Wednesday, November 30, 2022

 संविधान विषयावर स्पर्धा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- संविधान दिन ‍26 नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर या कालावधीत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने संविधान विषयावर जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आज भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर, चित्रकला स्पर्धा तर अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह निवासी शाळा येथे भित्तीपत्रक, पोस्टर्स, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवा कार्यकर्ते प्रतिनीधी, कर्मचारी वर्गांची कार्यशाळा घेण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन

व वाटप शिबिराचे शनिवारी आयोजन  

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- नांदेड जिल्हयात तालुकानिहाय महाविद्यालयस्तरावर शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी सन 2022-23 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 वी व 12 विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आयोजित तालुकानिहाय शिबिराच्या ठिकाणी संबंधित तालुक्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रतिनिधी तसेच महाविद्यालयात स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधींनी मंडणगड पॅटर्न प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी माहितीसह उपस्थित रहावे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 पर्यंत 'समता पर्व' साजरे केले जात आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे समितीकडे दाखल केलेल्या जाती दावा पडताळणी प्रस्तावांमध्ये समितीने दिनांक 28 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत वैध केलेल्या प्रकरणात संबंधित अर्जदार यांना समक्ष जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधींना मंडणगड पॅटर्न प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

नांदेड जिल्ह्यात शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी श्री शाहू महाराज महाविद्यालय बोरगाव रोड भोकर येथे, देगलूर तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय देगलूर, नायगाव तालुक्यासाठी जनता हायस्कुल नायगाव येथे, लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे, हदगाव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय हदगाव येथे, मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे. नांदेड, अर्धापूर, व मुदखेड तालुक्यासाठी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे तर उमरी तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमरी येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल शेंदारकर उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   

00000

 नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हा युवा मंडळ

पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि 30 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक मंडळानी 15 डिसेंबर 2022 पर्यंत विहित नमून्यात  नेहरू युवा केंद्र] राज निवास घर नं.21 मालेगाव रोड जैन मंदिर समोर, शिवराय नगर तरोडा (खु ) नांदेड येथे अर्ज सादर करावेत.

 

दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन, सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्रक असे आहे. जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी संस्था, व्यायामशाळांनी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, घटना, आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा अहवाल, लेखा परीक्षणाचा अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह सर्व मंडळानी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र या कार्यालयात उपलब्ध आहे. या योजनचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी युवा केंद्र अधिकारी चंदा रावळकर  यांनी केले आहे.

0000000

Tuesday, November 29, 2022

 सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

कटिबद्ध होऊन अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे

-         खासदार प्रताप पाटील चिखलीकर  

 

·         दिशा  समितीमध्ये विविध विकास कामांचा आढावा

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी केंद्र सरकारने ज्या योजना हाती घेतल्या आहेत त्यात अंत्योदयाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. महानगरपासून ते खेड्यापर्यंत निराधारांना आवास योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, ग्रामीण पेयजल, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक बालविकास योजना, मध्यान भोजन योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास आदी योजना या भारतातल्या प्रत्येक घटकांप्रती कटिबद्ध होऊन हाती घेतलेल्या आहेत. सर्व सामान्यांच्या विकासाचा मार्ग यातून समृद्ध होणार असून संबंधित यंत्रणांनी या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिक कटिबद्ध व निस्वार्थ भावनेने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.   

 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)  समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्याात आलेल्या या बैठकीस या बैठकीस आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

शेती, शेतकरी, कष्टकरी यांना सावरण्यासाठी शासनाने महत् प्रयासाने योजना हाती घेतल्या आहेत. मागील अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागले. अशाप्रसंगी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा योजना देण्यात आली. या विमानुसार संबंधित शेतकऱ्यांना बँकेच्या आयएफसीकोड व इतर तांत्रिक चुकामुळे वेळेवर मदत मिळण्यास जर अडचण निर्माण होत असेल तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. अशा तांत्रिक चुका ज्या-ज्या विभागासंदर्भात असतील त्यांनी तात्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग प्रमुखांना केले.

 

या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांचा आढावा घेतला.

 

मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव

अधिक व्यापक करू या

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ आपण मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी, मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव अधिक व्यापक व लोकोत्सवात साजरा व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेऊन व्यापक नियोजन केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्याचे जे अनन्यसाधारण महत्व आहे ते लक्षात घेऊन प्रत्येक तालुका पातळीवर विविध उपक्रमाचे प्रत्येक विभागाने आयोजन करण्याचे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत व्यापक बैठक झालेली आहे. हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यादृष्टिने कोणाच्या सूचना असतील, उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल अशांनी पुढे येऊन आपल्या कल्पना-उपक्रम सूचवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अमृत महोत्सवासमवेत “चला जाणु या नदीला” हे विशेष अभियान नदी आणि पर्यावरणाच्यादृष्टिने शासनाने हाती घेतले असून यातही सेवाभावी संस्था, स्वयंसेवक यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.  

00000 








 फेसलेस सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 29 :- केंद्र शासनाच्या 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पध्दतीने देण्याचे सूचित केले आहे. यामध्ये सारथी संबंधी अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल क्रमांक अद्यावत करणे, अनुज्ञप्ती ची माहिती मिळविणे, अनुज्ञप्ती विवरणपत्र, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती व कंडक्टर अनुज्ञप्ती नुतनीकरण या सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार आधार क्रमांकाचा वापर करुन नागरिकांना सारथी 4.0 या प्रणालीवर अर्ज करता येतील. यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे केलेला ऑनलाईन अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर वैध असलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील

नवउद्योजकांसाठी गुरुवारी कार्यशाळा

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांसाठी गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर 2020, 16 मार्च 2020 व 26 मार्च 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कळविले आहे.

0000

वृत्त

शिपाई पदासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयातील वर्ग 4 शिपाई या एका रिक्त पदासाठी इच्छुक व्यक्तींनी आपले दरपत्रक विहित नमुन्यात सहपत्रासह शुक्रवार 2 डिसेंबर 2022 पर्यत सर्व तपशीलासह कार्यालयास सादर करावेत. याबाबत अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत. संबंधितांनी सहायक संचालक, नगररचना, नांदेड शाखा कार्यालय, नांदेड श्री घोडजकर इमारत, दुसरा मजला, महाराणा प्रताप चौक, गांधी नगर, हिंगोली नाका नांदेड -431605 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नगररचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी केले आहे.

 

सहाय्यक संचालक, नगररचना कार्यालयात वर्ग-4 शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता आहे.  मान्यताप्राप्त संस्था / कंपनीकडून यापूर्वी दरपत्रके मागविण्यात आले होते परंतु प्राप्त दरपत्रकात सुसूत्रता व आवश्यक माहिती नमुद नसल्यामुळे प्राप्त दरपत्रके विभागीय कार्यालयाकडून नामंजूर करण्यात आली, अशी माहिती नगर रचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...