Tuesday, November 29, 2022

 सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

कटिबद्ध होऊन अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे

-         खासदार प्रताप पाटील चिखलीकर  

 

·         दिशा  समितीमध्ये विविध विकास कामांचा आढावा

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी केंद्र सरकारने ज्या योजना हाती घेतल्या आहेत त्यात अंत्योदयाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. महानगरपासून ते खेड्यापर्यंत निराधारांना आवास योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, ग्रामीण पेयजल, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक बालविकास योजना, मध्यान भोजन योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास आदी योजना या भारतातल्या प्रत्येक घटकांप्रती कटिबद्ध होऊन हाती घेतलेल्या आहेत. सर्व सामान्यांच्या विकासाचा मार्ग यातून समृद्ध होणार असून संबंधित यंत्रणांनी या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिक कटिबद्ध व निस्वार्थ भावनेने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.   

 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)  समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्याात आलेल्या या बैठकीस या बैठकीस आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

शेती, शेतकरी, कष्टकरी यांना सावरण्यासाठी शासनाने महत् प्रयासाने योजना हाती घेतल्या आहेत. मागील अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना हातचे पीक गमवावे लागले. अशाप्रसंगी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा योजना देण्यात आली. या विमानुसार संबंधित शेतकऱ्यांना बँकेच्या आयएफसीकोड व इतर तांत्रिक चुकामुळे वेळेवर मदत मिळण्यास जर अडचण निर्माण होत असेल तर योजनेचा उद्देश सफल होणार नाही. अशा तांत्रिक चुका ज्या-ज्या विभागासंदर्भात असतील त्यांनी तात्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग प्रमुखांना केले.

 

या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनांचा आढावा घेतला.

 

मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव

अधिक व्यापक करू या

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ आपण मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी, मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव अधिक व्यापक व लोकोत्सवात साजरा व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेऊन व्यापक नियोजन केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्याचे जे अनन्यसाधारण महत्व आहे ते लक्षात घेऊन प्रत्येक तालुका पातळीवर विविध उपक्रमाचे प्रत्येक विभागाने आयोजन करण्याचे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत व्यापक बैठक झालेली आहे. हा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यादृष्टिने कोणाच्या सूचना असतील, उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल अशांनी पुढे येऊन आपल्या कल्पना-उपक्रम सूचवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अमृत महोत्सवासमवेत चला जाणु या नदीला हे विशेष अभियान नदी आणि पर्यावरणाच्यादृष्टिने शासनाने हाती घेतले असून यातही सेवाभावी संस्था, स्वयंसेवक यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.  

00000 








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...