Friday, January 13, 2023

 जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीसाठी

14 जानेवारी रोजी प्रत्येक गावात विशेष मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील सर्व खातेदारांना /शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनची माहिती व जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या शेतातील पीकांची माहिती गाव नमुना नं. सातबारावर नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहिम शनिवार 14 जानेवारी रोजी मोहिम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून आपली पीकपेरा नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

ई-पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव न. नं.12 मध्ये नोंदविण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील तलाठी/कृषी सहाय्यक/पोलीस पाटील/रोजगारसेवक/रेशन दुकानदार/शेतीमित्र/कोतवाल/प्रगतीशील शेतकरी/आपले सरकार सेवा केंद्रचालक/सीएससी केंद्रचालक/संग्राम केंद्रचालक/कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी/तरुण मंडळाचे पदाधिकारी असे प्रत्येक गावासाठी किमान 20 स्वयंसेवक निश्चित केले आहेत. यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याची कार्यवाही करावी असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 25

 पत्रकार आणि सामाजिक संस्थाना

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पुरस्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :-लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणूका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणूका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थाचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेवून यावर्षीपासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थाना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

 

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना मतदार-मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. 10 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करु शकतात. त्यासाठी मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याचा अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह अर्ज democracybook2022/gmail.com या ई मेलवर पाठवावा. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर मो.क्र.8669058325 याच्यांशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

वृत्त क्रमांक 24

 निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून  शेखर चन्ने (भा.प्र.से.), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांचे निवास व संपर्क कार्यालय शासकीय सुभेदारी विश्रामगृहातील 'मांजरा' हे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8956710497 तर दूरध्वनी क्रमांक 0240-299801 असल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

Thursday, January 12, 2023

वृत्त क्रमांक 23

 सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी  रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसपी ऑफीस, कलामंदीर, शिवाजीनगर, आयटीआय पर्यत असून आयटीआय येथे रॅलीचा समारोप आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन चालक महिलांनी दुचाकी हेल्मेट रॅलीस उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 22

 ग्रामपंचायत निवडणूक खर्च

20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवांरावर अपात्रेची कारवाई निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येणार आहे. हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या 1 हजार 572 जागांसाठी 2 हजार 706 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 375 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 3 हजार 81 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 21

 मकर संक्रांती भोगी हा दिवस

पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून होणार साजरा

-  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी व  सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे.  यानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृण धान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

 

या दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा पिका पासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने यांची माहिती व कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.  14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती-भोगी हा दिवस जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 20

 धान / भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला दिली मुदतवाढ  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान / भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरु आहे. या ऑनलाईन नोंदणीला रविवार 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

या नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात / बारा, बँक खात्याची साक्षांकित प्रत, आधार कार्डची प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन दरम्यानचा लाइव्ह छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...