला ही प्रक्रीया प्रत्येक विद्यार्थी स्वत: हून पार पाडेल त्या दिवसापासून तुमचे भवितव्य अर्थात करिअर घडण्यास सुरुवात झाली हे आत्मविश्वासाने समजून घ्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना केले.


 

आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहसंचालक सतिश सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सह आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

 

आयुष्याचा मार्ग शोधताना कोणत्याही विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती असणे स्वाभाविक आहे. या द्विधा मनस्थितीतून मी ही गेलेलो आहे. बीएससीला घेतलेले ॲडमिशन रद्द करुन मी शेवटी बीकॉमपर्यत पोहोचलो. बीकॉम यासाठी की मला युपीएससीची तयारी करता यावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला. यासाठी क्लासेस लावले. पहिल्या टप्प्यात माझा अभ्यास न झाल्याने मी परीक्षा दिली नाही. घरचे नाराज झाले. माझ्या मित्राने मला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. त्याच्या नोट्सवरुन माझा आत्मविश्वास वाढला. नंतरच्या परीक्षेत मी इतरापेक्षा अधिक मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.


 

माझे मी ध्येय निश्चित केल्यानंतर कुणाकडेच पाहिले नाही. राहणीमान व भौतिक सुविधा याला शुन्य महत्व देवून अभ्यासाला प्राधान्य दिल्यामुळे  मी या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी अनुभवाची शिदोरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. पॅशन, डेडीकेशन, डिव्होशन, डिस्परेशन याबाबी आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत हे युवकांनी विसरता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले.


 

18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जे अपार कष्ट घेतात, मेहनत करतात त्याची पुढची 50 वर्षे ही राजासारखी असतात या शब्दात मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी युवकांना यशाचे महत्व पटवून दिले. आयुष्यातील हा तुमचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. शिक्षणासमवेत आपल्या भोवताली असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी तपासून घेतल्या पाहिजे. मोबाईलच्या आहारी न जाता त्या वेळेचा सदउपयोग आपल्या करियरच्या दृष्टीने इतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी द्यावा असे ते म्हणाले. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर अनेक मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

0000   

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- एमएच-सीईटी परीक्षा-2023  ही 21 मे 2023 पर्यत (15 मे वगळून) दोन सत्रात जिल्ह्यात 7 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.  परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात 21 मेपर्यंत (15 मे 2023 वगळून) सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...