Thursday, January 12, 2023

वृत्त क्रमांक 23

 सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी  रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसपी ऑफीस, कलामंदीर, शिवाजीनगर, आयटीआय पर्यत असून आयटीआय येथे रॅलीचा समारोप आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन चालक महिलांनी दुचाकी हेल्मेट रॅलीस उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 22

 ग्रामपंचायत निवडणूक खर्च

20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवांरावर अपात्रेची कारवाई निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येणार आहे. हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या 1 हजार 572 जागांसाठी 2 हजार 706 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 375 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 3 हजार 81 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 21

 मकर संक्रांती भोगी हा दिवस

पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून होणार साजरा

-  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी व  सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे.  यानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृण धान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

 

या दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा पिका पासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने यांची माहिती व कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.  14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती-भोगी हा दिवस जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 20

 धान / भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला दिली मुदतवाढ  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान / भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरु आहे. या ऑनलाईन नोंदणीला रविवार 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 

या नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात / बारा, बँक खात्याची साक्षांकित प्रत, आधार कार्डची प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन दरम्यानचा लाइव्ह छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 19

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- ‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023’ चे उदघाटन प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी श्रीछत्रपती शिवाजी विदयालय सिडको संस्थेचे संस्थाचालक राजेश महागावे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे डॉ.महेमुद यांची उपस्थिती होती.

यावेळी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली. अपघातामुळे अनेक कुटूंबे उध्दस्त झालेली आहेत. याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये एक समिती नेमण्यात आलेली असून या समितीने प्रत्येक प्रत्येक वर्षी किमान 10 टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगितले. फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजून चालावे (Walk on Right) याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते एका नविन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. या नविन संकल्पनेची जनजागृती संपूर्ण जिल्हयामध्ये करण्यात येणार आहे. या राज्य रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल आवाड यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल डुब्बेवार यांनी मानले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाड, मनोज चव्हाण, गणेश तपकिरे, भरत गायकवाड, अभिजित कोळी व सहा.मोटार वाहन निरीक्षक धोंडीबा आवाड, अनिल टिळेकर, कज कंतेवार, डुब्बेवार लिपीक कर्मचारी, मुख्य लिपिक राजेश गाजुलवाड, रोहित कंधारकर, गजानन शिंदे, दिलीप गाडचेलवार, श्रीमती जयश्री वाघमारे, नरेश देवदे, क. लिपीक प्रदीप बिदरकर, संजय कोंगलवार, मोतिराम पोकले, छत्रपती शिवाजी विद्यालय सिडको येथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे पथक उपस्थित होते.

00000

Tuesday, January 10, 2023

वृत्त क्रमांक 18

 शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यास जानेवारी महिण्यात युरिया खताची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात 15 हजार मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आजच्या स्थितीला आयपीएल कंपनीचे 1800 मे. टन व नागार्जूना कंपनीच्या 2200 मे. टनच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरीत होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .

आपल्या जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दाळवर्गीय हरभरा पिकास युरिया खताचा वापर टाळावा जेणे करुन पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही व खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल. पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमीनीची पोत टाळता येईल व पिकांना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल.

0000

Monday, January 9, 2023

वृत्त क्रमांक 17

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी अतिविलंब शुल्काने गुरुवार 12 जानेवारी 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.


फेब्रुवारी-मार्च
 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 25 नोव्हेंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.


अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क रु.
 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा मंगळवार 10 जानेवारी 2023 ते गुरुवार 12 जानेवारी 2023 या कालावधीत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.


विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र,
 आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहील.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. )

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज,
 प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.


इयत्ता दहावी व बारावी-
 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ,
 कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इय्यता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून दिलेल्या कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...